चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)
शीर्षक: मोक्षदा (भाग-३)
"हो, मलाही काहीच माहिती नाही; पण ती भेटली तेव्हा वेगळ्याच मनःस्थितीत भासली. म्हणजे मी अशुभ आहे. माझ्यामुळे सगळे मरण पावतात... असे काहीसे शब्द बोलत होती. ती तर माझ्यासोबत येणारच नव्हती. नकार देतच ती बेशुद्ध पडली मग मी तिला घेऊन आलो. माझ्या अंदाजाप्रमाणे ताईच्या घरी काहीतरी झाले आहे. कदाचित भाऊजी आणि त्यांचे बाळ..." ज्ञानेश भक्तीला इत्थंभूत माहिती देत होता.
तेवढ्यात त्याची मुलगी डोळे पुसत आली आणि त्याला बिलगली.
"बाबा, किती उशीर... कधी आलात?" डोळे पुसत ज्ञानेश-भक्तीची मुलगी म्हणाली.
"आताच आलो बाळा पण तू कशाला उठलीस? उद्या सकाळी लवकर उठायचंय ना शाळेसाठी..." तो तिला मांडीवर बसवत म्हणाला.
"हो पण तुम्ही हल्ली खूप उशिरा येता ऑफिसवरून... आपली भेट किती कमी होते. आज मला तुमच्या आवाजाने जाग आली म्हणून पळत आले." ती चिमुकली म्हणाली.
"बरं. मग कसा होता आजचा दिवस? काय काय केलेस तू?" असे म्हणून तो तिच्याशी बोलू लागला.
थोडीफार तिने त्याच्याशी बडबड केली आणि मग तिला झोप येताच त्यालाच बिलगून झोपली. तो तिला तिच्या खोलीत झोपवून आला. त्यानंतर ते दोघे थोडे निवांत झाले होतेच की मोक्षदाच्या खोलीतून प्याला पडल्याचा आवाज आला. ते पळतच गेले तर मोक्षदाला शुद्ध आली होती.
"ताई, पाणी हवे का?" त्याने काळजीने विचारले.
"प्यायले मी..." ती उत्तरली.
ती फार काही बोलणार नाही म्हणून तो स्वतःच्या बायकोची ओळख करून देत म्हणाला, "ताई, ही माझी बायको..."
"ताई, मी भक्ती. हे तुमच्याबद्दल खूप बोलतात. मला ना तुम्हाला भेटायचे होतेच आणि योगायोग बघा आपली आज भेट झाली." ज्ञानेशच्या आधी भक्तीच बडबडायला लागली.
मोक्षदा फक्त ऐकत होती. दोघांपैकी कोणीही तिला प्रश्न विचारले नाही. तिला सावरायला वेळ दिला. त्यानंतर हळूहळू भक्तीनेच बडबड करता करता तिला बोलते केले. तिनेही हळूहळू आपबिती सांगितली. तिची व्यथा ऐकून ते दोघेही खूप भावूक झाले.
भक्तीने तिला कडकडून मिठी मारून तिला मन मोकळे करू दिले. तिच्या मिठीत मोक्षदाला आपलेपणाची जाणीव झाली. ती मनसोक्त रडली. त्या दरम्यान ज्ञानेश खिचडी घेऊन आला. भक्तीने स्वतःच तिला जेवण भरवले कारण तिच्यात जरासा अशक्तपणा होता. त्यांचे प्रेम पाहून तिला गहिवरून आले. जेवढी सख्खी, रक्ताची नाती साथ देत नाहीत तेवढी मायेने जुळलेली परकी नाती आपुलकी अन् जिव्हाळ्याची असतात, हा साक्षात्कार तिला झाला.
"एवढ्या रात्री तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. मी उद्या सकाळी जाईन." ती म्हणाली.
"ताई, तुम्हाला मी आवडले नाही का? की आमचे घर आवडले नाही?" भक्ती म्हणाली.
"तसे नाही... माझा तुम्हाला त्रास नको म्हणून... तुमच्या गोड संसाराला माझी दृष्ट लागेल म्हणून..." ओलावलेल्या कंठाने ती म्हणाली.
"ताई, अहो हा चैत्र महिना... त्यात चैत्रातील नवरात्रीचा पहिलाच दिवस आणि तुम्ही आलात. तुम्ही माझ्यासाठी देवीसारख्या. शिवाय आम्ही दोघेही अनाथ. ना मला माहेर, ना ह्यांना सासर... तुम्ही तुमची माया, प्रेम आम्हाला दिले, या घराला स्वतःचे हक्काचे घर मानले तर आम्हाला खूप आवडेल. पुढे तुमची इच्छा." ती भावूक होत म्हणाली.
"ताई, मी तुझे ऋण कधी फेडू शकणार नाही पण निदान तुझी सेवा करण्याची संधी मला मिळू दे. अर्थात यात माझा स्वार्थ आहेच, मला तुझी माया मिळेल. रक्षाबंधनाच्या दिवशी माझा हात कोरा राहणार नाही." ज्ञानेशही आग्रही स्वरात म्हणाला.
"आईऽऽ, बाबाऽऽ" हाक देत श्री तिथे आली.
डोळे चोळतच ती भक्तीला म्हणाली, "आपल्या घरी पाहुणे आले?" बोलताना तिच्या डोळ्यात वेगळीच चकाकी होती.
"तुझी आत्या आहे. मोक्षदा आत्या..." ज्ञानेश म्हणाला.
"खरंच? नमस्कार आत्या." असे म्हणत कोणी सांगायच्या आत ती मोक्षदाच्या पाया पडली.
"इकडे ये... तुझे नाव काय आहे?" तिला मांडीवर घेत मोक्षदाने विचारले.
"श्री भक्ती ज्ञानेश चाफेकर." ती म्हणाली.
"अरे व्वा! खूप गोड नाव आहे आणि तू पण गोड आहेस." तिला कुरवाळत मोक्षदा म्हणाली.
"आत्या आता तुम्ही इथेच राहणार ना?" श्रीने उत्साहात विचारले. ती थोडा वेळ शांत झाली.
"प्लीज, राहा ना... मला तुम्ही खूप आवडल्या. बाबा, तुम्ही आत्याला सांगा ना थांबायला... आई, तू बोल ना काही..." श्री ओठांचा चंबू करून हट्ट करत म्हणाली.
"आम्ही बोललो दोघे, आमचे ऐकत नाही आहे ताई. तूच सांग तुझ्या आत्याला आता..." ज्ञानेश म्हणाला.
"आत्या प्लीजऽऽ" तिच्या डोळ्यात पाणी पाहून मोक्षदा भावूक झाली आणि तिने क्षणात श्रीच्या आग्रहाला स्वीकृती दिली.
तिला तिच्या रक्ताच्या भाऊ-भावजयीने नाकारले तरी आज तिला जिवाभावाची तीन नवी नाती मिळाली— प्रेमळ, गोंडस आणि मायाळू भाऊ, भावजय आणि भाची व हक्काचे माहेर लाभले.
त्यानंतर तिला विश्रांती करायला सांगून ते दोघे त्यांच्या खोलीत गेले. श्री तर तिच्यासोबतच तिच्या खोलीतच झोपली.
पाहता पाहता दिवस सरू लागले. हळूहळू त्या तिघांच्या जिव्हाळ्याने, प्रेमाने, मायेने, आपुलकीने ती सावरू लागली. जखमा तशाच असल्या तरी ते दुःख सहन करून हसून जगण्याची क्षमता तिच्यात आली होती. थोडा काळ लोटला आणि तिने परत नवी सुरुवात करायचे ठरवले. डॉक्टर ती आधीच होती पण मधल्या काळात तिचा सराव सुटला होता; पण नंतर तिने परत काम करायला सुरुवात केली आणि अक्षरशः मोजक्याच कालावधीत तिने तिच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केले.
दरम्यान ती ज्या इस्पितळात आता काम करत होती तिथे एक चिकित्सक (सर्जन) होता—सार्थक मोहिते, त्याला मोक्षदा आवडत होती. कळत-नकळत तिलाही तो आवडायला लागला होता पण भूतकाळातील घटनांचा तिच्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता; त्यामुळे तिच्या मनात भीती होती व ती पुढाकार घेत नव्हती.
एके दिवशी मोक्षदा स्वतःचा डबा घरीच विसरली होती. भक्ती तिला डबा द्यायला गेली. तिला मोक्षदा दिसली, ती हाक देणार तेवढ्यात तिच्यासोबत सार्थक दिसला. त्यांचा संवाद तिच्या कानावर पडला. त्याने त्याचे प्रेम कबूल केले पण मोक्षदा काही न बोलता निघून गेली. भक्तीला मोक्षदाच्या मनातल्या भीतीविषयी कल्पना होती. ती डबा घेऊन मोक्षदाकडे गेली, डबा दिला. थोडी अवांतर बोलली पण सार्थकविषयी काहीच बोलली नाही. घरी गेल्यावर ज्ञानेशला फोन करून तिने संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली.
ज्ञानेशने साधारण दोन दिवसांत आधी सार्थकची चौकशी केली, त्याच्या प्रेमाचीही परीक्षा घेतली. त्यानंतर तो मोक्षदाचा भाऊ आहे, हे सांगितले आणि त्याला तिचा भूतकाळ सांगितला. सार्थकने तरीही तिच्यावर त्याचे प्रेम आहे, अशी शाश्वती दिली. त्याच्या उत्तरातील ठामपणा पाहून सार्थक आश्वस्त झाला आणि त्याला एक आठवडा थांबायला सांगितले.
ज्ञानेश घरी आल्यावर मोक्षदाशी बोलला. तिची समजूत काढून नवी सुरुवात करण्याचा सल्ला दिला. ती तरीही तिच्या नकारावर ठाम होती. शेवटी भक्ती तिच्याशी बोलू लागली.
"ताई, तुम्हाला सार्थक आवडतात मला माहिती आहे पण तुम्ही भूतकाळ आठवून गप्प आहात, हो ना? ताई, ती घटना घडायची होती ती घडून चुकली. तिचा विचार करून वर्तमान कशाला अंधारात कोंडायचा? सार्थक जीवापाड प्रेम करतात तुमच्यावर. त्यांना तुम्हाला ते सुख द्यायचे आहे, ज्या सुखाचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यांना नाही फरक पडत तुमचा काय भूतकाळ आहे... ते फक्त वर्तमान आणि भविष्याचा विचार करत आहेत. प्रत्येकाला नाही मिळत असे प्रेम करणारे कोणी... मी तर हाच सल्ला देईन की तुम्ही तुमच्या आयुष्यात नवे रंग भरायला हवे. पुढे तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. फक्त माझे एवढेच म्हणणे आहे की जर सुख स्वतः तुम्हाला साद घालत असेल तर तुम्ही पाठ फिरवायला नको. येतो आम्ही. पटले असेल तर काही दिवस विचार करा तरीही तुमचा नकारच असेल तर आम्ही स्वेच्छेने स्वीकारू तुमचा निर्णय." भक्ती म्हणाली आणि खोलीतून निघून गेली. तिच्या मागे ज्ञानेशही गेला.
क्रमशः
.........
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
.........
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा