Login

मोल (भाग:-३ अंतिम)

गरीबीतही शिक्षणाचे मोल सांगणारी रामची कथा

#जलद कथा लेखन स्पर्धा:- ऑक्टोबर-२०२५

विषय:- गरिबीतील शिक्षण आणि शिक्षणातील गरिबी

शीर्षक:- मोल

भाग:- ३ (अंतिम)

"हा तुझा मुलगा आहे रे, विठोबा?" शरदने रामकडे बोट करत चमकून त्याला विचारले.

"व्हयं जी. त्याचं काय चुकलं.." विठोबा हात जोडत अजजीने म्हणत होता तोच त्याचे बोलणे मध्येच तोडत शरद त्याला म्हणाले,"अरे, माफी कशासाठी मागतोस, विठोबा? याच काही नाही चुकले. उलट त्याचं कौतुक वाटलं मला. अवघ्या चौथी पास असलेला तुझा मुलगा किती छान खडाखडा वाचतो. त्याचा अर्थही छान सांगितले त्याने. जो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. त्याला इंग्रजी ही इतके छान येते. हा माझा मुलगा जो मोठ्या इंग्रजी माध्यम शाळेत शिकतो, त्याला ही इतके जमत नाही. मी दोघांची तुलना करत नाही रे. पण गरिबीतलं शिक्षण आणि शिक्षणातील गरिबी आज पाहिली."

शरद स्वतः गरिबीतून शिक्षण घेऊन पुढे आले होते. त्यांना शिक्षणाचे मोल माहिती होते.‌ आपल्या मदतीने एखाद्याला शिक्षण मिळणार असेल तर त्याच्या आयुष्याचे कल्याण होईल असे त्यांना नेहमी वाटायचे.

आज रामकडे पाहून त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचं बालपण झळकून गेलं. त्यांची शिकण्याविषयीची तळमळ, त्यांच्या आईवडिलांचा संघर्ष आठवला. राममध्ये त्यांना स्वतःचं बालरूप दिसलं.

त्यांनी रामला जवळ घेत मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवले.

"आणि शिकत होता असे तू का म्हणालास?" त्याने विठोबाकडे पाहत म्हणाला.

"मालक, ते जरा पैकं ऽ ऽ म्हंजी ते.." बोलता बोलता तो मध्येच खाली मान थांबला.

"म्हणजे काय? " त्यांनी पुन्हा विचारले.

"आम्हा गरिब लोकांसाठी शिकश्यान नसतं वं. पुढचं शिकश्यान आम्हा गरिबास्नांनी न्हाय झेपायचं. म्हणूनश्यान म्याच त्याचं शिकायला नगो म्हणालो." विठोबाने खरं कारण सांगितले.

"अरे बस्स, इतकं ना. ह्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च मी उचलतो. एका हुशार विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं पुण्याचं काम माझ्याकडून होतं आहे. तर तू नको म्हणू नकोस. ह्याला शिक्षणाचं मोल माहिती रे. शिकू दे त्याला. माझ्या शिवा बरोबर तोही शाळेत जाईल. काय रे राम, जाशील ना शाळेत?" शरद रामची पाठ थोपटत हसत म्हणाले.

"व्हयं मालक, म्या मन लावून शिकेन." राम आनंदून त्यांच्या पाया पडत हसत म्हणाला.

"लय लय उपकार झाले, मालक. तुम्ही आमच्यासाठी देवच हायसा. म्या रातीचा दिस करीन अन् तुमची पै न् पै चुकते करेन. " डोळ्यांत पाणी आणत विठोबा त्यांच्या पायाशी झुकत म्हणाला.

"अरे वेडा आहेस का, विठोबा? पाया का पडतोस? आणि हे उपकार वगैरची भाषा करू‌ नकोस. पैसेही चुकवायची गरज नाही. राम शिकून स्वतःच्या पायावर उभा राहिला तर माझ्या शिक्षण देण्याचे सार्थक झाले असे समजेन मी." असे म्हणत शरद यांनी विठोबाला खांद्याशी धरत उठवून गळ्याशी लावून घेतले.

शरदच्या मनाचा मोठेपणा पाहून रखमालाही भरून आलं. तीही पुढे येत म्हणाली," तुमचे उपकार तर या जन्मी फिटणार न्हाय जी, मालक. काल रातीला म्या ईचार केला व्हुता तुम्हासी रामबाबत बोलण्याचं. पर बघा की तुम्ही स्वोताच बोललात. कवा बी कोंच बी काम असू द्या. हाक्कानं सांगा जी. आम्ही दोघं बी हजर असू."

"अगं रखमा, मी असं काही इतकं मोठं काम करत नाही. अगं माझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्याने रामची हुशारी पाहून मदतीचा हात दिला असता. मी काय एवढं मोठं काम करत नाही." शरद हसत म्हणाला.

"तसं न्हाईजी, मालक. ह्यो तुमचा मनाचा मोठेपणा झाला." विठोबा आबदीने हात जोडत म्हणाला.

"पुरे झालं विठोबा. मी याचं नाव उद्याचं तालुक्याच्या शाळेत नोंदवून येतो. मग जाईल तो शाळेत." शरद रामच्या डोक्यावर थोपटत म्हणाले.

राम तर आनंदाने उड्या मारू लागला. विठोबा आणि रखमा यांच्या डोळ्यांतही त्याच साहेब बनण्याचं स्वप्न तरळू लागले.

समाप्त -

शिक्षणाचे मोल ज्याला कळते तोच पुढे जाऊन शिक्षण घेणाऱ्याला मदतीचा हात पुढे करतो.