#जलद कथा लेखन स्पर्धा:- ऑक्टोबर २०२५
विषय:- गरिबीतील शिक्षण आणि शिक्षणातील गरिबी
शीर्षक:- मोल
भाग:- १
"आय, मला शिकू दे की. म्या शिकलो की लय मोठा सायब हुईन. मंग बा आणि तुला, तुम्हा दोघास्नी बी ईमानात फिरवीन." छोटा राम शेतमजूर असणाऱ्या आपल्या आईला विनवणी करत म्हणाला.
रामचे चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. त्याला पुढचे शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती. तीच इच्छा त्याने त्याच्या आईसमोर बोलून दाखवली.
"आरं, तुझं समद खरं हाय, लेकरा ; पर तुझ्या शिकश्यानापायी पैकं कुठून येणार? तुला तर ठाव हाय नव्हं, सोन्या? आपलं दोन येळच पोट भरायच मुश्किल हाय. त्यात तुला पुढं शिकण्यासाठी तालुक्याच्या शाळेत धाडायचं म्हंजी रग्गड पैका पायजे नव्हं. तेवढी ऐपत न्हाई रं आपली." त्याची आई रखमा परिस्थितीने हताश होत निराशेने म्हणाली.
"व्हयं रं, राम्या. तुझी आय बराबर बोलतिया. उगीच नसते खुळ डोक्यात घेऊ नगोस. चार बुक शिकलास नव्हं. तेच लय झालं बघ. तुला लिवायला अन् वाचायला बी येतंय तर बास झालं. गपगुमान आमच्या संग कामाला यायचं. ईमानात बसायाचं मोठं सपान आपल्या सारख्या गरिबान बघायचं नसतं. इसरून जा समद. चल आता नीज लौवर, उद्यापासनं तू बी कामावर चलायचं हाईस आमच्या संग." रामचे वडील विठोबा त्याला खडसावत त्याला झोपायला सांगितले.
रामचा चेहरा पडला. तोंड बारीक करून तो मुकाट्याने फाटकी मळकी गोधडी पायापासून तोंडावर पांघरूण ओढून घेत मुसमुसत झोपी गेला. त्याच ते उदास चेहरा पाहून आणि मुसमुसणे ऐकून रखमाला मात्र खूप वाईट वाटतं होतं. रामसाठी काही तरी करायचे असे तिने मनोमन ठरवले.
रात्री राम झोपी गेल्यावर ती धाडस करून विठोबाला म्हणाली,"आवं रामचे बा, जाग हायसा नव्हं."
"व्हयं, बोल की काय म्हणतेस? " तो कूस वळवून तिच्याकडे पाहत म्हणाला.
"म्या काय म्हणते? आपण रामला.." ती बोलत होती तोच विठोबा तिला अडवत म्हणाला,"ठाव हाय मला तुझ्या मनात काय हाय ते? अगं पर आपण करून खाणारी साधी माणसं. आपण कसं त्याला पुढे शिकवू शकतो? म्या ऐकलं की चार बुकाचं पुढचं शिकश्यान लय महाग असतया."
"तुमचं बराबर हाय वं. पर त्याचं मास्तर सांगत व्हुतं की आपल्या रामला लय डोकं हाय. जर पुढं शिकलं तर लय मोठा सायब हुईल त्यो." ती रामच कौतुक करत होती.
"म्हंजी ते सायबाचं खुळ त्या मास्तरांनी त्याच्या डोस्क्यात भरवल हाय म्हणायचं अन् तेच खुळ आता तुझ्या बी डोस्क्यात आलाय का? कवतिक करायला त्यांचं काय जातंया, आपल्यालाच बघावं लागलं त्याचं. त्यो मास्तर का येणार हाय व्हय गं. नीज गपचिप. लय रात झालीया." तो तिला रागवत कूस वळवून तिच्याकडे पाठ करत म्हणाला.
"जाऊ द्या, तुम्हास्नी सांगून काय बी उपेग न्हाई. पर म्या ठरवलया, रातीचा दिस करीन. पर रामला पुढं शिकवेन." निर्णय सुनावत तीही कूस वळवून झोपली.
तिच्या बोलण्याचा तो विचार करत झोपी गेला.
क्रमशः
विठोबाला रखमाचे बोलणे पटेल का? तो रामला पुढे शिकवेल का?
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा