Login

मोल (भाग:-२)

गरिबीतही शिक्षणाचे महत्त्व सांगणारी रामची कथा

#जलद कथा लेखन स्पर्धा:- ऑक्टोबर -२०२५

विषय:- गरिबीतील शिक्षण आणि शिक्षणातील शिक्षण

शीर्षक:- मोल

भाग:-२

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच विठोबा आणि रखमा रामला घेऊन एका शेतावर कामासाठी आले. तर त्या शेताच्या मालकाचा मुलगा शिवा पुस्तक घेऊन वाचत मोठ्याने बसला होता. पण तो चुकीचे वाचत होता. रामला ते ऐकू आले. जे की त्याने त्याच्या सरांनी दिलेल्या पुस्तकात वाचले होते. तो एक पाठी असल्याने त्याला ते पाठ झाले होते. तसेच त्याची एकाग्रता आणि स्मरणशक्तीही खूप चांगली होती. गणितही तो चांगल्या प्रकारे सोडवत होता.

"म्या सांगू का याला तो चुकीचा वाचतोय ते. पर मालकानं खवळलं तर नको, जाऊ दे." तो त्या शिवापासून जवळच शेतातील गवत काढत मनात म्हणाला.

कितीही दुर्लक्ष केले तरी राहून राहून त्याचं लक्ष शिवाच्या चुकीच्या वाचण्याकडे जात होते. शेवटी त्याला राहावलं नाही तो हिंमत एकवटून शिवाजवळ गेला आणि म्हणाला,"भाऊ, तुला एक सांगू का? "

पुस्तक वाचता वाचता शिवाने रामकडे वरून खाली पर्यंत पाहिले.

"हा, बोल‌ं ना." शिवा त्याला म्हणाला.

"तू आत्ता जे वाचत आहेस ना‌ ते तू चुकीचे वाचत आहेस. " राम चाचरत भीतभीतच म्हणाला.

"हो का? तुला कसं माहिती? तुला लिहिता वाचता येत‌ं का? " शिवा त्याच्याकडे बघत आठ्या पाडत म्हणाला.

"हो, मी शाळेत असताना वाचले होते हे पुस्तक. आमच्या सरांनी दिले होते ते मला. माझ्या लक्षात आहे ते अजूनही." राम त्याला धीटपणे म्हणाला.

"हो का ? मग तू वाचून दाखवं बरं." पाठीमागून एक कडक, भारदस्त आवाज आला.

राम आणि शिवाने एकदमच वळून त्या दिशेने पाहिले.

तो आवाज शिवाच्या वडीलांचा, शेताच्या मालकांचा शरद यांचा होता.

"आ ऽऽ.. म्या." राम आवंढा गिळत घाबरत छातीवर हात ठेवत म्हणाला.

"हो तूच. तुलाच म्हणालो मी. वाच बरं. शिवा ते पुस्तक दे त्याला." शरद हाताची घडी घालून शिवाला रामकडे पुस्तक द्यायला सांगत रामला म्हणाले.

रामने ते पुस्तक घेतले आणि खडाखडा स्पष्ट उच्चार करून वाचून दाखवले. ते वाचताना त्याच्या डोळ्यांत चमक होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता.

शरद यांनी त्याला बरेचसे प्रश्न विचारले. ज्याचे त्याने अचूक उत्तरे दिली. गणित विचारले तर त्याने क्षणाचाही विलंब न करता बरोबर सांगितले. एवढेच नाही त्याचे इंग्रजीही चांगले होते.

त्याच्या उत्तराने शरद चाट पडले. त्यांनी त्याला विचारले," कितवीला आहेस तू  आणि कोणत्या शाळेत शिकतोस?"

"चौथी वर्ग पास झालो, इथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो." राम आधी उत्साहाने व नंतर चेहरा बारीक करून खाली मान घालून म्हणाला.

"शिकत होतो म्हणजे? " शरदने प्रश्नार्थक नजरेने पाहत कपाळावर आठ्या पाडत विचारले.

तोच काही बोलणार तोच काम करणाऱ्या रखमा आणि विठोबा यांनी दुरून ते पाहिले. आणि ते दोघेही लगबगीने येथे आले. त्यांना वाटलं राम त्यांना उलट उत्तर दिले की काय?

"माफ करा, मालक. पोराचं काय चुकलं असल तर." विठोबा रामकडे नाराजीने पाहत हात जोडत शरद यांना म्हणाला.

क्रमशः

काय उत्तर असेल शरदचे?