Login

आई बाबा रिटायर्ड होत आहेत ! भाग -7

कौटुंबिक आणि सामाजिक
भाग -7

अनेक दिवस गोडी गोडीने निघुन जातात, पण एक दिवस.

" संगीता काय गं, अशी झोपली का आहेस..? वाजले बघ किती..? " बेडरूम मध्ये बेडवर झोपलेल्या संगीताला मीना ताई विचारतात.
घड्याळात तब्बल सात वाजलेले असतात, आणि त्यात संगीताची ऑफिस ला जायची वेळ झालेली असते.

मीना ताई घाबरत घाबरत, आत तिच्या बेडरूममध्ये जातात, " काय झालं काही बरं वगरे नाही का..? " मीना ताई तिची प्रेमाने विचारपूस करतात.

संगीता उठून बसते, " नाही ओ आई, ते आज कामवाली बाई येणार नाही आहे. त्यामुळे विचार पडलाय कस करू." आणि संगीता थोडं तोंडाचे हावभाव बदलते.
" म्हणुन म्हटलं काय कराव, आणि त्यात काल रात्रीपासुन जरा अंग मोडल्या सारखं झालंय. " असं बोलुन संगीता स्वतःचेच हात पाय दाबते.

" अरे देवा.. " हे ऐकुन मीना ताई थोड्या हळव्या होतात, आणि तिच्या कपाळावर हात लावतात.
" ताप तर नाही आहे, बरं बरं तु आराम कर. आणि जमल्यास कामाला जा. " मीनाताई तिला समजावतात.

" पण जेवण वगरे करायचं आहे ना, मी करते थोडा आराम करून. तुम्ही काही दगदग करू नका आई. " संगीता मुद्दाम बोलत होती कि काय हे मीनाताईच्या लक्षात येत नव्हत. पण इतके दिवस छान तर परिस्थिती आणि ती दोघींही सुधारल्या आता, असं मीना ताई चांगल्या गृहीत धरून होत्या.

सकाळ चे दहा वाजतात, मीना ताई नाश्ता आणि चहा करून संगीताला बाहेर हॉल मधुन आवाज देतात.

" संगीता.... अगं... संगीता... चहा तयार आहे बघ आणि नाश्ता पण.. उठ पाहू.. " मीना ताई आवाज देत होत्या.

संगीता तिच्या अनेक आवजावरुन, नंतर उठते. डोळे चोळत चोळत बाहेर येते, " हे काय वाजले किती..? "

" फक्त दहा.. " मीना ताई बोलतात.

" काय....अरे यार, माझ्यामुळे तुम्हला त्रास.. सॉरी आई.. " संगीता मीना ताईंच्या हातावर हात ठेवून.

" अगं असूदेत कि, मी केला काय नी तु केला काय एकच ना.. आणि खा हो.. आवडला कि नाही सांग बरं का.. "मीना ताई बोलतात.

मीनाताई संगीताच्या अशा वागण्याने जरा खुशचं असतात.

संगीता तोंड धुवून फ्रेश होऊन, बाहेर डायनींग टेबल वर येते. समोर नाश्ता आणि चहा पाहुन ती मनोमनी खुश होते," अरे वाह आई धपाटे..? आणि हे काय चहा तोही दुधाचा..?"

" हो तुला आवडतात ना धपाटे..? " मीनाताई कौतुकाने विचारतात.

" हो आवडतात, पण कधी खाल्ले नाही. पण आता तुम्ही आला आहात ना म्हणजे भेटतील कि खायला.. " असं बोलुन संगीता धपाटे आणि चहाचा कप तोंडाला लावते.
"वाह एक नंबर..मन तृप्त झालं.." संगीता बरीच तारीफ करते.

" क्रिश ला उठवते, शाळेत जायची वेळ होईल ना..? " मीना ताई बोलतात.

तेवढ्यात संगीता, " नाही आई आज शनिवार आहे, आज सुट्टीचा वार विसरलात..? " संगीता हसत हसत बोलते.

तेवढ्यात सावंत सकाळचा फेर फटका मारून येतात, " आलात... बसा...चहा आणि नाश्ता केला आहे देते. गरमा गरम धपाटे आहेत , आवडतात ना तुम्हाला.. "

मीना ताईंचा विस्कटलेला अवतार पाहुन, सावंत पाहतच राहतात. ते विचारणार तेवढ्यात संगीता समोर एका प्लेट मध्ये धपाटे आणि कपभर चहा आणून देते, " बाबा तुम्हाला काय सांगु.. आज आईंच्या हातचे धपाटे आणि चहा खाऊन मन तृप्त झालं माझं.. " संगीता फार कौतुकाने बोलते.

सावंत काहीच न बोलता गप्पपणे धपाटे आणि चहा खातात.

पण ते मध्येच हळूच मीना ताईंकडे पाहत असतात.
दुपारची वेळ होते, मीना ताईंनी सारा स्वयंपाक केलेला असतो

सावंत गप्पपणे आराम खुर्चीत बसुन, सारं काही पाहत असतात पण एका शब्दानेही ते काही बोलत नाही.
" हुश्श... " आणि मीनाताई त्यांच्या बाजूलाच येऊन बसतात.

" थकलीस...? " सावंत विचारतात.

" छे... ओ... मी कुठे थकली... ते गरम झालं ना म्हणुन.. बाकी काही नाही... " आणि चेहऱ्यावर आलेला घाम मीनाताई पदराने फुसतात.

पण तरीही न राहुन सावंत विचारतात, " हे काय आज नीता आली नाही का..? "

सावंतांच्या प्रश्नावर मीनाताईंना काय उत्तर द्यावं हेच कळेना, कारण सकाळ पासुन चाललेली लगबग सावंत मुकाट्याने पाहत होते.

" नाही ते, तिला बर नाही ना म्हणुन. पण येईल ती उदया पासुन, बरं तुम्हाला भूख लागली आहे का..? " विषय वळवण्यासाठी मीनाताई विचारतात.

" तु विषयांतर करू नकोस.. " सावंत बोलतात.
तिला सावंतांच्या बोलण्यात राग दिसुन येत होता.