Login

आई बाबा रिटायर्ड होत आहेत भाग -5

सामाजिक आणि कौटुंबिक
सकाळ होते, मीनाताई आणि सावंत बॅग पॅक करून निघायच्या तयारीला लागतात.

मीना ताईंच्या डोळ्यात अश्रु तर होते, पण आनंद अश्रु समजावे कि अजुन काही हे सावंतांना समजत नव्हते.

सावंत तिच्या खांद्यावर हात ठेवतात, " काय गं काय झालं, आता तर तुझ्या मनासारखं होतंय ना. "
मीनाताई त्यांचा हात हातात घेतात, " तस नाही, आपण घेतलेला निर्णय पुढे जाऊन चुकीचा नाही ठरणार ना..? "

सावंतांना मीनाताईंच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं हेच कळत नव्हतं, सावंत शांत होतात आणि थोडा लांब श्वास घेतात, " हे बघ मीने हा निर्णय सर्वस्वी माझा आहे, तु स्वतःला ह्यात जबाबदार नको समजूस. " सावंत शांतपणे समजावतात.

तेवढ्यात दारावरची बेल वाजते, " आता कोण आलं..? कोणी येणार होतं का..? " सावंत मीनाताईंना विचारतात.

" नाही तर, आता कोणी येणार नव्हतं. " मीनाताई बोलतात.

मीनाताई जाऊन दार उघडतात, " हे काय तु..? आता ह्या वेळेला इतक्या सकाळी..? "

" मीने कोण आहे गं..? " सावंत विचारतात.

" विशाखा आली आहे. " मीना ताई सावंतांच्या प्रश्नाचं उत्तर देत.

" ये आत ये. " मीना ताई तिला आत घेतात, आणि दार लावतात.

विशाखा आई वडिलांनी भरलेलं सामान आणि बॅग पाहते, " म्हणजे ठरलं तर तुमचं. " विशाखा हताश होऊन बोलते.

" अगं ठरलं म्हणजे..? विशाल आम्हाला आता त्यांच्या सोबतच ठेवणार आहे. " मीनाताई बोलतात.

पण मीनाताईंचा स्वर तिला, बरंच काही सांगुन जातो.
"अगं आई मग हे आनंदाने सांग कि.." विशाखा बोलते.

मीना ताईंना कळतं तिला नक्की काय म्हणायचं आहे ते " तुला नक्की काय बोलायचं आहे..? " मीना ताईंची बोलताना चिडचिड होत होती.

विशाखा बाबांजवळ जाते आणि त्यांचा हात हातात घेते, " तुम्ही दोघ ही माझ्या घरी चला, तिथे रहा. आमच्या दोघांशिवाय त्या घरात कोणी नाही. आपण राहू कि एकत्र.. " विशाखा विनवणी करते.

सावंत तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवतात, " नको बेटा, तु म्हणाली तेच ऐकुन खुप बर वाटलं. पण हा पुढे जाऊन जर गरज वाटली तर तुझा हा बाबा नक्की तुझ्या जवळ येईल. पण आता नको, तु जावई बापूंची काळजी घे आणि सौंसार सुखाचा कर. " हे बोलुन सावंत आणि मीनाताईंच्या डोळ्यांतुन पाणी येत.

" बाबा अहो.. " विशाखा त्यांना समजावण्याचा खुप प्रयत्न करते, पण आता तिच्या प्रयत्नांना काही अर्थच नव्हता.

" बर आम्ही आता निघतो, ही घराची चावी जमल्यास महिन्यातून एकदा तरी इथे फेरी मारत जा.. " असं बोलुन सावंत विशाखाच्या हातात घराची चावी देतात.

" बाबा अहो माझ्याकडे का चावी..? नाही आता ह्यावर तर पूर्ण हक्क विशाल चा आहे ना.." विशाखा ला प्रश्न पडतो.

" असूदेत.. मी अजुन एक चावी घेतली आहे करून ती देईन त्याला.. " सावंत हसत हसत बोलतात.
त्यांचं हे वागणं पाहुन मीनाताई आणि विशाखा गोंधळात पडतात.

सावंतांच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे ह्याची जरा ही कल्पना मीना ताईंना लागत नव्हती.

सावंत आणि मीना ताई दोघंही रिक्षा करून विशालच्या घरापाशी पोहचतात.

सावंत खिशातले सुट्टे पैसे काढुन त्या रिक्षावाल्याच्या हातात देतात.

" विशाल कसा दिसत नाही, त्याला कल्पना होती ना आपण येतोय ते आता मग...? " मीना ताई जरा चिडतच बोलतात.

दोघांचीही वये झाली होती, आणि वयामाना नुसार मन आणि शरीर दोन्ही थकलं होतं.
त्यात विशाल खाली घ्यायला न आलेला पाहुन त्यांचं डोकं अतिशय सनकल होतं.

" अगं असूदेत कि, मी आहे ना.. " सावंत तिला समजावत बोलतात.

सावंत बॅग घ्यायला खाली वाकणार तेवढ्यात विशाल येऊन त्यांच्या हातातली बॅग घेतो.
" अहो बाबा तुम्ही कुठे, मी आहे ना. " विशाल च्या बोलण्यातली न जाणो चलाखी मीना ताई आणि सावंतांच्या लक्षात येत होती.

" मला वाटलं तु काही आम्हाला घ्यायला यायचा नाही, तु दिसलास नाही ना.. " मीना ताई बोलतात.

" अगं आई असं काय बोलतेस, अगं क्रिश चा अभ्यास घेत होतो ना म्हणुन.. पण आता आलोय ना.. " विशाल हसतच उत्तर देतो.

विशाल, मीना ताई आणि सावंत सोसायटीत प्रवेश करतात. सोसायटीत असणारी शांतता आणि आजूबाजूच वातावरण पाहुन मीना ताई घाबरतात.

" अहो,,, किती ती भयानक शांतता.. " मीना ताई सावंतांचा घट्ट हात पकडते.

क्रमश...