Login

बडबोल्या शाम

बोधकथा
ही गोष्ट आहे जुन्या काळातील एका शाम नावाच्या माणसाची! तो एक व्यापारी होता आणि त्या निमित्ताने तो देश विदेश फिरायचा त्याकाळी दळणवळणाच्या सोयी-सुविधा कमी होत्या त्यामुळे लोकं जास्त करून गाव आणि जवळपासची गावे सोडून कुठे ही जात नसत. त्यांच्या गावात शामच एकटा असा होता जो देश विदेशी फिरायचा.

तर तो जेंव्हा गावी यायचा तेंव्हा त्याच्या प्रवासातील आणि विदेशातील गमती-जमती ऐकण्यासाठी लोकं त्याच्या भोवती गोळा व्हायची. तो ही रंगवून छान वर्णन करून त्यांना सांगायचा. पण त्याला एक घाण खोड होती ती म्हणजे बडाया मारण्याची. तो खूप मोठ्या-मोठ्या बडाया मारायचा. इथे गेलो होतो तर इथल्या राजाने माझी दाखल घेतली. तिथे गेलो होतो तर तिथल्या प्रधानांनी मला सल्ले विचारले. लोकं बिचारी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायची. लोकांना वाटायचं हा खूप मोठा माणूस आहे पण त्यात राम नावाचा त्याचा मित्रही असायचा जो शेतकरी होता त्याच्या बढायावर त्याला मात्र विश्वास बसायचा नाही. तरी तो शांत बसायचा त्याला वाटायचं की एक दिवस शाम अशी काही बढाई नक्की मारेल ज्यामुळे आपल्याला त्याचे पितळ लोकांच्या पुढे उघडे पडता येईल. तो त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.

असाच शाम व्यापारासाठी गावातून निघून गेला आणि तब्बल तीन महिन्यांनी परत आला. तेंव्हा नेहमीप्रमाणे त्याच्या भोवती संध्याकाळच्या वेळी पारावर लोकं जमा झाली. रामही त्यात होताच. शामच्या बढाया सुरू झाल्या.

शाम,“ तुम्हाला सांगतो तिथल्या राजाने मला जेवायला बोलावले होते. आणि तो माझ्या बुद्धीवर इतका खुश झाला की मला त्याचा महामंत्री म्हणून रहा म्हणत होता. पण मी नको म्हणालो.

राम,“ मग राहायचं ना. कशाला आलास परत?” त्याने विचारलं.

शाम,“ नको रे बाबा आपला गाव आणि आपला देशचं बरा.” तो फुशारकी मारत म्हणाला.

राम,“ ते पण आहेच म्हणा.” तो नाटकीपणे हसून म्हणाला.

शाम,“ तुम्हाला सांगतो तिथंली लोकं घरच्या छतावरून उड्या मारण्याचा खेळ खेळतात.”

एक माणूस,“ काय? आणि त्यांना लागत नाही का?” त्याने आश्चर्याने विचारलं.

शाम,“ आरे उडी मारताना एक मंत्र म्हणतात ते.आणि उडी मारतात मग काय अलगद माणूस हवेत तरंगत खाली येतो. तो मंत्र तिथल्या राजांनी मला ही शिकवला आहे.” तो फुशारकी मारण्याच्या नादात काय बोलतोय त्याला देखील कळत नव्हतं आणि रामकडे तर आयती संधी चालून आली होती.

राम,“ आरे वा! कसलं भारी ना. मग एक काम कर ना ती सावकारांची माडी आहे ना त्याच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून दाखव ना आम्हाला. कसलं भारी वाटत असेल ना रे हवेतून तरंगताना?” तो मुद्दाम म्हणाला.

“ हो हो दाखव ना रे उडी मारून आम्हाला सगळ्यांना पहायचं आहे.” तिथे जमलेले सगळे लोक म्हणायला लागले. आता मात्र शाम थोडा गडबडला.

शाम,“ आरे असंच कसं मारणार उडी त्याचे काही नियम आसतात. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन मग तो मंत्र म्हणावा लागतो आणि मग उडी मारावी लागते. तेंव्हा हवेत तरंते माणूस.” तो टाळाटाळ करत म्हणाला.

राम,“ हरकत नाही आपण उद्या जमा होऊ सकाळी मग मार उडी.” तो म्हणाला आणि सगळ्यांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

शाम मात्र आता चांगलाच गडबडला होता. आज तर त्याने स्वतःची सुटका करून घेतली होती पण उद्या, उद्या काय करायचे हा विचार त्याला सतावत होता. तो या विचारातच घरी गेला. त्याला आज अन्न ही गोड लागले नाही. त्याने रात्री शेजारच्या गावात निघून जाऊ आणि परत आल्यावर कोणी तरी वारलं होतं . त्यामुळे त्याला जाणे भाग पडले असे सांगू.असा विचार केला आणि तो जायला निघाला दार उघडून तो बाहेर पडला तर राम आणखीन दोघे त्याच्या घरा बाहेर उभे होते.

राम,“ कुठे निघालास इतक्या रात्री शाम?” त्याने विचारलं.

शाम,“ ते शेजारच्या गावात माझे एक नातेवाईक वारले आहेत तर मला जावे लागेल. निरोप आला होता तसा.” तो आता चाचरत बोलत होता.

राम,“ पण आम्हाला तर कोणीच निरोप घेऊन आलेलं दिसलं नाही. तुला स्वप्न वगैरे पडले असेल. जा झोप जा.” तो म्हणाला आणि आता मात्र शामला घरात परत जाण्या वाचून पर्यायच राहिला नाही.तो आवंढा गिळून घरात निघून गेला.

रात्र अशीच गेली आणि सकाळी सगळा गाव सावकाराच्या माडी बाहेर गोळा झाला. सावकार देखील उत्सुक होता शाम कसा उडी मारून हवेत तरंगतो ते पहायला. शाम खूप वेळ झाला तरी आलाच नाही म्हणून मग सावकाराने काही लोकांना त्याच्या घरी त्याला घेऊन यायला पाठवलं. नाईलाजाने शामला तिथे यावे लागले. तो खूप घाबरला होता. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारायची म्हणजे एक तर हात-पाय गळ्यात येणार किंवा जर डोक्यावर पडला तर मृत्यू ही होऊ शकतो. या विचाराने शाम गर्भगळीत झाला आणि त्याने सरळ जाऊन लोकांच्यासमोर हात जोडले.

शाम,“ मी खोटं बोललो. मला कोणत्याही राजाने असा कोणताही मंत्र दिलेला नाही ज्यामुळे माणूस वरून उडी मारून हवेत तरंगेल. मी तुमच्यासमोर उगीच फुशारक्या मारल्या. मला माफ करा.” तो रडत बोलत होता.

राम,“ हा व्यापारासाठी देश-विशेष फिरतो आणि आपल्याला येऊन खोट्या फुशारक्या मारतो. हे आपण सगळे भाबडेपणाने विश्वास ठेवतो पण मला हे सिद्ध करता येत नव्हतं म्हणून मी इतके दिवस गप्प होतो. पण आता तुम्हा सगळ्यांना याचा खोटेपणा कळला ना? इथून पुढे याच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही.” तो म्हणाला.

आणि लोकांनी शामला बोल लावला. त्यानंतर त्याच्याकडे कोणीही प्रवासातले किस्से ऐकायला गेलं नाही.

तात्पर्य- खोट्या फुशारक्या मारून माणूस स्वतःवर संकट ओढावून घेऊ शकतो.
©स्वामिनी चौगुले