मोठा जावई भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर
" तुझ्या माहेरी काय मोठ्या जावयाला कमीपणा दाखवायची चढाओढ लागली आहे का ? " रोहन घरी आल्या आल्या सुनीतावर आगपाखाड करू लागला.
सुनीताच्या छोट्या भावाचा आज साखरपुडा होता. म्हणून सुनीता आणि दहावेळा विनवणी केल्यामुळे रोहन साखरपुड्याला गेले होते.
रोहनच बोलणं ऐकून सरस्वतीबाई देखील तोंडसूख घेऊ लागल्या. "माझ्या मुलाचं नशीबच फुटकं म्हणून अशी लोकं भेटली आम्हांला. "
" नाहीतर काय ? नाहीतर सासरी जावयाला किती मान दिला जातो. " रमेशराव देखील मध्ये बोलले.
हे सर्व ऐकून सुनीताने आज सर्व संपवायचं असं ठरवलं आणि सर्वासोबत तिथेच बसली. आणि विचारू लागली.
सुनीता, " मला सांगाल रोहन तुम्हाला असं का वाटलं ? आणि कोणत्या गोष्टीवरून असं वाटलं की माझ्या माहेरचे तुम्हांला कमीपणा दाखवत आहेत ? "
रोहन चिडून, " का वाटलं म्हणजे, २ वर्षांपूर्वी लग्न झालं ना तुझ्या छोट्या बहिणीचं ? आपल्या लग्नाला सहा वर्षे झालीत. तरी जिथे तिथे त्याचं नाव. अमन इथे जरा बघा. अमन एकदा स्वयंपाक वेळत होईल याची खात्री करून घ्या. अमन तुम्ही अजून तयार नाही झालात ? जा तयार व्हा. अमन अमन अमन.... "
सुनीता, " बरं मग ? "
रोहन, " बरं मग ? म्हणजे काय ? मला नाही कधी असं वागवलं. "
सुनीता, " बरं.. मला सांगा , माझ्या माहेरच्यांनी तुम्हांला सांगितलं असतं, जा जाऊन स्वयंपाकाच बघा तर तुम्ही गेले असते ? "
रोहन, " मी काय नोकर आहे का ? सासरी ही कामे करायला ? "
सुनीता शांतपणे, "हेच ना..... तुम्ही फक्त मोठे जावई आहात. ज्याचा कधी पापड मोडेल सांगता येत नाही. सहा वर्षे झाली आपल्या लग्नाला, कधी माझ्या माहेरी तब्बेत विचारायला फोन केलात ? सहज जाऊ दया, गेल्या वर्षी माझे बाबा हॉस्पिटल मध्ये होते. तेव्हा तरी ? उलट मी निघाले तर मला प्रश्न काय केलात ? " घरी जेवायचं कसं होईल. "
त्यावेळी माझ्या छोट्या भावासोबत अमन होते. खंभीरपणे. ऑफिसतली कामे जी जास्त महत्वाची होती, त्यांनी ती फोनवर हाताळली. तीन दिवस हॉस्पिटल मध्ये होते ते. आणि हो हे उपकार नाही हा, त्यांचं म्हणणं होत माऊ म्हणजे माझी बहीण त्यांच्या घरी सर्वांची काळजी घेते. ते जर तिचं कर्तव्य आहे तर हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. त्यांनी जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून माझ्या माहेरी मान मिळवला आहे.
ते कधीही घरी गेले, अगदी अचानक सुद्धा तरी सर्वाना प्रचंड आनंद होतो. कारण घरात चटणी भाकरी असली तरी ते चवीने खातात. माझ्या वडिलांना अगदी स्वतःच्या वडिलांसारखा मान देतात. त्यांचा मस्करी करण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे ते गेले की घरात वातावरण हसर होत. साखरपुड्यात सुद्धा, वडिलांना एकट्याना जबाबदारी जमणार नाही म्हणून ते मदत करत होते. आणि माझ्या घरचे सुद्धा त्यांना आपल्या मुलासारखं वागवत होते. बाबा बरे झाले त्यानंतर अमन त्यांना देवदर्शनाला घेऊन गेले. एक मुलगा करतो तेवढं ते करतात.
या उलट तुम्ही.....
क्रमश:
