Login

मोठेपणा

नणंद -भावजयच्या नात्यावर ही कथा.
मेघा आपल्या आई,भाऊ —सागर आणि भावजय—सोनालीसोबत सांगलीला राहत होती. तिच्या बाबांना जाऊन तीन वर्ष झाले होते.

ती अभ्यासात खूप हुशार होती.लहानपणापासूनच तिला वाचायची खूप आवड होती.
तिचं B.Ed नुकतंच पूर्ण झालं होतं.

भावाच्या लग्नाला वर्ष होत आलं होतं.

सुरुवातीला तिची वहिनी सोनाली अगदी मधुर होती.
पण हळूहळू तिच्या बोलण्यातून कटुता, चिडचिड आणि असंतोष बाहेर यायला लागला.
भाऊ पण वहिनीची साथ देऊ लागला. जो भाऊ तिच्याकरिता ढाल होता, तोच आता वहिनीच्या बाजूने उभा राहू लागला. मेघाचं घरातलं अस्तित्व जणू भिंतीच्या सावलीसारखं हलकं झालं.

मेघा नोकरी शोधत होती. घरी असलेली नणंद,वहिनीला रुचत नव्हती.

“मेघाचं लग्न करू या,” हा निर्णय एक दिवस भावानी घेतला.
आई काही बोलू शकली नाही. हातात पैसा नसला की माणूस शब्दानेही गरीब होतो.

असंच, तिचं लग्न एका साध्यासुध्या, घरात ठरलं.
लग्न करून आल्यावर तिला सासरची परिस्थिती कळाली.

घरात सासरे लकवाग्रस्त होते , दोघी नणंदा कॉलेजमध्ये आहेत ... आणि एकमेव कमावणारा अमोघ — तिचा नवरा.


सासूने सुरुवातीला तिला नोकरी करू दिली नाही.
पण घरातील खर्च, औषधं, नणदांच शिक्षण — हे सगळं एकट्या अमोघवर होतं.खर्च वाढत होता .

मेघा शांतपणे सगळं पाहत होती.

एकदिवशी मेघा हळूच सासूला म्हणाली —"सासूबाई आता दोघी कॉलेजमध्ये आहे. त्यांचा खर्च, घर खर्च सगळं मॅनेज होत नाहीये. अमोल एकटा किती करणार??"..

सासू म्हणाली —
“मेघा, तू बरोबर म्हणते,आता घराला हातभार लागणं गरजेचं आहे.”

मेघा माहेरी आली होती, तिने आईला सगळं सांगितलं. आईसमोर बसल्याबसल्या तिच्या गालावरून एक शांत आसू ओघळला. वहिनीच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्याचा भाव होता—
“तुझ्या सासूने तुला कामाला जायला कशी परवानगी दिली ?”

मेघाने उत्तर दिलं—
“वहिनी तो आमच्या घरातला विषय आहे, तुम्ही ह्यात नका पडू .”


मेघाला एका चांगल्या शाळेत नोकरी मिळाली.
पगार कमी होता, पण तिच्यातला आत्मविश्वास वादळासारखा उभा होता.


नंतर तिने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले आणि शेवटी ती सरकारी शाळेत शिक्षिका झाली.

काळ सरत गेला.
अमोघ आणि मेघानी समजूतदारीने घर सांभाळून घेतलं होतं.
नणंदा मोठ्या झाल्या,त्यांचं शिक्षण पूर्ण झालं.
मेघा वरिष्ठ शिक्षिका झाली. तिच्या हातात अधिकार आला, पण मनात कधी अभिमान आला नाही.

त्या काळात ती एक मुलगी — अन्विकाची आई पण झाली.
ती आता पहिल्या वर्गात होती.

एक दिवस सासू म्हणाली —
“ आता दोन्ही मुलींचं लग्न करायचं.”

पण मेघा ठाम आवाजात म्हणाली—
“त्यांना नोकरी लागल्याशिवाय त्यांचं लग्न करणार नाही. त्या आपल्या पायावर उभ्या राहू दे.आम्हाला त्या काही ओझं नाहीये.”

सगळं सुरळीत चाललं होतं तेवढ्यात, एक संध्याकाळी तिच्या आयुष्याचा रंग बदलला.
माहेरहून फोन आला — भावाचा अपघात झाला, आणि त्यात त्याला देवाज्ञा झाली.

मेघा धावत माहेरी पोचली.
घरात शोक, आईचं हतबल रडणं, वहिनीचं कोसळणं...
तिने सगळ्यांना सांभाळून घेतलं.
भावाला जाऊन तेरा दिवस झाले होते.
ती आता सासरी जायला निघाली होती.
ती भाचीकडे बघत म्हणाली —"तुला इंजिनियर व्हायचंय ना, खूप मन लावून अभ्यास कर.

भावाकडे त्या घराशिवाय काहीच नव्हतं. रोजचा कमवा-रोजचा खर्च.
वहिनी तुटून गेली होती.

मेघा आपल्या भाचीला जवळ घेत म्हणाली —
“हिचं शिक्षण, हिचं भविष्य… आता माझी जबाबदारी आहे. इंजिनीयरिंगसाठी जेवढा पण खर्च होईल मी करीन. माझ्या भावाची ओळख कायम ठेवणारी हीच आहे .”

वहिनी तिच्याकडे पाहत म्हणाली—
“मेघा… मला माफ कर . तुझ्यावर किती अन्याय केला मी. पण आज जाणवतंय— तुझ्यासारखी मनं दुर्मिळ असतात.”

टपटप अश्रू गळत होते.
पण मेघा फक्त म्हणाली—
“जे झालं ते जाऊ दे वहिनी, पुढे नीट राहायचं प्रयत्न करू.”

नंतर मेघा आणि अमोघने छान मुलं बघून तिच्या दोन्ही नणंदांचे लग्न थाटात केले .
आणि भाचीच्या शिक्षणासाठी जे ती करू शकत होती ते तिने सगळं केलं.


‘जगात मोठेपणा पैशात नसतो, मोठेपणा मनात असतो.’