भाग पाच
सुरुवातीला उपस्थित समस्त सुनवास भोगणाऱ्या सासवांना मंचावर जाऊन माईकवर बोलण्याची घाई झाली होती. पण आता एकेकीचे अनुभव ऐकून कुणी मूग गिळून गप्प बसलं होतं, तर कुणी तोंडात मिठाची गुळणी धरली होती, काहींची तर जीभच टाळूला चिटकली होती.
तेवढ्यात माईकवरून एक नाजूक आवाज ऐकू आला. “नमस्कार मी आर. के. ची आई आणि भावी सासू.”
आर के हा शब्द ऐकताच अनेकींच्या डोक्यात अनेक विचार पिंगा घालू लागले. सायलीच्या सासुला वाटलं, ‘ही ऋषी कपूरची आई आहे की राज कपूरची आई? रणधीर कपूरची आई की रणबिर कपूरची आई?’
“अय्या! म्हणजे इथे हिंदी सिनेमातील मोठमोठ्या कलाकारांच्या आया पण त्यांच्या सुनांची गर्हाणी घेऊन येतात वाटतं.” तृप्तीच्या सासू शिवाय आणखी कोण?
चित्राच्या सासूला वाटलं, ‘ऋषी कपूर आणि रणधीर कपूरची आई एकच असेल ना! कारण ते दोघेही एकमेकांचे भाऊ, रणबिर कपूरची असेल तर ही नीतू सिंग सारखी दिसायला हवी, पण ही तर वेगळीच दिसते आहे.’
आपण उच्चारलेल्या आर. के. या नावाने घातलेला घोळ लक्षात घेऊन मंजुळ स्वरांनी परत एकदा सांगितलं, “अहो आर. के. म्हणजेच राघव मी त्याची आई.”
“अय्या! म्हणजे ही राघव चढ्ढाची आई आणि परिणीती चोप्रा हिची सून!” परत एकदा तृप्तीची सासू.
“परिणीती चोप्राने काय दिवे लावले असतील ग?” श्रावणीची सासू खुशीच्या सासूच्या कानात कुजबुजली.
“ए बाई जरा लक्ष देऊन ऐक ना! तिने काय म्हटलंय होणारी भावी सासू, तिच्या मुलाचं लग्न व्हायचंय अजून, म्हणजे परिणीती चोप्रा नक्कीच नाहीये.”खुशीची सासू वैतागून बोलली.
‘खरंच आपल्या कसं लक्षात आलं नाही.’ श्रावणीची सासू स्वतःवर चिडली.
“तर मैत्रिणींनो,” राघवच्या आईने आपले अनुभव सांगायला सुरुवात केली. “माझा राघव फार गुणी मुलगा आहे हो! पण एकेक अशा मुली चालून आल्या विचारूच नका.”
“नाही विचारत कशाला जाऊन तिथे उभी राहून बडबड करते आहे.” श्रावणीची सासू.
“नाहीतर काय? इथे आपण सुना आणुन बेजार आणि ही चालली वधू संशोधनाचे अनुभव सांगायला.” खुशीची सासू.
“अगदी पहिल्यांदा जेव्हा आम्ही मुलगी बघायला गेलो ना, तर त्या मुलीने माझ्या राघवला विचारलं, ‘तुम्हाला शेपूची भाजी, मेथीची भाजी, चाकवताची भाजी आणि पालकाची भाजी यातला फरक कळतो का?”
“मला फरक कळो ना कळो, पण तुम्हाला या सगळ्या भाज्या करता येतात का?” माझ्या राघवने तिला ठणकावून विचारले.
“नक्कीच नकार आला असेल.” सायलीच्या सासूने अंदाज व्यक्त केला.
“नकार आला हो त्या स्थळाकडून! माझा एवढा हिरमोड झाला. मला खूप आशा होती की, ती मुलगी माझ्या मुलाला पसंत करेल, पण जाऊ द्या ‘परमेश्वराची जशी इच्छा!’ असं म्हणून आम्ही त्या स्थळाचा विचार सोडून दिला.”
“त्यानंतर अगदी आठवड्याभरातच आम्हाला दुसऱ्या स्थळाकडून बोलावणं आलं. यावेळी मी राघव कडून सर्व भाज्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली. त्याला म्हटलं, ‘उगीच उलटून उत्तर द्यायचं नाही, काही मनाला नाही पटलं तरी गप्प बसायचं, शेवटी तुझं लग्न होणं महत्त्वाचं आहे काय?’ माझं म्हणणं त्याला पटलं आणि त्यांने नुसतीच नंदीबैला सारखी मान डोलावली.
यावेळी त्याची भाज्यांची ओळख परेड सुरू झाली. मेथी, पालक, शेपू, चाकवत, आंबट चुका, लालमाठ, अंबाडीची भाजी, आणि इतर जगाच्या पाठीवर असतील नसतील तेवढ्या सगळ्या पालेभाज्यांची त्याच्या कडुन वारंवार उजळणी करून घेतली. त्याशिवाय तोंडली, ढेमसे, पडवळ, दुधी भोपळा, शिरी दोडके, गीलके, गाजर, मुळा, काकडी, बीट, या सगळ्या भाज्या त्याला रोज रोज दाखवून अगदी स्मरणात पक्क्या ठेवायला सांगितल्या. अजूनही कुठेही चुक होऊ नये म्हणून बटाटे, रताळे, सुरण, फणस यासारख्या इतर अनेक भाज्यांचे इंटरनेटवर फोटो दाखवून, दाखवून त्याला अगदी मुखपाठ करायला लावल्या. इतक्या सगळ्या भाज्या लक्षात ठेवायच्या म्हणून माझ्या मुलाचं तोंड अगदी कारल्यासारखं कडू झालं.”
“मग झाली का पसंती.” सायलीच्या सासूची उत्सुकता शिगेला पोहोचली.
“नाही ना! आमचा अंदाज सपशेल चुकला. आम्ही ज्या मुलीला बघायला गेलो होतो ना तिने राघवाला रंग ओळखता येतात का म्हणून विचारले.”
‘नारंगी, डाळिंबी, किरमीजी, करडा, राणी कलर, मोरपंखी निळा, शेवाळी, लिंबु कलर, गर्भ रेशमी हिरवा,पानेरी या रंगांमधला फरक कळतो का विचारलं.”
“आता मध्येच रंगांचं काय काढलं?” अनुची सासू.
“आम्हालाही अगदी असंच वाटलं तर ती मुलगी म्हणाली, ‘तिच्या एका मैत्रिणीने डाळिंबी रंगाची पैठणी शोधण्यासाठी अख्खा कपडा बाजार पालथा घातला, शेवटी वैतागून नवऱ्याचं आणि तिचं भांडण झालं आणि घरी जाऊन तिने नवऱ्याचे सगळे कपडे कपाटा बाहेर फेकले. त्या ठिकाणी मी असते तर नवऱ्याला सरळ काडीमोडच दिला असता,’ असं ती बोलल्यावर, आम्ही काय बोलायचं शिल्लकच राहिलं नाही, गप गुमान आम्ही माघारी फिरलो.”
“काय बाई आज कालच्या मुलींचा साडीच्या रंगासाठी सोस.” सायलीची सासू.
“साड्या घ्यायच्या पण घालायच्या नाही, नुसते जीन्स घालून गावभर उंडरत राहायचं आणि म्हणे डाळिंबी रंगाच्या साठी काडीमोड देईन.” चित्राची सासू.
“मी परत एकदा राघवाला दिलासा दिला, म्हटलं बरं झालं डाळिंबी रंगावरून रामायण, महाभारत होण्याऐवजी ह्या स्थळाला नकार दिलेला बरा. तर मुलीकडच्यांकडूनच निरोप आला की तुमच्या मुलाला ‘पानेरी रंग’ कळत नाही म्हणून आम्हाला हे स्थळ पसंत नाही.” राघवच्या आईचा रडका स्वर.
“चोराच्या उलट्या बोंबा.” श्रावणीची सासू.
“नाहीतर काय! हात दाखवून अवलक्षण, काय तर म्हणे पानेरी रंग!” खुशीची सासू.
“तिसरा किस्सा तर खूपच मजेशीर आहे. ती मुलगी अतिशय गर्भ श्रीमंत, पारंपारिक घरातली होती. साडी वगैरे घालणारी. सगळी पसंती झाली मुला मुलीच बोलणं सुरू होतं. तिने राघवला विचारलं, ‘तुम्ही मला पहिल्यांदा भेटायला याल तेव्हा संबलपुरी सिल्क आणाल की कोसा सिल्क? साक्षगंधासाठी माझ्याकडे ना चार चॉईस आहेत म्हणजे बघा, गढवाल सिल्क राजमाता सिल्क, जिजामाता सिल्क की बेंगलोर सिल्क यातला कुठला प्रकार तुम्हाला आवडतो?’ सिल्क मध्येही इतके प्रकार असतात हे ऐकून राघवाने तोंडाचा आ-वासला.
“लग्नात ना तुम्ही माझ्यासाठी बनारसी शालू आणा, किंवा येवला पैठणी किंवा कांजीवरम मला काहीही चालेल.”
“लग्नानंतर घरी घालायला मला प्युअर कॉटन, लिनन, शिफॉन, बांधणी, जॉर्जेट, पाटली पल्लू, यापैकी कुठलीही साडी चालेल.”
“ती बया साड्यांचे एक एक प्रकार आणि नाव सांगत होती आणि माझ्या मुलाला नुसता घाम फुटत होता. अर्थातच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून त्याही स्थळाने त्याला नकारच कळवला.”
“जसे जसे दिवस जायला लागले तसं तसं माझं टेन्शन वाढत होतं आणि राघवाचं वय. त्यामुळे आता कुठलंही स्थळ आलं तरी त्याला नकार द्यायचा नाही असा आम्ही ठाम निश्चय केला पण तरीही लग्न न जमण्याचौ शुक्लकाष्ठ काही आमची पाठ सोडेना.”
“एका मुलीचा होकार आला पण ती म्हणते, की मला सासू उशिरापर्यंत झोपू देणारी हवी, दुसरी म्हणाली, जोपर्यंत घर माझ्या नावे होत नाही तोपर्यंत मी घराची साफसफाई करणार नाही, तिसरी म्हणाली की, तुमच्या मुलाने मला घर कामात मदत करायला हवी, जसं की त्याने स्वयंपाक करावा मी गॅसचा ओटा आवरेन, त्याने भांडी घासावी, मी ती व्यवस्थित नीट लावून ठेवेन, त्याने चहा बनवावा मी ठरवेन चहा चांगला झाला की नाही, त्याने कपडे धुवावे आणि मग मी सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालेन, वगैरे वगैरे.”
“बापरे भयंकरच दिसत आहे.” शिल्पाची सासू.
“एकदा तर सगळं अगदी व्यवस्थित जुळून आलं. मुलगी पण व्यवस्थित होती. मुला मुलीची पसंती ही झाली, पण मधातच तिच्या वडिलांनी विचारलं, ‘तुमच्याकडे शेती आहे का?’ राघवचे बाबा म्हणाले, ‘तुमच्या मुलीला शेतातलं काम येत असेल तर घेतो दहा बारा एकर तिच्या नावाने,’ पुढे त्या मुलीचे वडील म्हणाले, ‘तुम्ही मुलीच्या अंगावर किती सोनं घालणार?’ राघव म्हणाला, ‘तुम्ही जितके तोळे घालाल त्याच्या तिप्पट घालू.’ “दोन महिन्यांनंतर त्यांचा नकार आला.”
“आता तर बाई माझा जीव नुसता टांगणीला लागला आहे, देव जाणो माझ्या नशिबात सूनमुख आहे की नाही?”
“आता दिवाळीच्या मुहूर्तावर माझ्या राघवचं लग्न ठरत आहे. मी तर माझ्या सुनेला साडी, चोळी, फराळ, मिठाई आणि फटाके पाठवून देणार आहे,म्हणजे कसं ना आधीच फटाके पाठवलेले बरे, नंतर सासरी येऊन तिने फटाके फोडण्यापेक्षा काय?”
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून कुणीही त्याचा वापर केलास त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.