भाग चार
अस्मिताच्या सासूचे शब्द उपस्थित महिलांच्या कानात घुमत होते आणि त्या संभ्रमात होत्या की, अस्मिताच्या सासूचे अभिनंदन करावे का डोक्यावर हात मारावा. त्या प्रशस्त हॉलमध्ये एक जीवघेणी शांतता पसरली. ह्याच संधीचा फायदा घेत सायलीच्या सासूने मंचाकडे कुच केली.
माइक सुरू करून खाकरण्याचा आणि खोकल्याचा आवाज करत सायलीच्या सासूने उपस्थित समस्त सासवांचे लक्ष स्वतःकडे वेधले आणि बोलण्यास सुरुवात केली.
सायलीच्या सासूला मंचावर बघून खुशी, श्रावणी आणि राखीच्या सासूला प्रश्न पडला की, ‘ ही कधी समोर गेली?’
“इतक्या सगळ्या जणींनी स्वतःचं नाही तर सुनांचं कौतुक केलं आता आणखीन काय बाकी राहिलं? अनुची सासू मनातल्या मनात विचार करत होती.
आता ही हिच्या सुनेचे काय कारनामे सांगते आणि त्यावर काय अफलातून आयडिया देते याकडे तृप्तीच्या सासूचे लक्ष वेधले होते.
“इथे उपस्थित माझ्या सगळ्या सोशिक, त्रस्त आणि सुनेच्या इशारांवर नाचणाऱ्या मैत्रिणींनो आणि नागिणींनो!”
नागिन हा शब्द ऐकताच उपस्थित सर्व सासवांच्या डोळ्यात रक्त उतरून आले आणि रागात विषयाने त्यांनी मुठी आवळल्या.
आपण काहीतरी चुकीचा शब्द वापरला हे लक्षात घेऊन सायलीच्या सासूने लगेच वेळ मारून नेली, “म्हणजे मला म्हणायचं होतं उपस्थित सर्व भगिनींनो आणि मैत्रिणींनो, चुकून माझी जीभ जर सैल पडली.”
“छे छे आम्ही काय सोशिक, त्रस्त वगैरे नाही आहोत, आणि सुनांच्या तालावर नाचणाऱ्या तर अजिबातच नाही!”उपस्थित समस्त महिलांच्या चेहऱ्यावर असेच भाव होते पण बोलत मात्र कोणीच नव्हतं.
“तर माझ्या सख्यांनो आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या ज्या व्यथा सांगितल्या त्यामुळे मला निरुपा राय, सुलोचना, राखी गुलजार आणि रीमा लागूची आठवण झाली. पण आपण आपलं कर्तृत्व सोडून असं मवाळ धोरण अजिबात स्वीकारायला नको, तर आपला आदर्श ललिता पवार, उषा नाडकर्णी, ऐश्वर्या नारकर किमान गेला बाजार अरुणा इराणी किंवा बिंदू तरी असायलाच हव्यात.”
“हां बरोबर ही अगदी माझ्या मनातलं बोलली.” श्रावणीची सासू.
“अगदी खर आहे आपण आपला असा गुळमुळीतपणा सोडून जरा वागण्यात कणखरपणा आणायलाच हवा.” खुशीची सासू.
“ह्या सगळ्या सिनेमात काम करणाऱ्या सहनायिका इथे या वैतागवाडी सासू संमेलनात काय करायला येणार आहेत?” परत एकदा तृप्तीची सासू.
“आपण जेव्हा सुना होतो तेव्हा सासवांच्या अर्ध्या वाचनात होतो आणि आता परत सुनांच्या तालावर नाचायचं छे छे! माझ्या मनाला हे अजिबात पटत नाहीये. लग्न झाल्यावर सासुरवास सहन करायचा आणि मुलाच्या राज्यात सुनवास? सगळं आयुष्य असं सहन करण्यातच घालवायचं का आपण?”
“पण आजकालच्या इरसाल सुनांसमोर सगळ्यांनाच हात टेकवावे लागतात.” मेघाची सासू.
“हम्म ते ही आहेच म्हणा, पण म्हणूनच आपलं म्हणणं कधीही सोडायचं नाही. कधी गोड बोलून तर कधी उगाच आपण किती उदार आणि आधुनिक आहोत असा केवळ आभास निर्माण करायचा, आणि सून अजिबातच ऐकत नसेल तर अश्रुपात अस्त्राचा प्रभावी वापर करायचा.” सायलीची सासू.
“जगातली एक तरी सासू एका तरी सुनेशी स्वप्नात तरी कधी गोड बोलली आहे का?” खुशीची सासू ऋतुजाच्या सासूच्या कानात बडबडली.
“हो ना आपल्याला जमेल असं काही तरी हिने सांगायला हवं ना! काहीतरी अशक्य कोटीतल्या गोष्टी सांगते आहे ही.” चित्राची सासू.
“आभास निर्माण करायचा म्हणजे? ते निसर्गात चक्रीवादळ निर्माण होतात, कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, पण हे आभास निर्मिती म्हणजे नेमकं आहे तरी काय?” मनातल्या मनात आणखी कोण? परत एकदा तृप्तीची सासू.
“पण हे जमायला हवं ना!” श्रावणीची सासू.
“सुरुवातीला नाही जमत पण हळूहळू सरावाने सगळं जमतं.” सायलीच्या सासूने चिकाटी सोडली नव्हती.
“माझ्या सुनेच्या मैत्रिणी आमच्या घरी जमल्या होत्या भिशी पार्टीला, वर खोट्या खोट्याच बढाया मारत होत्या. एक म्हणे ‘मी तर शॉपिंगला दुबईला जाते भारतात तर काही चांगलं मिळतच नाही, तर दुसरी तिच्यावर कुरघोडी करत सांगत होती, ‘दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मलेशिया, नाही तर मालदीव अगदी ठरलेलं आहे बाई आमचं.’ तिसरी त्यावरचढ म्हणते कशी, ‘अगं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजकाल इथे किssतीss उकाडा असतो ना! म्हणुन तर आम्ही पूर्णवेळ युरोप टूरच करतो.’
“मग मी तिथे गेली आणि प्रत्येकीच माझ्या खास शैलीत कौतुक करायला लागली, त्या दुबई वालीला म्हटलं तुझी सासू तर सांगत होती, की घरातली पेस्ट संपली म्हणून सासु पेस्ट फेकत होती, तर तू किचनमधल्या लाटण्याने त्या पेस्टवर रोल केलं आणि सासूला ती उरलेली पेस्ट वापरायला लावली. सरबत कमी लागावं म्हणून तू पेल्यांमधे बर्फ जास्त आणि सरबत कमी घालतेस, स्नॅक्ससाठी आणलेल्या एका पेस्ट्रीचे तीन तुकडे करून देते म्हणे बाई तू तुझ्या मैत्रिणींना गेट-टुगेदर च्या वेळी.
त्यावेळी तिचा चेहरा अगदी पाहण्यासरखा झाला होता.”
त्यावेळी तिचा चेहरा अगदी पाहण्यासरखा झाला होता.”
“मग दुसरीचा समाचार घेतला, मी तिला म्हटलं ‘तुझी सासू सांगत होती की, वर्षभर तू वर्तमान पत्राची, वह्या, पुस्तकांची रद्दी जमा करून, दिवाळीच्या साफसफाईतल्या भंगारा सोबत ती विकते, मुलांची तुटकी खेळणी, नको असलेले प्लास्टिकचे डबे विकुन पैसे जमा करून तुम्ही मालदीव, मलेशियाला नव्हे तर महाबळेश्वरला जाता आणि सासूला घरीच ठेवता.”
“त्यावेळी तिला असं वाटलं की तीथल्या तीथे धरणी फाकावी आणि तिने त्यात उडी मारावी.”
“माझे हे वाक्य ऐकून तिसरी लगेच जाण्याची घाई करायला लागली. पण तिला मी काय इतक्या सहजासहजी सोडणार थोडीच होती?”
मी म्हटलं,“मागच्या भिशीमध्ये तुझ्याकडच्या क्रोकरी सेटचं सगळेजण खूप कौतुक करत होते ग पण तुझी सासू सांगत होती, तू तो सेट गळणारे केस आणि जुने कपडे देऊन बोहारणी कडून घेतला आहेस. कामवाल्या बाईने बनवलेली सावजी भाजी आणि शाही बिर्याणी तू स्वतःच्या नावावर खपवतेस?”
“माझ्या या वाक्याबरोबर त्या मैत्रिणीला जोराचा ठसका लागला आणि सगळ्याजणी तावातवात उठून निघून गेल्या आणि माझ्या सुनेने परत असल्या फालतू गेट-टुगेदर आणि भीश्यांमध्ये भाग घ्यायचा नाही असा कानाला खडा लावला.”
“कसली जहांबाज बाई आहे ही.” श्रावणीची सासू.
“अगदी बरोबर केलं हिने. या सुना त्याशिवाय वठणीवरच येणार नाही. काय तर म्हणे भिशी पार्टी आणि गेट-टुगेदर.” खुशीची सासू.
“मैत्रिणींनो आपल्याला जर आपल्या सुनेकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर तिला प्रेमाने सांगायचं, ‘आज आपल्याकडे हा सण आहे तो उत्सव आहे त्यावेळी असं करावं लागतं, तसं करावं लागतं, घराण्याची परंपरा आहे, रीत आहे.’
“पण जर तिने सणावाराचा स्वयंपाक करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर मुद्दाम सकाळी लवकर उठायचं आणि स्वयंपाक घरात खुडबुड करायची. तरीही ती उठली नाही तर एखाद दोन भांडी उगाच खाली पाडायची. त्यामुळे सून जरी उठली नाही, तरी मुलगा नक्की उठेल आणि तुमचा सण व्यवस्थित साजरा होईल.”
“कधी कधी हा उपायही चालणार नाही, तेव्हा उगाच मुलासमोर अश्रूपात करायचा आणि सांगायचं, ‘गेली पन्नास वर्षे आपल्या घराण्याची ही परंपरा आहे पण बघ आज आपल्याकडे सणाची कुठलीही तयारी नाही. मला खूप इच्छा आहे रे करायची पण आता वयानुसार होत नाही. मनाला खूप रुख रुख लागली आहे.’ मुलाला असं भावनिक जाळ्यात अडकवलं की, तो बायकोला फर्मान सोडतो आणि सण तुमच्या घरी नक्कीच साजरा होतो.”
“अरे वा काय मस्त एकेक आयडिया देत आहे ही.”श्रावणीची सासू
“संसारात आणि सुने सोबत चांगलीच मुरलेली दिसते आहे.” चित्राची सासू.
“आजच्या संमेलनापुरतं इतकं पुरेसं आहे असं मला वाटतं, मी रजा घेते कारण अजून बऱ्याच जणींना बरच काही बोलायचं आहे. धन्यवाद.”
सायलीची सासू जागेवर येऊन बसली.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.
वरील लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कोणाशीही कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून त्याचा कोणीही कुठल्याही प्रकारे उपयोग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.