Login

वैतागवाडी सासू संमेलन भाग एक

सुने बद्दल सासूचे मत
‘वेंधळ्या सुनांच्या तरबेज सासवा’, ,खवचट टोमणे मारू सासू संघटना’, ‘जहांबाज सासवांच्या बावळट सुना’, ‘बिचाऱ्या सासुरवाशिणींच्या खमक्या सासवा’, ‘सून बदलली नाही तर बदला घेऊ सासू संघटना’, ‘अखिल भारतीय इरसाल सासू संघटना’,अशा अनेक संघटनांच्या काही स्वयंघोषित संस्थापक अध्यक्षा, काही कार्यकारी अध्यक्षा तर काही मानद सदस्यांची ‘वैतागवाडी’ येथील स्वप्नभंग सोसायटीच्या, ‘माझंच खरं’ हॉलमध्ये अतिशय गुप्त परंतु महत्त्वाची बैठक सुरू होती. गुप्त याकरिता की या सभेत उपस्थित राहून स्वतःच्याच मुलाच्या नजरेत स्वतःची किंमत आणि प्रतिमा या गरीब बिचाऱ्या, सुनपिडीत सासवांना कमी करून घ्यायची नव्हती.

मंचावर संस्थेच्या आजजन्म सुनवास भोगणाऱ्या मानद अध्यक्षा - एका मराठी वेबसाईटच्या संचालिकेच्या सासुबाई बसलेल्या होत्या.

त्यांचे अनुभव अतिशय प्रगल्भ असल्याने त्यांनी उपस्थित इतर सासवांना आधी बोलण्याची संधी दिली. त्यामुळे उपस्थित इतर एकाही सासूचा विचार न करता, मला मिळते की दुसरीला,या नियमाला धरून, उपस्थितांपैकी इतर कोणीतरी उठून स्वतःची कैफियत मांडली तर त्यांना आपल्या दुःखाची जाणीव होणार नाही म्हणून चक्क पी. टी. उषाला लाजवेल एवढ्या वेगात खुशीची सासू मंचापर्यंत धापा टाकत पोहोचली आणि तिने आपल्या मनातला सल बोलून दाखवला.

“काय बाई आमच्या पदरी एक ध्यान आलय. अहो साधा चिवडा करण्यासाठी आमच्या घरच्या ‘सुंदरीला’...... ‘आता ही सुंदरी मध्येच कुठून आली?’ असा चेहरा केलेल्या तृप्तीच्या सासूच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून, खुशीची सासू म्हणाली “अहो माझी सून.” “हां हां समजलं, समजलं, असे दाखवल्यावर खुशीच्या सासूचे दुःख अधिकच उफाळून वर आलं. ‘काय बाई एक एक नमुने असतात’ म्हणून शिल्पाच्या सासूने तोंड वाकड करून ओठ उजवीकडे दुमडला, तर ‘अशा बावळट बायका सासवा तरी कशा होतात?’ असे भाव अस्मिताच्या सासूच्या चेहऱ्यावर उमटले.

आता जर उपस्थित सर्व खडूस भगिनींच्या चेहऱ्यावरचे भाव आपण टिपत राहिलो तर मिळालेला पाच मिनिटांचा वेळ कधीच संपून जाईल आणि घरच्या सुंदरीचे म्हणजे खुशी नावाच्या सुनेचे कोड कौतुक करण्याची एक मात्र संधी हुकेल याची जाणीव होऊन एक मोठा उसासा टाकून खुशीची सासू स्वतःचे दुःख सांगू लागली.

“तर माझ्या अतिशय अप्रिय सुनेने दिवाळी करता नुसता चिवडा करायला चार तास लावले हो! मला तर प्रश्न पडला बाई आमची सुंदरी म्हणजे मी रागाने पण तिला प्रेमाने वाटेल अशा शब्दात सुंदरीच म्हणते……हां तर मी काय सांगत होती? सुंदरीने चिवडा बनवला की नुसताच चिवडाला तेच कळेना.”

खुशीच्या सासूच्या शेवटच्या वाक्यावर अनुच्या आणि ऋतुजाच्या सासवांनी नुसताच आ-वासला तर ‘तुझ्या सुंदरीने चिवडा तरी बनवला पण आमच्या ललनेने तेवढे सुद्धा केलं नाही’ असा भाव अस्मिताच्या सासूच्या चेहऱ्यावर होता. पण राधिकाच्या अम्मा मात्र कुल होत्या त्यांना वाटलं, ‘वेळेचं काय! चार तास लागो नाही तर चार दिवस पण सुनेने दिवाळी करता काहीतरी केलं ना त्यातच आनंद मानायला हवा हल्लीच्या सासवांनी.

चिवडा करून न दमलेली आमची सुंदरी मग ईश्वरीय रचना फेराफार केंद्रात गेली. खुशीची सासू मध्येच फ्रेंच किंवा लॅटिन भाषेत का बोलते आहे हे न कळल्याने अस्मिताची सासू बसल्या जागेवरूनच ओरडली, “ओ ताई साऱ्यांना उमजल असं बोला की.” त्यावर सायलीची सासू म्हणाली, “असते बाबा काही लोकांना शायनिंग मारायची सवय.” तर अर्चनाची सासू मनात म्हणाली, ‘समोर गेल्यावर संस्कृत मंदी बी बोला लागते का व माय? आता तर बेजा पंचाईत झाली ना बाप्पा.’

उपस्थितांमधून असले टोमणे ऐकून, खुशीच्या सासूने मनात विचार केला ‘आल्या मोठ्या दीड शहाण्या, मला सांगतात मराठीत बोला.’ तीने आपली कैफियत परत सांगायला सुरुवात केली, ”तर आमची सुंदरी म्हणजे-खुशी ब्युटी पार्लर मध्ये फेशियल करायला गेली.”

‘अच्छा! ईश्वरीय रचना फेराफार केंद्र म्हणजे ब्युटी पार्लर होय!’ इतके दिवस आपली सून आपल्याला किती शेंड्या लावत होती याची जाणीव तृप्तीच्या सासूला झाली आणि मनातून तृप्तीचा खूप रागही आला.”घरी गेल्यावर बघतेच आता हिला!’ असा मनाशी निर्धार पक्का करून तृप्तीची सासू खुशीच्या सासूच म्हणणं अगदी कान देऊन ऐकू लागली. तर ‘मुद्द्याचं सोडून काय बाई ही बया नुसतीच बडबड करते आहे!’ असा विचार श्रावणीच्या सासूच्या डोक्यात आला. पण खुशीची सासू आपलं म्हणणं अधिकच जोर देऊन सांगू लागली.”घरात कामाचा पसारा पडलेला असूनही माझी सून आवरा-आवरी न करता, फराळाच्या तयारीकडे ढुंकूनही न बघता आणि आली मारे तोंड घासून म्हणजे फेशियल करून, पण चेहरा काही चमकला नाही हो तिचा.”

“अच्छा म्हणजे तोंड घासल्याने चेहराही चमकतो तर! पण आपण तर रोज सकाळी उठून तोंड धुतो तरी आपला चेहरा का चमकत नाही?” असा यक्ष प्रश्न तृप्तीच्या सासूला पडला.

खुशीच्या सासूची, न संपणारी, अविरत, निरर्थक बडबड ऐकून वैतागलेली श्रावणीची सासू खुशीच्या सासूचा वेळ संपण्याआधीच मंचावर जाऊन पोहोचली, श्रावणीच्या सासूच्या अशा आगाऊ वागण्याचा खुशीच्या सासूला भयंकर राग आला होता, श्रावणीच्या सासूला ‘खाऊ की गिळू’ अशा नजरेने बघून तिने श्रावणीच्या सासूला माईक दिला आणि ती बिचारी माघारी फिरली.

माईक हातात आल्या आल्या श्रावणीच्या सासूने टाहो फोडला. तिचं असं आरुण्यरूदन बघून शिल्पा, ऋतुजा, सायलीच्या सासवांनी नाकाने सस्स,सस्स करून पदराने नाक पुसण्याचा, तर सारिकाच्या सासूने कोरड्या डोळ्यांना पदर लावण्याचा अभिनय केला. हॉलमध्ये स्वतःला मिळालेली सहानुभूती बघून, श्रावणीच्या सासूच्या मनावरून आणि अंगावरून मोरपीस फिरलं आणि मुठभर मांसही चढलं आणि दुप्पट जोमाने ती स्वतःच दुःख हलकं करू लागली.

“इथे उपस्थित माझ्या समस्त समदुखी मैत्रिणींनो माझ्या घरी सून नसून एक नागिण आहे.” हे वाक्य ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये उपस्थित सगळ्यांना धक्काच बसला आणि तिथे एक जीवघेणी शांतता पसरली. तृप्तीच्या सासूसमोर नगीना मधली श्रीदेवी तर मेघाच्या सासू समोर नागिण सीरिज मधल्या सगळ्या इच्छाधारी नागिणी नाचायला लागल्या. परंतु उपस्थित सदस्यांच्या मानसिक स्थितीचा अजिबात विचार न करता श्रावणीची सासू एकही सेकंद न थांबता अफाट बोलत होती.

“माझी सून श्रावणी दोनच पोळ्या खाते, पण तीन तास झोपते. आपण काही विचारलं तर म्हणते,’मी आत्ताच जेवले आहे.’ ‘आता मला गुंगी आणि धुंदी चढली आहे. पुढील दोन तास घरात आवाज करू नका.’ “काय माहिती जेवते की विष पिते?”

“तर तर म्हणे सून विष पिते, ती बिचारी सून हिचेच शाब्दिक विष पचवते, हीच तीच्यावर नागिणीसारखी डुख धरून बसलेली असते.” खुशीची सासू सायलीच्या सासूच्या कानात कुजबुजली.

“मी गरीब बिचारी बापुडी गपगुमान घराच्या एका कोपऱ्यात बसून राहते. न जाणो माझ्या हातून एखादी वस्तू खाली पडून आवाज झाला आणि श्रावणी नागिन जागी झाली तर? बाई, बाई विचार करूनही माझ्या अंगावर काटा येतो हो! एवढंच नव्हे तर या माझ्या उतार वयात मला माझा आणि माझ्या लहान मुलाचा स्वयंपाक देखील करावा लागतो. अहो त्या सटवीने माझ्या राजवर काय मोहिनी केली आहे काय माहिती? तिच्या वाढदिवसाला कोल्हापूर काय! दिवाळीनिमित्त सोन्याचा हार काय!! बाहेरचं खाणं काय!!! घरी पार्सल मागवणं काय!!! काही काही म्हणून काही विचारू नका! तिच्या माहेरच्यांना तिच्याबद्दल काही सांगितलं तर ते लोक उलट मलाच म्हणतात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे भगवंत.” आणि नक्राश्रू ढाळत श्रावणीची सासू स्वतःच्या जागेवर स्थानापन्न झाली.


©® राखी भावसार भांडेकर नागपूर

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.