Login

वैतागवाडी सासू संमेलन भाग तीन

सुने बद्दल सासूचे मत
भाग तीन

हातातला माईक बघून अस्मिताच्या सासूला असं वाटलं जणू तिला लाख रुपयाची लॉटरी लागली की काय! तिच्या चेहऱ्यावर आनंद नुसता ओसांडून वाहत होता. पण माईक करता अस्मिताच्या सासूचा हपापलेलापणा बघून श्रावणीच्या सासूने नाक मुरडले आणि मनात म्हंटले ‘जळलं मेलं ते लक्षण!’ तर “नुसत्या माइकसाठी काय बाई मेली ती मरमर!” परत एकदा खुशीची सासू सायलीच्या सासूच्या कानात कुजबुजली.

कोणाला काय वाटते इकडे अजिबात लक्ष न देता अस्मिताच्या सासूने सुनेचे कौतुक करण्यास सुरुवात केली, “सुनेच्या कारनाम्यांची लक्तरं थेट वेशीवर नेऊन टांगायची आमच्या घराण्याची परंपरा नाही. पण हजारदा समजून सांगितल्यानंतरही आमच्या ललनेच्या वागण्यात फरक पडला नाही म्हणून अतिशय जड अंतःकरणाने मी माझं दुःख तुम्हाला सांगायला इथे उभी आहे.”

आता अस्मिताची सासू अस्मिताच्या कगाळ्या सांगते, की स्वतःचं स्वयंपाक घरातलं तिखटा-मिठाचं फडतूस राजकारण सांगते, ते ऐकण्यासाठी सगळ्यांनी कान टवकारले.

“माझ्या सुनेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच!”

“म्हणजे हीची सून हीचे पाय धूवून ते पाणी पिते की काय?” परत एकदा तृप्तीची सासू.

“आमची ललना कधीही सकाळी दहा वाजेच्या आत उठत नाही.” अस्मिताच्या सासूने आपले म्हणणे पूर्ण केले.

“बापरे सासूचा काही धाक आहे की नाही तिला?” शिल्पाची सासू.

“कमाल आहे बाई हिच्या सुनेची! हीची सून इतक्या वेळ झोपते तरी ही सहन तरी कसं करते? चांगलं खडसवायचं ना!” मनातल्या मनात खुशीची सासू.

“असली सासू काय कामाची! सून दहा वाजेपर्यंत झोपते म्हणजे काय? सुनेला चांगले धाकात ठेवायला हवं.” श्रावणीची सासू ऋतुजाच्या सासूच्या कानात कुजबुजली.

“नाहीतर काय? सुनांना चांगलं दमातच ठेवायचं! नाही तर त्या आपल्याच डोक्यावर मिरे वाटतात.” मगाच पासून ऋतुजाच्या सासूने पहिल्यांदाच तोंड उघडले.

“माझ्या सुनेच्या उठण्याच्या वेळेबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर मी तुम्हाला आधीच सांगते, की जेव्हा मी सून होते तेव्हा मी कधीही सकाळी आठच्या आधी अंथरुणाच्या बाहेर पाय ठेवला नाही.”

“तूच एवढी कर्तुत्ववान असशील तर तुझ्या कीर्तीचे झेंडे तुझी सून पुढे दिमाखात रोवणारच ना!” अनुच्या सासुने मनात विचार केला.

“सासूने दिला तोचि मंत्र खरा आम्ही चालवू हा पुढे वारसा.” राखीच्या सासूच्या मनातले विचार

“हां तर मी सांगत होते की, आमच्याकडे उठण्याबद्दल कुणावरही कसलेही बंधन नाही, पण माझ्या सुनेच्या जर कोणी वाटी गेलं तर ती त्याला अजिबात सोडत नाही. ज्याप्रमाणे दादोजी कोंडदेव दानपट्टा चालवत त्याच्या दसपट अधिक वेगाने माझी सून तोंडाचा पट्टा चालवते. त्यामुळे जो कोणी तिच्याशी पंगा घेईल त्याचे शाब्दिक शिरसंधान करण्याचा ती मुलाहीजा बाळगत नाही. तिला कोणी काही बोललं की लगेच समाज माध्यमावर तिने त्यांचा खरपूस समाचार घेतलाच समजा. या करिता तिने खास प्रशिक्षण घेतले आहे.”

“अच्छा म्हणजे या सुना सासरी येण्यापूर्वी भांडणाचे खास कोर्सेस करून येतात.” शिल्पाच्या सासूला लागलेला नवा शोध.

“त्याकरिता माझी सून सार्वजनिक विहिरीवर किंवा नळावर पाणी भराणाऱ्या बायकांचे आणि लोकलच्या महिला डब्यातील भांडणे अगदी कान देऊन ऐकते. काही वेळा एखादा इरसाल शब्द टॅब मध्ये लिहुन घेते.”

“टब मध्ये बसून तर आंघोळ करतात, आंघोळीच्या टबात कसं आणि काय लिहायचं बुवा?” परत एकदा तृप्तीची सासू

“आपल्याला तर फक्त खाण्याच्या टॅबलेट माहिती होत्या, लिहिण्याच्या पण टॅबलेट असतात की काय!” सायलीच्या सासूच्या डोक्यात विचार चक्र फिरयला लागले.

“मुद्द्याचं सोडून ही बाई काय नुसताच भलताच फाफट पसारा सांगते आहे.” खुशीच्या सासूच्या मनातील विचार.

“नमनालाच घडाभर तेल. बाकी सगळं फेल.” श्रावणीची सासू.

महिलांना आपल्या बोलण्यात काडीचाही रस नाही असं पाहून अस्मिताच्या सासूने ट्रॅक बदलला.

“स्वयंपाकाच्या बाबतीत माझी सून अगदी माझ्यावर गेली आहे. म्हणजे बघा मी माझ्या काळात खानावळीतून जेवणाचे डबे मागवायची आणि माझी सून ऑनलाईन ऍप वरून जेवण मागवते. माझ्या सुनेसारखा स्वयंपाक कोणीच करू शकत नाही. अहो साक्षात आभासी अन्नपूर्णा आहे ती.”

“आभासी अन्नपूर्णा म्हणजे काय?”ऋतुजाची सासू.

“बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात. म्हणे आभासी अन्नपूर्णा.”नाकाचा शेंडा लाल करत मेघा ची सासू मनातल्या मनात चिडली.

“नशीबवान म्हणायची ही, सुगरण सून मिळाली हीला.” सायली ची सासू

“आली मोठी इथे सुनेचे गोडवे गायला. म्हणे सुगरण सून! एक कप चहा तरी बनवत असेल का घरी?” श्रावणीच्या सासूची चिडचिड.

“जेव्हा पहाव तेव्हा समाज माध्यमावर असते हीची सून, ती काय घरात स्वयंपाक करणार.?” मागे एकदा केव्हातरी कुणीतरी आपल्या सुनेला सांगितलेलं अनुच्या सासूला आठवलं.

“अहो आभासी अन्नपूर्णा म्हणजे ऑनलाइन पदार्थ बोलवून ती मनसोक्त खाते आणि घरच्यांनाही खिलवते. तुम्हाला म्हणून सांगते हो, माझी सून इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे भात बनवते ना! म्हणजे बघा साधा भात, फोडणीचा भात, मसाले भात, आलू भात, मटार भात, कोबी भात, झालच तर पुलाव, व्हेज पुलाव, शाही पुलाव, बापरे! मला तर आता काही काही भातांची नावे सुद्धा आठवत नाही.” उगाच मानभावीपणाचा आव आणत अस्मिताची सासू बोलली.

“पण एक मज्जा सांगू का? एक साधा भात सोडला, तर माझी सून प्रत्येक भाताला एक सारखीच फोडणी देते, फक्त त्यादिवशी तीचा काय खायचा मूड आहे त्यानुसार ती भातांची नावे ठरवते.”

हे ऐकून सगळ्या महिला हसायला लागल्या.

“एकदा तर बाई गंमतच झाली! मला सिमला मिरचीचा झुणका खायचा होता, तोही रात्री दहा वाजता! पण घरी सिमला मिरची नव्हती. मग मीच तिला म्हटलं, ‘एरवी ऑनलाइन तू काही बाही मागवत असतेच तेव्हा आता पिझ्झा मागवून घे आणि त्यावरची सिमला मिरची काढून त्याचा झुणका बनव.’ एवढ्या अडचणीच्या वेळी माझे प्रसंगावधान बघुन तर ती चाटच झाली. मला साष्टांग दंडवत करून तीने लगेच ऑनलाईन पिझ्झा बोलवला त्यावरची सिमला मिरची काढली आणि त्याचा झुणका बनवला. त्या दिवशी मला कळलं की ती माझ्या अगदी अर्ध्या वचनात आहे.”

“अपने मुह मियां मीठ्ठू!” सायलीची सासू.

“काय ती सासू! काय ती सून काय तो झुनका नुसताच तोंड पूजेपणा!” खुशीची सासू.

“ओवाळा, अजून ओवाळा, स्वतःच्याच दिव्यांनी स्वतःची आरती!” नाक उडवत श्रावणीची सासू बोलली.

“चला बाई आता सुनेचं असं गोड गोड कौतुक करून मलाच मळमळायला लागलाय.”

“आणि आम्हाला गरगरायला.” अनुची सासू

“मी जातेच कशी.”इच्छा नसतानाही अस्मिताच्या सासूने स्वतःच बोलणं आवरतं घेतलं. आणि ऐकणाऱ्या महिलांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


©® राखी भावसार भांडेकर. नागपूर


सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशीही कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.


🎭 Series Post

View all