भाग दोन
एका नागिनीच्या छायेत दिवस कंठत असलेली सासू बघून इतर सगळ्या सासवांना विजेचा 1000 चा धक्का लागल्याने त्या सगळ्याजणी अगदी शांत होत्या. शेवटी नाईलाजाने राखीची सासू उठली. उगाच नसलेली सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा खोटाच आव आणत आपल्याला माईक पर्यंत पोहोचायला किती कष्ट पडतात हे साभीनय दाखवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला; पण राखीच्या सासूचा हा प्रयत्न निष्फळ झाला, कारण सर्वात मागच्या खुर्चीतून अस्मिताची सासू झपाझप पावले टाकत, वेगाने मंचाकडे येत होती. पण ‘सुनेविषयी कुचकट बोलण्याची एकही संधी गमवायची नाही’ या नियमावर जगणाऱ्या राखीच्या सासुने अचानकच वेगवान चाल करून मंच आणि माईकवर कब्जा मिळवला; आणि मनात विचार केला की, ‘कसं हरवलं हीला!’ तर “ढोंगी कुठची? या उतार वयात असली नाटकं शोभतात का?” असे भाव अस्मिताच्या सासूच्या चेहऱ्यावर होते.
पण चेहऱ्यावर अगदी निर्विकार भाव ठेवून अगदी मानभावीपणाने राखीची सासू बोलू लागली, “उभ्या आयुष्यात मला पहिल्यांदाच भेटलेल्या, मगरमच के आसू गाणाऱ्या, माझ्या समदुखी भगिनींनो, आपण जेव्हा सून होतो, तेव्हा आपल्या सासवा चांगल्या नव्हत्या आणि सुना तर कुठल्याच सासूला कधीच चांगल्या मिळत नाही. त्यामुळे इथे मुलांच्या माघारी गळे काढण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा स्वतःच्या घरालाच स्वतःच कार्यक्षेत्र मानून; स्वयंपाक घराच्या रणभूमीवर कर्तुत्व गाजवायला शिका.”
“अय्या स्वयंपाक घराची रणभूमी म्हणजे आता ही कोणती नवीन जागा आणि ती असते तरी कुठे? स्वित्झर्लंड की अमेरिका,की थेट सिंगापूर?” असे प्रश्न पडलेली परत एकदा तृप्तीची सासू.
कोणाला काय वाटते आणि कोणाच्या चेहऱ्यावर काय भाव आहेत इकडे साफ दुर्लक्ष करून राखीच्या सासूने सासू गिरीचे अमूल्य तत्त्वज्ञान सगळ्यांना पाजायला सुरुवात केली,”माझ्या सुनेबद्दल मी एक अवाक्षरही काढणार नाही. उगाच कशाला घरची अब्रू चव्हाट्यावर आणा? पण माझी सून एक नंबरची धूर्त आहे हो! कधीही मेलं सकाळी नाश्त्याला ती उपमा, पोहे, शिरा, किंवा मग मटकीची उसळ, चिवडा, राजगिरा किंवा शेंगदाण्याचा लाडू असलंच काही बाही देते; आणि मुलांसाठी जो डब्यात खाऊ करते ना म्हणजे कटलेट, पॅटीस, ढोकळा, आलूची टिक्की किंवा मग इडली, दोसा, उत्तप्पा ते काहीच ती मला देत नाही. पण हार मानणाऱ्यातली मी नाही हो! बरोबर माझा लेक जेव्हा ऑफिसला जायच्या तयारीसाठी हॉलमध्ये सोफ्यावर बसून सॉक्स घालत असतो, तेव्हाच मी माझ्या सुनेला म्हणते की, ‘बाई राखी दोन-तीन दिवस झाले तोंडाला चवच नाही; आज तु मला उपमा किंवा शिरा देऊ नको, लेकरांसाठी जे काही केलं असेल त्यातलंच घास भर दे! नाही सकाळी गोळी घ्यायची असते ना म्हणून म्हटलं.’आणि माझी ही मात्र माझ्या सुनेवर बरोबर लागू पडते, त्यामुळे मनात नसूनही ती मला काही ना काही चांगलं-चुंगलं खायला देतेच!”
या वाक्यावर तर श्रावणीच्या सासूने जागेवर उठून जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तर ही युक्ती आपल्या डोक्यात का नाही आली म्हणून खुशीची सासू स्वतःला शंभरदा दोष देत होती.
“कसली नंबरी बाई आहे ही.” सायलीच्या सासूच्या डोक्यातला विचार.
“बरी युक्ती सांगितली हिने, आता घरी गेल्यावर असंच काहीतरी करेन.” परत एकदा तृप्तीची सासू.
आपला हा कावेबाजपणा सगळ्यांना खूप आवडला आहे. हे उपस्थितांच्या चेहऱ्यावरच्या झाळाळीने राखीच्या सासूच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मग आणखीनच ऐटीत येऊन तिने आपले कीर्तन परत एकदा सुरू केले.
“माझी सूनेसारखा नमुना अख्ख्या दुनियेत शोधून सापडणार नाही. मुल शाळेत आणि नवरा ऑफिसमध्ये गेला की ही बया जे हातात मोबाईल घेऊन बसते तो दोन तास उठतच नाही. मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी जे काही केलं असेल तेच माझ्या ताटात वाढते ती. आणि वरून तिची अपेक्षा असते की मी भाजी तोडून ठेवावी, भांडी लावून ठेवावीत, निदान स्वतःच्या कपड्यांच्या आणि अंथरुण्याच्या घड्या तरी करून ठेवाव्यात पण छे! मी कसली तिला दाद देते? आंघोळ करून पटकन सकाळची गोळी घेतली की, मी बसते आपली जपाची माळ घेऊन. जोपर्यंत घड्याळाचा काटा एक वर जात नाही तोपर्यंत मी माझी माळ खाली ठेवत नाही. पण माझं सारं लक्ष मात्र माझ्या सुनेवर आणि ती स्वयंपाक घरात काय खुडबुड करते आहे त्यावरच असते.”
“अग बाई! किती हुशार आहे हो ही.”अस्मिताच्या सासूने मनातल्या मनात राखीच्या सासूला मनापासून दाद दिली.
“मैत्रिणींनो तुम्हाला जर गरम गरम जेवायला किंवा इतर जे काही पाहिजे ते मुलासमोर मागायचं आणि मुलगा ऑफिसमध्ये गेला की, जपाची माळ घेऊन देवघरात बसायचं हा माझा कानमंत्र किंवा गुरु मंत्र समजा.”
“बरं बाई पुरे झालं आता सुनेचं कौतुक. मी जातेच कशी, नाही सांधेदुखीने माझे पाय दुखायला लागलेत. पण मी दिलेला गुरुमंत्र कुणीही विसरायचा नाही.”
श्रावणीची सासू, खुशीची सासू, सायलीची सासू यांनी तो गुरु मंत्र पटापटा वहीत लिहून घेतला, पण तृप्तीच्या सासूने तिथल्या तिथे तो गुरु मंत्र अगदी मूख पाठ केला.
राखीच्या सासूने जसा माईक सोडला अगदी त्याच क्षणी अस्मिताच्या सासूने त्या माईकवर झडप घातली.
पुढील भागात बघूया अस्मिताच्या सासूचे अवघड जागेचे दुखणे काय आहे.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशीही, कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर लिखाणाचे हक्क लेखिकीकडे राखीव असून कोणीही त्याचा कुठल्याही माध्यमात वापर करू नये तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.