वैतागवाडीचे सासू संमेलन भाग सात

सासुचे सुनेविषयी मत
भाग सात

“साफसफाई चे नाव काढल्याबरोबर आमची सुनबाई तिच्या नवऱ्यासोबत अंताक्षरी खेळायला लागली.” मेधाची सासू स्वतःचं दुःख सांगत होती.

मेधा -”हाय हाय ये मजबूरी, ये पसारा और साफसफाई, तेरी दो टकीयेदी क्रिकेट मॅच मेरा ब्युटीशियन का पॉइंटमेंट जाये रे.”

नवरा -”साफ सफाई sss, आवरा आवरी sss, दिल के रास्ते मे कैसी ठोकर मैंने खाई, झाडू है हात में, सर पे बिवी है सवार हुई, साफ सफाई sss.”

मेधा -”जब भी जी चाहे खुद को बचा लेते है लोग, पत्नी को पसारे मे छोडकर क्रिकेट मॅच देख लेते है लोग.”

नवरा -”कुछ तो माॅं कहेगी, माँ का काम है कहना, छोडो बेकार की बातों मे कही साफ सफाई रह जाये ना.”

मेधा -”हम तो चले रसोईघर में हम कामवाली बाई बन गये, छुटा अपना मोबाइल हम कामवाली बाई बन गये.”

नवरा -”ये छुट्टी, ये क्रिकेट मॅच मेरे काम की नही, मेरे काम की नही.”

मेधा -”ना प्यार मे, ना इश्क मे, बहुत दर्द है दिवाली की साफसफाई मे.”

नवरा -”दर्दे दिल, दर्दे जिगर, दिल में जगाया आपने, पहले तो में ऑफिसर था, सफाई कामगार बनाया आपने.”

“जवळजवळ अर्धा पाऊण तास माझ्या सुनेची आणि मुलाची ही अशी अंताक्षरी सुरू होती. शेवटी जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी फोन करून विचारणा सुरू केली, की ‘तुमच्या घरात काय सुरू आहे?’ तेव्हा कुठे त्या दोघांची अंताक्षरी बंद झाली.”

“हो पण गाण्याच्या भेंड्या खेळता खेळता तुमच्या सुनेने साफसफाई केली की नाही ते तुम्ही सांगितलेच नाही.” खुशीच्या सासूने मनातला प्रश्न बोलून दाखवला.

“सूनेने साफसफाई केली पण आवरसावर मात्र मलाच करावी लागली. साफसफाई साठी मुलाच्या मनात नसतानाही सुनबाईने त्याला मदतीस घेतले, आता नवरा मदतीला आला हे बघून तिने एकाच वेळी स्वयंपाक खोली, बैठकीची खोली आणि बेडरूम मधला सगळा पसारा साऱ्या घरभर पसरवला. कामवाल्या मावशी बाईला हाताशी घेऊन स्वयंपाक घरातली जास्तीची भांडी घासता घासता माझ्या सुनेने काचेच्या भांड्यांचा पूर्ण चुराडा करून टाकला. ठेवणीतले गंज आणि इतर सामान यांच्यावर तिने इतका जोर लावला, की त्यांचे आकार पार बदलून गेले, इतकी सगळी मेहनत केल्यावर हुशहुश करत ती बैठकीच्या खोलीतल्या सोफ्यावर जाऊन फतकल मारून बसली, मग मला आणि माझ्या मुलाला बैठकीची खोली आवरण्या शिवाय दुसरं काही गत्यंतर राहिलं नाही.” हे सगळं सांगताना मेधाच्या सासूच्या डोळ्यात वारंवार पाणी दाटून येत होतं.

“पण तिची बिचारीची पण काहीच चूक नाहीये. मीच तिला म्हटलं होतं, की ‘मी तरुण असताना एकाच दिवशी स्वयंपाक खोली, बैठकीची खोली, बेडरूम सगळं साफ करून टाके.’ मग ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवण्यासाठीच तिने माझ्यावर हा असा साफसफाईचा सुड उगवला.”

“सगळं घर आवरल्यावर माझ्या सुनेने माझ्या मुलाला म्हंटलं, “घरातले सगळे जणं आता दमलेले आहेत, त्यामुळे तुम्ही एक काम करा, ऑनलाईन काहीतरी खायला मागवा.’ प्रत्यक्ष गृहलक्ष्मीनेच असा आदेश दिल्यानंतर माझ्या मुलाने नंदीबैला सारखी मान डोलावली आणि ऑनलाईन जेवण मागवलं.”

“दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करतांना सुनेला गोल आकाराच्या पोळ्या लाटता येत नव्हत्या, तर मी म्हटलं, ‘अग बाई आम्हाला हे जगातले सर्व देशांचे नकाशे का खायला देणार आहेस तू?’ माझी सून लगेच तिच्या खोलीत गेली आणि तिथून तिने गुण्या आणि कर्कटक आणला, वाकडी तिकडी कशी तरी पोळी लाटली आणि मग मला विचारायला लागली, ‘सासुबाई गोल पोळी हवी असेल तर किती त्रिजेची पोळी कापू? आपल्या घरात साधारण किती व्यासाच्या पोळ्या बनवतात?”

गुण्या आणि कर्कटक हे शब्द ऐकताच तृप्तीच्या सासूची ट्यूब पेटली, तिला वाटलं, ‘बाजारात पोळ्या करण्याचं हे कुठलं तरी नवीन मशीन आलं असावं, आपल्याही सुनेला काही व्यवस्थित गोल पोळ्या करता येत नाही, तर आपणही आता तिला हेच पोळी बनवणार मशीन आणायला लावू.’ असं तिने मनात निर्धार पक्का केला.

त्रिज्या आणि व्यास हे शब्द ऐकून अर्चनाच्या सासूला वाटलं की, मेधाच्या सासूने घरकाम करणाऱ्या मोलकरणी शिवाय, त्रिज्या नावाची पोळ्या वाली आणि व्यास नावाचा महाराज ठेवलाय की काय स्वयंपाक करायला.

मेधाच्या सासूने पोळ्यांची गोष्ट पूर्ण केली. “गुण्या आणि कर्कटकाने पोळ्या करण्याचं हे कसं पाहून मला माझ्या सोन्याचं अगदी कौतुकच वाटलं कारण मी पण अशाच वाकड्यातिकड्या पोळ्या करून काठाच्या ताटलीने त्या अगदी गोल कापून घ्यायची.”

“काय ती सासू? काय ती सून? काय त्यांच्या पोळ्या? खरंच धन्य आहेत यांचे नवरे.” अनुच्या सासूने मनात विचार केला.

मेधाच्या सासूला आपल्या सुनेचे अजून काही गुण सांगायचे होते पण, वेळेचे भान राखत तिने स्वतःचे मनोगत आवरते घेतले.

सगळ्यात शेवटी चित्राची सासू स्वतःचे मनोगत ऐकवण्यासाठी मंचावर गेली.

पुढल्या भागात चित्राच्या कारनाम्यांचा आस्वाद घेऊया तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून कुणीही त्याचा वापर केलास त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.

🎭 Series Post

View all