Login

वैतागवाडीचे सासू संमेलन भाग आठ

सुने बद्दल सासुचे मत

आठ

चित्राची सासू तशी तब्येतीने ठणठणीत. त्यामुळे कुठलाही अभिनय न करता तिने अगदी सरळ विषयालाच हात घातला.

“काय बाई एक एक मुली असतात, आणि त्यांच्या आया असतात! नावच घेऊ नका. मुलीची पाठवणी करताना आपल्याला म्हणतात, ‘आमची मुलगी अगदी गरीब गाय आहे हो! सांभाळून घ्या.’ “अदृश्य शिंगावली हे सांगायला त्या मुद्दाम विसरतात. आपल्या घरात आल्यावर त्या गरीब गायीची अदृश्य शिंग आपल्याला दिसायला लागतात. बरं त्यांच्या त्या गरीब गायीची काही तक्रार आपण गाईच्या आईकडे करायला गेलो तर म्हणतात; ‘बछडं तुमच्या पदरात टाकलं आहे सावरून घ्या, वय लहान आहे आमच्या मुलीचं, व्यवहारातलं,संसारातलं तिला काही कळत नाही, तुम्ही नाही सांभाळून घेणार तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघणार?’ मनातला सगळा राग चित्राची सासू बोलून दाखवत होती.

‘हिच्या आयुष्यात केवढं दुःख आहे!’ या भावनेने चित्राच्या सासूकडे, सगळ्याजणी सहानुभूतीपूर्वक नजरेने बघत होत्या.

“आपल्याशी गोड गोड बोलून आपल्याच तोंडाला पानं पुसतात ही व्याही मंडळी.”

“अगदी बरोबर आहे. त्यांचं खोटं नाणं आपल्या मुलाच्या पदरी बांधतात.” श्रावणीची सासू.

“काही म्हणण्या बोलण्याची तर उजागरीच नसते, त्यांचच कसं खरं आहे, हे सुनेची आई अगदी ठासून ठासून आपल्या गळी उतरवते.” खुशीच्या सासूची मनातली मळमळ बाहेर आली.

“मी तर म्हणते, नात्यातली मुलगी अजिबात करू नये. आपण काही म्हटलं, की तिची आई आपलेच पाय आपल्या गळ्यात बांधते.” चित्राच्या सासूने मनातली व्यथा बोलून दाखवली.

"हीचे पाय हिच्या विहिणीने हिच्याच गळ्यात बांधले पण आता तर ते गळ्यात दिसत नाही, काय लबाड बाई आहे ही! आता पाय गळ्यात असताना ही ईथवर आलीच कशी? कमाल आहे बाई हीची! हिचं बोलून झालं की भेटावं लागेल हिला." परत एकदा तृप्तीची सासू 

“मी विचार केला, नात्यातली मुलगी केली तर ती माझं ऐकेल, आपल्या कानाखालची राहील, पण इथे झालं उलटच, माझी सून कानामागून आली आणि तिखट झाली. माझा भ्रमाचा भोपळा तिनेच फोडला, चार दिवस सासूचे आणि उरलेले सगळे दिवस सुनेचे ही म्हण तिने अक्षरश: खरी करून दाखवली, तिनेच मला अख्खी दुनिया दाखवली.”

“हिच्या सुनेजवळ असा कोणता भोपळा आहे की ज्यात बसून ही-चित्राची सासू, लेकीच्या घरी जाऊन तूप-साखर, पोळी खाऊन, टुणटुणीत होणार आहे? हीचं भाषण संपलं, की एकांतात हिला गाठावंच लागेल आणि तो भोपळा कोणत्या बाजारात मिळतो ते एकदा नक्की विचारावं लागेल! म्हणजे मलीही तो विकत घेता येईल.” आणखी कोण तृप्तीची सासू.

“माझी सून, माझ्याच नात्यातल्या दूरच्या एका बहिणीची मुलगी. माझा नवरा म्हणत होता, की ‘अगं नात्यातली मुलगी करू नको.’ ‘पण नवरा म्हणेल त्याच्या विरुद्ध वागायचं हा आपल्या बायकांचा जन्मसिद्ध हक्क असतो ना!’ या नियमाला अनुसरून मी नवऱ्याचे शब्द अक्षरशः हवेत उडवून लावून, माझ्याच मनाचं केलं,आणि स्वतःच कुऱ्हाडीवर पाय मारून घेतला, त्याच कर्माची फळ मी आता भोगते आहे.”

“म्हणजे काय केलं तुझ्या सुनेने? प्रॉपर्टी हिसकावून घराबाहेर काढलं की, अनाथ आश्रमाचा रस्ता दाखवला?” खुशीच्या सासूचा प्रश्न.

“ती काय मला घराबाहेर काढेल! पण तिने माझं घरात राहणं मुश्किल केलं आहे. आपण काहीही म्हटलं की त्याचं माझी सून इतकं तर्क सुसंगत उत्तर देते की माझी बोलतीच बंद होते.”

“अगं बाई! हिची सून फारच हुशार दिसते! मी ही अशीच नात्यातली सून करून घ्यायला हवी होती. म्हणजे माझी सूनही अगदी हुशारीने वागली असती, आणि रोज जो काही बावळटपणा करते तो तिने केला नसता आणि माझ्या सारखीच हुशार झाली असती. पण ऐनवेळी माझं डोकं चाललं नाही. जाऊ द्या जे नशिबात असते ते घडूनच राहते.” मनातल्या मनात परत एकदा तृप्तीची सासू.

“लग्न झाल्यावर मी माझ्या सुनेला विचारलं, “अगं तुला स्वयंपाक घरात काय येतं?” तर सुनबाई जांभई देत म्हणाली,” मला स्वयंपाक घरात कंटाळा येतो आणि माझ्या आईने मला स्वयंपाक घरात जेवण करायला शिकवलं आहे.” सुनेच्या या उत्तरावर मला असं वाटलं, की कुठून मला कु-बुद्धी सुचली आणि मी तिला हा प्रश्न विचारला.

“विहीणबाईंना मी त्यांच्या लेकीचे उत्तर सांगितल्यावर, त्या खो-खो हसत सुटल्या आणि मला म्हणाल्या, ‘तुमचं नशीब बोलवत्तर नाहीतर, दुसरी एखादी सुन असती, तर तिने म्हटलं असतं मला जेवणही तुम्हीच भरवा.’ सांगा आता या उत्तरावर माझ्यासारख्या गरीब, दुःखी, पामर सासुने काय करावे?”

संमेलनातल्या सगळ्या सासवा चित्राच्या सासूकडे गरीब बिचारी या नजरेने सहानुभूती दर्शवू लागल्या.

मी तिच्या आईला म्हटलं, “अहो तुमची मुलगी सकाळी उशिरा उठते, लग्न झाल्यावर तरी तिने एक जबाबदार सून म्हणून लवकर उठायला हवं ना!”

सुनेची आई म्हणजेच विहीणबाई म्हणाली, “अहो माझी मुलगी सकाळी उशिरापर्यंत झोपत नाही,तर तिची स्वप्नच फार मोठ-मोठाली आहेत, म्हणून सकाळी उठायला जरा वेळ होतो बस एवढंच! तुम्ही नका जास्त लक्ष देऊ तिकडे, विहीणबाई एक गोष्टं आठवते का तुम्हाला? तुमच्या उशिरा उठण्यावरून तुमची सासूही तुम्हाला खूप बोलायची, त्यावेळी तुम्ही तिला काय उत्तर दिले होते?’ “त्या क्षणी मी माझ्या आयुष्यात 25 वर्ष मागे गेले आणि मला लख्खन आठवले, ‘हे बघा सासूबाई तुम्ही नेहमीच मला म्हणता, की सूर्य उगवायच्या आधी तू उठत नाही! पण तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की रोज संध्याकाळी सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते.”

“नात्यातली सून करून मी मोठा धोंडाच स्वतःच्या पायावर मारून घेतला होता नव्हे स्वतः धोंड्यावर पाय मारून घेतला होता. पण मोरा तुझे गेले पाय रडून आता उपयोग काय अशी गत माझी झाली आहे.”

“माझ्या आयुष्यातली ती आठवण माझ्या विहिणीने माझ्या लक्षात आणून दिली आणि माझेच दात माझ्याच घशात घातले.” चित्राच्या सासूला आता तिचे दुःख अनावर झाले होते.

“दिवाळीच्या वेळी आरतीच्या ताटात मला एक लाल-लाल चिकट पदार्थ दिसला. मी सुनेला विचारलं, हे ताटात लाल लाल चिकट काय आहे?”

तर आमची बहाद्दर सुनबाई म्हणाली, “सासुबाई पूजेकरिता पाच प्रकारची फळं आणायची मी विसरली, म्हणून ताटात मिक्स फ्रुट जाम ठेवला आहे.”

मी तिला काही म्हणणार एवढ्यात सुनबाईनेच मला गप्प केले आणि माझाच कारनामा मला सांगितला, “अहो सासूबाई काही वर्षांपूर्वी नाही का, आपल्या घरी अशीच कुठली तरी पूजा होती आणि तुम्हीही माझ्या सारख्याच पाच प्रकारची फळं आणायला विसरल्या होत्या, तेव्हा पाच वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तुम्ही कैरी, संत्र ,करवंद, आवळा आणि बेलाचा मुरंबा ठेवला होता पूजेसाठी!”

“अग बाई किती हुशार आहे हो हिची सून आणि ही! आता पुढल्या वेळी कुठल्याही पुजेकरीता कशाला महागाची पाच वेगवेगळ्या प्रकारची फळं आणायची? घरातलेच वेगवेगळे मुरांबे आणि लोणची वापरायची, काय झक्कास आयडिया दिली चित्राच्या सासूने.” परत एकदा तृप्तीची सासू.

आपण आपल्या सुनेचे जे काही कारनामे सांगत आहोत, ते ऐकण्यात उपस्थित सासवांना काडीचाही रस नसल्याचे बघून चित्राची सासू गपचूप स्वतःच्या जागेवर जाऊन बसली.


©® राखी भावसार भांडेकर नागपूर.


सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून कुणीही त्याचा वापर केलास त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.

 

🎭 Series Post

View all