वैतागवाडीचे सासू संमेलन भाग 9

सुनेबद्दल सासू चे मत
भाग नऊ

संमेलन सुरू होऊन बराच वेळ झाला होता काही सासवांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते, तर काहीं जणींच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. निदान आता तरी कार्यक्रमाचे संचलन करणारी, अध्यक्षांच्या अनुमतीने चहापानाचा ब्रेक घेईल या आशेने सगळ्या सासवा अशाळभूत नजरेने, निवेदिकेकडे बघत होत्या.

पण तेवढ्यात कसे कुणास ठाऊक? नेमकी ऋतुजाची सासू मंचावर हातात माईक घेऊन बोलू लागली.

खरंतर दुपारी बाराची वेळ म्हणजे जठराग्नी शांत करण्याची वेळ. पण याआधी मंचावर येऊन आपली दुःख वाटून घेणाऱ्या, समदुःखी, अनोळखी पण आता ज्यांच्या विषयी केवळ सहानुभूतीच नव्हे तर आत्मीयताही वाटायला लागली होती,अशा सासु वर्गातील, एक-ऋतुजाची सासू, मंचावर आली, तेव्हा पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना गप्प बसवून, आणि एकमेकांच्या शेपट्या पकडण्याच्या नादात प्रत्येकीच्या पोटातून इकडे तिकडे धावणाऱ्या उंदरांमुळे पोटातून येणाऱ्या गुर्रगुर आवाजाकडे साफ दुर्लक्ष करून, चेहऱ्यावर अत्यंत दयनीय भाव आणून, सगळ्या सासवा ऋतुजाच्या सासूकडे नुसताच बघण्याचा अभिनय करत होत्या. पोटात उसळलेल्या भुकेच्या आगडोंबाकडे मोठ्या कष्टाने दुर्लक्ष करून ऋतुजाच्या सासूने बोलायला सुरुवात केली.

“सुनेच्या भूमिकेत असताना सासूचे अत्याचार सहन करणाऱ्या आणि आता स्वतः सासु झाल्यानंतर सुनेच्या राज्यात मनाचा कोंडमारा सहन करणाऱ्या माझ्या प्रिय सखींनो, डोक्यावर चढलेलं भर दुपारी बाराचं ऊन आणि घरात आपणच मोठ्या हौसेने थाटामाटात, वाजत-गाजत आणलेली सून यांचं काही खरं नसतं! म्हणजे बघा हिवाळ्यातलं दुपारचं ऊन कसं हवंहवसं वाटतं! सुरुवातीला आपण आणलेली सूनही आपल्याला अशीच हवीहवीशी वाटते. ती ही अगदी आपल्या मागेपुढे करत असते, पण ऋतू बदलतो नवी सूनही मग स्वतःचा खरा रंग दाखवायला लागते.” ऋतुजाच्या सासूची ही प्रस्तावना ऐकण्यात खरंतर कुणालाच काडीचाही रस नव्हता. श्रावणीची सासू, खुशीच्या सासूच्या कानात कुजबुजली, “काय बाई हिने टकळी सुरू केली आहे. स्वतःच, स्वतःचे रंग उधळते आहे आणि सुनेच्या नावाने कोकलते आहे.”

“अरे देवा म्हणजे हीची सून तोंडाला आणि अंगाला रंग लावून आली होती की काय? आणि आता तिचा खरा रंग हिला सहन होत नाही आहे! म्हणजे हीची सून दिसायला किती कुरूप असेल ना!” तृप्तीची सासू अनुच्या सासूच्या कानात पूटपूटली.

तृप्तीच्या सासूचे पुटपुटणे ऐकून अस्मिताची सासू मनातल्या मनात उगीच करदावली, इकडे मंचावर मात्र ऋतुजाच्या सासूची अखंड बडबड अव्याहतपणे सुरू होती.

“मैत्रिणींनो माझ्या सुनेला कामाची आणि त्यातल्या त्यात स्वयंपाक घरात नवनवीन पदार्थ करण्याची भारीच हौस आहे.”

“नशीब काढलं बाई हिने! आमच्याच वेळी अशा चांगल्या सुना कुठे गेल्या होत्या कुणास ठाऊक?” सायलीची सासू मनातल्या मनात रागाने देवाला बोल लावत म्हणाली.

“तुम्ही घरकाम टाळून, मंदिरात भजनाच्या नावाखाली सासूची गाऱ्हाणी करायला जायचा ना, म्हणूनच कारण विनाकारण सारखं सारखं माहेरी जाणाऱ्या सासवांना त्यांचं न ऐकणाऱ्या सुनाच नशीब येतात.” चित्राच्या सासूचे ओठ हल्ल्यासारखे सायलीच्या सासूला दिसले पण गप्प बसल्याशिवाय तिच्याजवळ पर्याय नसल्याने सायलीची सासू मनातल्या मनात धूसफुस करत गप्प बसली.

“माझी सून इतकी कामाची आहे की घर झाडल्यावर ती दहा मिनिटे मोबाईल बघते, घराची फरशी पुसल्यावर परत वीस मिनिटं मोबाईल चाळते, त्यानंतर माझ्या सुनेचं अर्धा तास शाही स्नान असतं! स्वयंपाक करताना तर विचारूच नका, कांदा चिरता चिरता, ती कांदा चिरण्याचे स्टेटस अपडेट करते, कुकर लावला की कविता लिहिते, भाजी, वरण कशालाही कुठलीही फोडणी दिली, की एका ग्रुप वरचा मेसेज दुसऱ्या ग्रुप वर फॉरवर्ड करते. ह्या मेसेजच्या देवाण-घेवाणीत कधी कांदा जळतो तर कधी भाजी करपते, वरण, दूध आणि चहा उतू जाणे तर नित्याचीच बाब. आतापर्यंत माझा गॅस असा चमके की माझा चेहरा त्यात दिसे पण सुनबाईचा हात गॅसला लागल्यानंतर तो गॅस आहे, की एखाद्या महाप्रसादाची किंवा अन्नछत्राची भट्टी हे देखील कोणी ओळखू शकणार नाही. पण आतली गोष्ट सांगू का? मलाही लग्न झालं तेव्हा स्वयंपाक येतच नव्हता.”

“वा म्हणजे सासू सून एकाच माळेचे मणी.” इती खुशीची सासू.

“नाहीतर काय! नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, मी नाही त्यातली आणि कडी घाला आतली, हात दाखवून नुसतं अवलक्षण मेलं!” श्रावणीची सासू.

“ही बाई किती प्रामाणिक आहे! अगदी मनातलं खरं खरं सांगते आहे.” आणखीन कोण तृप्तीची सासू.

“तर माझ्या सख्यांनो!” ऋतुजाची सासू पुन्हा बोलू लागली.

“माझ्या सुनेला मी विचारलं, ‘बाई ग तुला गुलाबजाम येतात का?’ तर ती म्हणे, ‘हो आई, गुलाबजाम बनवणे अगदी सोपं आहे. मी तर वेगवेगळ्या फ्लेवरचे गुलाबजाम बनवते.’ हे ऐकून मला तर वाटलं माझी सून सुगरणच आहे! पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. सुनबाईंनी जे पुढे सांगितले त्याने माझे तर डोळेच पांढरे झाले, खालचा श्वास खाली आणि वरचा श्वास वरच अडकला.”

“डोळे पांढरे करून, वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली ठेवायचा प्राणायामाचा नवीनच प्रकार आहे वाटतं! संमेलन संपल्यावर ऋतुजाच्या सासूला एकट्यात गाठून हा प्राणायाम नक्की शिकून घ्यावा लागेल.” परत एकदा तृप्तीची सासू.

“सुनबाई म्हणते कशी, ‘अहो सासूबाई, लाल, पांढरी, पिवळी, सगळ्या रंगाची गुलाबाची फुलं विकत आणायची किंवा बागेतून तोडून घ्यायची आणि त्यांना मँगो, पायनॅपल, मिक्स फ्रुट जाम लावला की झाले गुलाबजाम तयार!”

“फारच कामाची आहे बाई हीची सून.” खुशीची सासू.

“काय ती सून, काय ते गुलाब आणि काय ते जाम एकदम ओके मधे आहे.” चित्राची सासू.

“मैत्रिणींनो तुम्हाला वाटत असेल, की हिची सून किती गुणी आहे, पण तुम्हाला म्हणून सांगते, मलाही स्वयंपाकाची भारी आवड हां! माझ्यासारखी सुगरण तुम्हाला हातात दिवा घेऊन शोधावी म्हटलं तरी सापडणार नाही! जेव्हा माझ्या सासूने मला विचारले, ‘तुला मैसुरपाक येतो का?’ ‘तर मी म्हटलं हो.’ माझ्या सासूच्या डोळ्यात त्यावेळी माझ्यासाठी एवढे कौतुक होते ना की सांगायलाच नको.’ दोन तासानंतर सासूने मला विचारलं काय ग साड्या बागेत भरून कुठे निघालीस?’ तर मी निष्पाप चेहरा करून म्हंटले, ‘सासुबाई तुम्हीच म्हटले ना की मैसूर पाक करायचा आहे, तर आता मला सांगा, मी म्हैसूरला गेल्याशिवाय मैसूर पाक कसा बनवेल बरं? त्यावेळी सासूने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला.

“त्यानंतर एकदा सासूने विचारले, ‘का ग तुला मोहन थाळ येतो का?’ मी म्हटले, ‘हो येतो ना!’ त्या म्हणाल्या, ‘करून दाखव बरं!’ तर मी आमच्या घरगड्याला-मोहनला जोरजोरात हाका मारायला लागले.“मोहनss ये मोssहन इकडे ये जरा!”

“सासुबाई म्हणाल्या, ‘अगं काय झालं? मोहनला का बोलावते आहेस?’ तर मी तोंडाचा चंबू करून म्हणाले, ‘आता मोहन थाळ बनवायचा आहे तर मोहनच्या हातात थाळ्या देऊन बनवणार ना!’ त्यावेळी माझ्या सासूने स्वतःचे डोके भिंतीवर आपटले.”

“काय ती कर्तबगार, नाही नाही सुगरण सासू आणि तिची ती गुणी सून!” हाताचा मोर नाचवत सायलीची सासू म्हणाली.

“एकदा तर बाई गंमतच झाली! दिवाळीच्या दिवसात माझ्या करामती बघून, माझी सासू मला म्हणाली, ‘सुनबाई इकडे ये. आपण दोघी मिळून आज अनारसे करू. तर मी घरातले सगळे आरसे घेऊन सासूबाईंच्या जवळ स्वयंपाक घरात गेली आणि विचारायला लागली, ‘हं आता पुढे काय करायचं?”

“हिच्या सासूला असं नक्कीच वाटलं असेल, की एकतर हिला तरी विहिरीत ढकलावं नाही तर, स्वतः तरी अंगणातली विहीर जवळ करावी.” श्रावणीची सासू.

“अग्ग बाई! अनारसे करताना घरातले आरसे जवळ ठेवून अनारसे बनवायचे का? नवीनच रेसिपी दिसते. आता तर या ऋतुजाच्या सासूला नक्कीच एकट्यात गाठावं लागेल.” तृप्तीच्या सासूशिवाय असा विचार दुसरे कोणी करू शकेल का?

उपस्थित समस्त सासवा मोठ्या प्रयासाने पोटात खवळलेल्या भुकेच्या राक्षसाला कशाबशा थोपवून धरत होत्या आणि ऋतुजाची सासू अनेक सुग्रास, जिभेला पाणी सुटणाऱ्या पदार्थांची एक एक कहाणी सांगत होती. शेवटी न राहून अध्यक्षा महोदयांनी टेबलावरची बेल वाजवली आणि ऋतुजाची सासू स्वतःचं म्हणणं अर्धवट सोडून गपगुमान स्वतःच्या जागेवर जाऊन बसली.


©® राखी भावसार भांडेकर नागपूर.


सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून कुणीही त्याचा वापर केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.