Login

Mrs. प्राईम नंबर

कथा अंतर्मनाला स्पर्श करणारी
Mrs. प्राईम नंबर.

अनेक स्वप्न घेऊन ती माप ओलांडते. नवीन नाती,नवीन घर सारं नवीनच असतं, तरीही ती त्याच्यात एकरूप होण्याचा खूप प्रयत्न करते. जेवणाची पद्धत शिकून घेते, तिला घराचा कानाकोपरा देखील नवीनच असतो; पण तरीही मनापासून आपलं मानते. जोडीदाराकडून अपेक्षा असतात; पण हळूहळू तिला कळतं की कुठेतरी तिला गृहीत धरलं जात आहे. ती जे देखील करतेय ते तिचं कर्तव्य आहे आणि इतकं काही ती घरासाठी करत नाही.

सुरवातीला खुश असणारी ती नंतर आतूनच तुटून जाते. त्रास होतो.
ती प्राईम नंबर आहे की नाही? हा प्रश्न तिला पडतो.

तिला समजून घ्यावं, तिला त्या घरात स्थान मिळावं, जसं तिने स्वीकारले आहे सर्वांना तसं घरातल्यांनी स्वीकारावं हीच माफक अपेक्षा असते; पण तसं होत नाही. चार भिंतीच्या आत तिला ठेवलं जातं. पक्ष्याचे पंख कापल्यावर जसा पक्षी तडफडतो अगदी तशीच तिचीही अवस्था होते.

स्वतःचा आत्मविश्वास गमावते.
आणि एक दिवस ती निर्णय घेते त्या घरातून बाहेर पडण्याचा,कारण तिला स्वतःला गमवायचं नसतं. केवळ घरातील कामं, सर्वांची मर्जी सांभाळण हेच आयुष्य तिला जगायचं नसतं. तिचा छंद तिची ओळख असते, ती ओळख जपायची असते. ज्या घरात ती खूप सारी स्वप्न घेऊन आली होती आता त्या घरातून कधी बाहेर पडते असे झाले होते.

एक दिवस ती घराबाहेर पडते.

माहेरी तिला समजावले जाते, इतकी लहान गोष्ट आहे, ह्यासाठी घर सोडणार का?


खेदाची बाब ही की, तिला जवळची माणसं देखील समजून घेत नाही, मग ती काय करते?
स्वतःसाठी स्टॅण्ड घेते.

रडत बसत नाही. तिला माहीत पडलं होतं तिच्यासाठी योग्य काय? वेगळं व्ह्यायची तिला नक्कीच हौस नव्हती, पण ते पाऊल उचलावं लागलं. स्वतःला हरवायचं नव्हतं.

ती मनाचं ऐकते.
ती प्राईम नंबर असते, असा नंबर ज्याला
कोणाचीच गरज नसते. सक्षम असा नंबर.
ती सक्षम असते.


वाचून लक्षातच आलं असेल कोणत्या चित्रपटाविषयी आहे.

Mrs.

हसऱ्या चेहऱ्याची ती, अगदी बाहुलीप्रमाणे दिसणारी, कुरुळे केस, चेहऱ्यावर तेज, अशीच ती.

आपल्यातीलच एक वाटावी अशी.

खूप छान पद्धतीने तिची मनस्थिती दाखवली आहे.

प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा असाच एक चित्रपट Mrs. एकदा जरूर पहावा.

अश्विनी ओगले.