भाग...3 मृगजळ आभास...
वहिनी....ताई अहो मला नाही जायचे माहेराला, मी अजून काही असे ठरवले नाही, तिकीट ही सध्या मिळणार नाही, आणि अजून आईला ही तसे कळवले नाही...सध्या हे असे काही उगाच नको ,मला कोणी अडवत नाही....जेव्हा जायचे तेव्हा आपण सोबतच जाऊ..पण निदान जबाबदारी झटकून नाही मी जाऊ शकणार..तुम्ही किती दिवसांनी आला आहात.. मी गेल्यार माझे ही दादा वहिनी येत असतात, भेट होते आणि वेळ ही छान जातो ,जर असेच मध्ये गेले तर ते दोघे ही ऐन वेळी सुट्टी टाकून येऊ शकत नाहीत...म्हणून मी ठरवले आहे की ते आल्यावर जाऊ..आणि महिना भर तरी माझ्याच्याने शक्य नाही.. मला कळते की सासूबाई आज काहीच करू शकत नाही ,त्यांची खूप चीड चीड होते..नको ते बोलून जातात पण म्हणून मी ही त्यांच्या सारखे का वागायचे..आणि हो मी ह्या वेळी जाणारच आहे ,माहेरी लग्न आहे म्हटले की निदान 20 दिवस ये म्हणत आहे माझी वहिनी..आई ही थकली आहे आणि तिला ही जमत नाही, मग ती ही चीड चीड करत असेल ,म्हणून वहिनी म्हणते तुम्ही आलात तर आईंना तुम्ही शांत करू शकतात...म्हणून कधी कधी वहिनीला माझ्या मुळे माझ्या माहेरी हायसे वाटते...जसे तुमच्या मुळे मला काही दिवस हायसे वाटते.
सासूबाईला आता तर खरच टेन्शन आले होते ,आता कुठे आरामात दिवस चालले होते ,तर सुनेने आपल्या लेकीला माहेरपणासाठी बोलावून घेतले ,कुठे फिरायला जायचा प्लॅन केला तर लेक त्या फॉर्म्युल्याचे निमित्त करून माहेरी आली, मी का लेकीला ही फॉर्म्युला गोळी दिली की आता ही सतत तो आजमावत तर राहणार त्यात वहिनीला ही फुस लावणार...
सासू.... शीतल तुला आता खूप दिवस झाले आहेत माहेरी येऊन तू कधी जाणार आहेस परत तुझ्या घरी ,की दादाला सांगू सोडवायला, हे नेहमी नेहमी माहेरी येणे चांगले नाही ,आणि सतत सासूला त्रास देणे ही योग्य नाही बरं... झाले इतके माहेरपण खूप झाले...माझ्या सुनेला खूप काम पडत आहे..
सून....शीतल ताई तुम्ही ,आता नको तो विषय टाळा ,आता अतिरेक नको बरं, आई आहेत तुमच्या, त्यांनी चूक केली म्हणजे तिचा इतका मोठा बाऊ का करायचा.. मी तर म्हणते तुम्ही आईला समजून घ्यावे...ना की समजून सांगावे..ह्या वयात खूप चल बिचलता येते, कोण जाणे माझ्या ही आईला हेच दुखणे असेल, ती ही वहिनीला असेच करत असेल ,म्हणून मी तिला समजून घेण्याऐवजी तिला समज देत बसले तर तिला कोणाशी ही बोलायची इच्छा होणार नाही, ती कोणाकडे ही बोलती होणार नाही कधीच..दुसरे म्हणजे आई ह्या आजच बोलल्या आहे ,मी दोघी असतांना त्या कधीच बोलत नाही..
लेक...वहिनी काही ही बोलू ,मला समजून सांगो ,तरी ही आई आता मी वहिनीला माहेपणाला पाठवल्याशिवाय इथून जाणार नाही, तिला एकदा पाठवली की मी ही मोकळी सासरी जायला, आणि हो तू काळजी करू नकोस ,मी माहेरी आले म्हणजे आयते नाही खाणार...मी काही मदत तर करणारच तुला...कारण मला माहित आहे की तुला आयते खाणारे मुळीच पसंत नाहीत.. खरे तर तुझे वय झाल्यापासून माझे माहेरपण माझी वहिनीच करते...नाहीतर आधी मी येणार म्हंटले की तुला जीवावर यायचे... आणि मला तर माहेरी येऊ वाटायचे.. मग वहिनीने पुढाकार घेतला आणि तेव्हा तिने मला सांगितले...तुम्ही हक्काने माहेरी या ,मी तुमचे माहेरपण करेन ,आई थकल्या असल्या तरी तुम्हाला माहेरपणाचे सगळे सुख मिळेल...हवे तर त्या चार पाच दिवसात अगदी सगळे आयते मिळेल... आणि नको नको म्हणत असतांना तिने मला बोलावून घेतले आणि माझे माहेरपण पुन्हा सुरू झाले... मग हे तिच्या बाबतीत का नको ग आई..इतकी का पाण्यात बघतेस तू तिला..
सासूबाई...खरंय ग..चुकले मी..पण तिला माहेरी पाठवायचे म्हंटले की मला दडपण येत कामाचे ,खूप काम असते ,ती जितके करते तितके मला आता नाही जमत वयानुसार... निदान तू असेपर्यंत तरी नको तू गेलीस की जाऊदे तिला माहेरी माझी काही हरकत नाही..
सून....आई आहो मी आताच नाही जाणार ,मी ताई असेपर्यंत नाहीच जाणार ,मी मे महिन्याचे बुकिंग केले आहे मुद्दाम... म्हणजे ताईंना त्यांच्या सासर पर्यंत सोडून येणे ही होईल आणि माझे माहेरपण ही होईल...
लेक...आई तोपर्यंत मी असे ठरवले आहे हे चार दिवस आरामात माहेरपण उपभोगणार आहे आणि पुढेच चार दिवस वहिनीला माहेरपण देणार आहे, तिने ही हक्काने आयते खायचे आहे ते ही तिच्या सासरी.. तुझी काही हरकत असेल तर आत्ताच सांग नाहीतर तो फॉर्म्युला आहेच...
सासूबाई...अजून किती मला खजील करशील तू, आता किती ते कौतुक करशील तुझ्या वाहिनीचे.. इतक्यात तितक्या छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात ना सासू सूनच्या.. मग काय गरीब सासूला नेहमीच कॉर्नर करणार आहात का तुम्ही..आता तू लेक म्हणून बाजू घेण्या ऐवजी माझी दुष्मन होणार आहेस का..?
आई मनातल्या मनात दुःखी होत होती, लेकीला ही कसे कळत नाही जे माहेरपण आणि माहेरपणाचे सुख मी माझ्या आयुष्यात उपभोगले नाही ते मला कसे समजेल, आज वर फक्त सासर आणि सासुरवास, नाही आईची माया अन कोणी बाजू घेणारे होते सासरी...
सासूबाई ने आपल्या मैत्रिणीला फोन लावला आणि आज का कोणास ठाऊक करमत नाही पण मन मोकळे करावेसे वाटते म्हणून त्यांनी त्यांच्या खास मैत्रिणीला फोन करायचे ठरवले आणि त्यांनी फोन केला.. डोळ्यात पाणी होते , पण मैत्रिणीने फोन उचलतात त्यांनी मन घट्ट केले आणि कणखर आवाजात बोलायला सुरुवात केली..कंठ दाटला जरी असला तरी मुळीच रडायचे नाही, मुळीच मैत्रिणीला समजू द्यायचे नाही असा विचार करत त्या हॅलो म्हणाल्या, सगळे बोलणे झाल्यावर मात्र मैत्रिणीने त्यांना विचारलेच
हॅलो, बयो अग काय झालं ,काही बोलायचे राहून गेले असेल तर बोलून मन मोकळे कर बरं, मला बाई तुझी मनस्थिती ठीक दिसत नाही, तुला नेहमी हसण्याची आणि माझे टेन्शन कमी करण्याची सवय असते ,पण आज तू जरा ही हसली नाहीस ,सुनेबद्दल काही सांगितले नाहीस ,लेकीबद्दल काही कौतुकाचे शब्द बोलली नाहीस म्हणजे काही तरी झालंय तुला.
सासूबाई मैत्रिणीला म्हणालाच ," अग माझ्या आयुष्यात माझा पैसा, माझे घर ,माझी मुलं ,माझी प्रॉपर्टी हे फुकट नाही मिळाले हे तुला तर चांगलेच माहीत आहे ना, त्यासाठी मर मर केली तेव्हा कुठे हे मिळाले आहे, ज्यासाठी मला सासऱ्यांच्या लोकांनी मला तीळ तीळ तरसायला लावले...ते मला कमवावे लागले, माहेरच्या लोकांनी फक्त एका साडीवर आणि नारळ देऊन पाठवले तर परत वळून पाहिलेच नाही ,बाबाने ही खबर नाही घेतली ,आई तर सावत्र होती मग कसले माहेर.. पण ह्या घरात माझा तो कोपरा अजून ही हळहळता आहे ,ह्याची कोणी साधी दखल ही घेतली नाही..."
इकडे सुनेने सासूबाईचे बोलणे चोरून ऐकले, आणि तिला कळले सासूबाई आज ज्या इतक्या कणखर दिसत आहेत ,किंवा कडक वागत आहेत त्या मागे किती तरी दुःख आहे..आमच्यासाठी माहेरपण सहज सुंदर भावना आहे ,टेन्शन आणि ओझे जिथे आम्ही उतरवून येतो ते हक्काचे ठिकाण आहे पण हे त्यांच्या निशीबातच कधी आले नाही. माहेरपण न मिळालेल्या आणि त्यासाठी आसुसलेल्या माहेर वाशिणीला काय दुःख असेल हे त्यांना बघून आज कळले..
सुनेने ठरवले आपण आईला समजून घ्यायला हवे..
क्रमशः ,?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा