Login

मृत्यूचे गूढ अंतिम

मृत्यूचे गूढ
वडिलांच्या जाण्याने वैदेही फार दुःखी झाली होती. बाबांचा चेहरा सतत समोर येत होता. राजवीर तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता; पण त्यालाही माहीत होतं हे दुःख खूप मोठं आहे.

तिला सावरायला वेळ हा लागणारच होता. नम्रता देखील उदास झाली होती.

एक दिवस नम्रता स्वतःचा फोन विसरून बाहेर गेली होती.

"वैदेही बाळा खूप वेळ झालं आईचा फोन वाजतोय." लता मावशींनी वैदेहीला मोबाईल दिला.


आठ मिसकॉल होते. अनोळखी क्रमांक होता. पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला. वैदेहीला वाटलं महत्त्वाचा असेल.


'आई तर करत नसेल दुसऱ्या नंबरवरून?' नको नको ते विचार येऊ लागले.


इतका वेळ एकाच नंबरवरून का कॉल येत असतील? हे पाहण्यासाठी तिने फोन कॉल रिसिव्ह केला.

"हॅलो." वैदेही.

"ओय मॅडम, कितना कॉल किया फिर भी फोन नही उठाते हो आप. मेरा पैसा कब दे रहे हो."


वैदेहीला वाटलं समोरून व्यक्तीने चुकून फोन लावला.

"देखीये आप शायद गलत नंबर पे फोन लगाये हो |  रॉंग नंबर है| असं बोलून तिने फोन ठेवून दिला.

पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला. आता तो माणूस मात्र खूप रागवला होता आणि रागातच बोलू लागला.

"ओ मॅडम मुझे उल्लू मत बनाओ|  ये नम्रता मॅडम का फोन नंबर है ना?  और मै आपको जानता नही क्या?  आप सब बडे लोग एक जैसे ही होते हो| काम तो करवाते हो लेकिन फिर पैसा देणे मे नाटक करते हो. मुझे मेरा एक करोड चाहिये. नही तो मै पोलीस को सब बता दूंगा."

तितक्यात बेल वाजली. मावशीने दार उघडलं. नम्रता आली होती.  आल्या आल्या ती स्वतःचा फोन शोधू लागली.


"आई तुला काही हवं आहे का?"

" हो, मी जाताना माझा फोन विसरले."  वैदेहीने टेबलवर ठेवलेला फोन दिला. आता मात्र वैदेहीच्या डोक्यात अनेक विचार घोळू लागले. नक्की तो माणूस कोण होता?  आणि बरोबर नम्रताचं नाव कसं घेतलं? एक करोड कशाला पाहिजे?  याची लिंक वडिलांच्या मृत्यूशी तर नाही ना?  आईनेच असं करायला सांगितलं होतं का?   काहीतरी गडबड आहे. तिला आता नम्रतावर शंका आली; पण ती काहीच बोलली नाही. तिला आता शांतपणे सर्व गोष्टी हँडल करायच्या होत्या. जराही चूक केली तर आईला संशय येणार.


नम्रता फोन घेऊन रूममध्ये गेली.  वैदेही तिच्या पाठी हळूच गेली आणि तिच्या रूमच्या दाराला कान लावून ऐकू लागली. बहुतेक त्याच नंबर वर फोन केला आणि त्या माणसाशी बोलू लागली.


"आपको समजता नही क्या ? इतनी बार फोन क्यू कर रहे ? मैने बोला ना कल मे आपको आपका पैसा दे रही हु. अब बार बार फोन करके मुझे परेशान मत कीजिए.  आपका पैसा मिल जायेगा. एक क्या मै आपको दो करोड देती हु.  लेकिन इसके बाद मेरे मोबाइल पे फोन नही करणा."


हे सगळं ऐकून तर वैदेहीला धक्काच बसला.   तिला विश्वासच बसत नव्हता की, हे सगळं आई करू शकते. आता तर पूर्ण खात्री पटली होती. आता ती उद्याच्या दिवसाची वाट बघत होती. नम्रता तयार होऊन कुठेतरी चालली होती.  वैदेहीने तिला विचारलं तर म्हणाली एका मैत्रिणीकडे जात आहे. वैदेहीला शंका आली होती ती खरीच होती. त्यामुळे थोड्यावेळाने ती देखील तिचा पाठलाग करू लागली.  एका  ठिकाणी तिने त्या माणसाला बोलावले होते. भल्या मोठ्या बॅगमध्ये दोन करोड कॅश तिने घेतली होती.

ती त्याला पैसे देणार तितक्यात पोलिसांची गाडी समोर येऊन उभी राहिली.  कॉन्स्टेबल मुक्ता पाटील आणि त्यांच्यासोबत हवालदार होते. पोलिसांना पाहून नम्रता आणि तो माणूस घाबरला. तो माणूस पळू लागला; पण त्याला लगेच पकडण्यात आलं.  नम्रता तर निरुत्तर झाली होती.


वैदेही देखील गाडीतून बाहेर आली आणि नम्रताच्या समोर उभी राहिली.

"आई हे काय केलं तू? का माझ्या बाबांचा जीव घेतला?  हे सगळं का केलं ? मला याचे उत्तर आत्ताच्या आत्ता दे?"

वैदेहीला सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिजे होती.  नम्रताच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. 

"वैदेही तुझ्या बाबांनी माझ्यासोबत प्रतारणा केली.  त्यांचं माझ्या मैत्रिणी सोबत अफेअर चालू होतं आणि मी त्यांना रंगेहाथ पकडलं आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं.  कुठे कमी पडले मी?  त्यांनी असं का करावं?  काय कमी पडलं होतं?  सर्व व्यवस्थित होतं,तरी माझा विश्वासघात केला.  मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि मला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप नाही. मॅडम मी तुमच्यासोबत यायला तयार आहे."

ती स्वतःहून पोलिसांच्या गाडीत बसली.
इथे वैदेही स्तब्ध उभी होती.