चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम - सोनल शिंदे
लघुकथा
टीम - सोनल शिंदे
लघुकथा
"काय कळतंय त्या पगलीला." प्रणिता तिच्या शेजारी राहणाऱ्या पायल सोबत बोलत होती.
"अगं, कशी गं बोलतेस, सासू आहे ना ती तुझी! उलट बिचाऱ्या शांत आणि साध्या आहेत त्या खूप.. तुमच्या घरातून कसला म्हणून आवाज नसतो त्यांचा. माझ्या सासूसारखी खाष्ट सासू हवी होती तुला." दोन मैत्रिणींमधला संवाद तुझी सासू माझी सासूवर येऊन थांबला आणि दोन शेजारणी आपापल्या घरी निघून गेल्या.
मंदा म्हणजे प्रणिताची सासू.. फार काही सुविधा नसलेल्या, छोट्याशा खेडेगावात लहानाची मोठी झालेली. एका सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलगी. दिवसभर मर मर कष्ट करायचे आणि आला दिवस जगायचा. घरची बेताची परिस्थिती त्यात खाणारे दहा तोंड म्हटल्यावर मन मारून जगणं नशिबी आलं.
मंदा, रंगाने इतर बहिण भावंडापेक्षा जराशी डावीच होती. अतिशय साधारण दिसणारी पण स्वभावाने शांत. पाठोपाठ झालेल्या बहीण भावंडात आईवडिलांचं आठवं अपत्य; त्यामुळे आईवडिलांची जराशी दुर्लक्षित कन्या. वडील स्वभावाने अतिशय कडक; त्यामुळे त्यांच्यासमोर बोलायची तिची हिंमतच नव्हती. लहानपणी कधीच नवीन कपडा काय असतो? तिला माहिती नव्हतं. मोठ्या भावंडांनी वापरलेले जुने, विरलेले कपडेच तिच्या वाट्याला आलेले. बहीण भावंडांमध्ये ती सगळ्यात छोटी; त्यामुळे त्यांचा पण धाक होताच. परिणामी तिचा स्वभाव जरासा भित्रा आणि सोशिक झाला.
गावात सातवीपर्यंतच शाळा होती. मंदा सातवा वर्ग पास झाली. पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावं लागणार, पण ते शक्य नाहीये तिला माहिती होतं. पुढच्या शिक्षणाची आस तर तिने सोडूनच दिली होती. मोठ्या बहिणींची लग्न होत होती. डोक्यावर पाणी पडलं, की हिच्यासाठी सुद्धा वर संशोधन सुरू होणार होतं.
मंदा तिच्या काकूच्या बाळंतपणात आजीसोबत काकांकडे आली होती. आजीच्या तब्येतीच्या कुरबुरी वाढल्या होत्या त्यात काकूची जुळी मुलं; त्यामुळे त्यांना मदतीची गरज होतीच. मंदाला त्यांनी स्वतःबरोबर ठेवून घेतलं.
"स्वार्थी आहे दोघेही खूप, फुकटची मोलकरीण मिळाली घरकाम आणि मुलांना सांभाळायला." आई आणि मोठ्या बहिणी कधी भेटल्या तर काका काकूंविषयी तिच्या मनात विष कालवायचा प्रयत्न करायच्या. कधीतरी निमित्ताने सर्वांशी भेट व्हायची, "मला घरी यायचंयं" तेवढं बोलायचं सुद्धा धाडस तिच्यात नव्हतं. 'काका काकू स्वार्थी नाहीत, चांगले आहेत ते.' आई आणि बहिणींच्या मताला खोडून काढण्याची ताकद सुद्धा तिच्यात नव्हती. आजसारखा मोबाईल फोनचा तो जमानाच नव्हता; त्यामुळे हळूहळू जन्मदाते आणि तिच्या स्वतःच्या भावंडांशी तिची आपुलकीची नाळ तुटत गेली.
काकांनी मात्र घराजवळ एका शाळेत तिची आठव्या वर्गात ऍडमिशन केली. मंदा आता तिच्या दोन छोट्या चुलत भावंडांना सांभाळत होती सोबत काकूंना घरकामात मदतही करत होती. अधूनमधून तिच्या लग्नाचा विषय तोंड वर काढायचा. पाहुणे यायचे आणि पाहून जायचे. लग्नाचे योग मात्र जुळून येत नव्हते. मंदा मात्र तिचा अभ्यास मन लावून करत होती आणि दरवर्षी चांगल्या मार्कानी पास होत होती. मॅट्रिक बोर्डाची परीक्षा पण ती चांगल्या गुणांनी पास झाली.
"पोरगी हुशार आहे, तिला पुढे पण शिकवा." मॅट्रिकचा निकाल लागला तेव्हा प्राध्यापक कौतुक करताना बोलले. काकांनी मनावर घेतलं, जवळच एका संस्थेत डी एड टीचर ट्रेनिंग कोर्ससाठी तिला ऍडमिशन घेऊन दिली.
मधल्या काळात काकूंच पुन्हा एक बाळंतपण उरकलं होतं. कामं करावी लागत होती, पण आपल्याला शिक्षण घेता येतयं, हा आनंद तिच्यासाठी जास्ती मोठा होता. दोन वर्षात तिने टीचर ट्रेनिंग पूर्ण केलं. योगायोगाने लवकरच तिला नगर परिषदेच्या शाळेत नोकरी मिळाली.
प्रकाशराव, शहरात एका कंपनीत कारकून होते. मंदाची लग्नगाठ त्यांच्याशी बांधली गेली. स्वभावाने सोशिक, शांत मंदा सासरी आली.
मंदाची शाळा एका खेडेगावात होती. शहरापासून ते अंतर दीड दोन तासांच होतं. भल्या पहाटे उठून घरची सगळी काम, स्वयंपाक वगैरे आवरून दीड दोन तासांचा प्रवास करून तिला दररोज दोन बस बदलून शाळेत जावं आणि तेवढाच परतीचा प्रवास करावा लागायचा. घर संसार सांभाळून नोकरी म्हणजे तारेवरची कसरत होती.
लवकरच तिला दिवस गेले. या नाजूक दिवसात तिला एवढा प्रवास झेपणार नव्हता. उपाय म्हणून तिने गावात खोली करून राहण्याचं सुचवलं. "माझं घर तोडणार, एका घराच्या दोन चुली करणार. आम्हाला लेकरं काय झालीच नाहीत काय?" सासूने मंदाची चांगलीच खरडपट्टी काढली. नवरा आईच्या शब्दाबाहेर नव्हता. शेवटी तिनेच माघार घेतली.
एका पाठोपाठ तिला तीन लेकरं झाली. अनिल, सुनील आणि रीनाच्या रुपात संसारवेल बहरली. घर संसार, शाळा, प्रवास सांभाळून मुलाचं संगोपन सोप्प नव्हतं. सकाळी सात वाजता घरातून निघालेली ती रात्री घरी परतायला तिला खूप उशीर व्हायचा. लेकरांची तोंड भुकेने इवलीशी झालेली असायची. आल्या आल्या, हात पाय धुवून लगेच स्वयंपाक करून लेकरांना खाऊ पिऊ घालायची. भांडी रात्रीच घासून ठेवायची. कपडे सुद्धा तिला रात्री धुवावे लागायचे. एवढं करूनही मुलांना आणि सासूबाईला काय हवं नको ते ही ती व्यवस्थित बघायची, पण घरातली साफसफाई, आवराआवर करायला मात्र तिला सवडच नसायची. मंदाच्या सासूबाई नीटनेटक्या सफाईला अत्यंत महत्व देणाऱ्या होत्या. त्यांना सगळं वेळच्या वेळी आणि जागच्या जागी व्यवस्थित लागायचं. दिवसभर मुलं घरात पसारा करायची. त्यावरून त्या चिडचिड करायच्या. एवढं करूनही सासूबाईंची कोणत्या ना कोणत्या कारणावरून कटकट असायची.
"आई अहो, मला आवराआवर करायला वेळच कुठे असतो? किती ही केलं तरी पहिले पाढे पंचावन्न?" तिच्या मनात यायचं, पण वेळेअभावी का होईना सगळीकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष देता येत नाही. स्वतःला दोष देत, सासूबाईंची कटकट कडू औषधासारखी गिळून टाकायची. अनेक वर्ष मूग गिळून बुक्क्यांचा मार सहन करत राहिली.
रविवारी सुट्टीच्या दिवशी सासू तिच्या मागे भिडायची. "हे साफ कर ते साफ कर, हे घास ते धू.." अशी बडबड करायची. आठवड्याभराचे अडून राहिलेले काम तिला करावे लागत होते. मुलांचे शाळेचे कपडे धु. स्वयंपाक, घरातली आवराआवर, उसवलेलं शिव, बटण लावं.. या सगळ्यात रविवार सुट्टीचा दिवस.. उगवायचा तसा मावळायचा. दिवाळी, दसरा, संक्रांतीला मात्र आवर्जून सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे सगळी साफसफाई करायची. सासूबाईंच्या अपेक्षांना खरं उतरण्यासाठी मात्र वेळोवेळी तशी साफसफाई शक्य नव्हतं. अडगळीत ठेवलेल्या वस्तूंवरच्या धुळेसारखे, दोषारोपणाचे घाव तिला कमकुवत बनवत गेले.
सासूबाई आता थकत चालल्या होत्या. मुलं सुद्धा मोठी होत होती. 'आपण नोकरी सोडली तर घराकडे व्यवस्थित लक्ष देता येईल. सगळ्यांच्या अपेक्षांना खरं उतरता येईल तिला वाटायचं.' तिने प्रकाशला बोलून दाखवलं. ऐकून त्याला धक्काच बसला. तो जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला ,"मंद, वेड लागलं की काय तुला? आयती मिळालेली सरकारी नोकरी कोणी सोडतं का? विचार तरी कसा केला मॅड तू. माझी नोकरी प्रायव्हेट, माझा पगार कमी.. टिकेल ह्याची नाही हमी; त्यामुळे तू तुझी नोकरी सोडायची नाही." त्याने निक्षून सांगितलं.
"तू आईकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तिच्या बोलण्याने काय फोड होतात का तुझ्या अंगाला? या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडायचं." त्याने समजावून सांगितलं.
आई आजारी म्हटल्यावर आता तो घराकडे जबाबदारीने लक्ष द्यायचा. मंदाला शाळेतून यायला उशीर व्हायचा तेव्हा रात्रीचा अर्धापर्धा स्वयंपाक तो करून ठेवायचा. आईच्या जेवणाच्या आणि औषधाच्या वेळा सांभाळायला लागला होता; त्यामुळे थोडा का होईना पण तिच्या मनावरचा भार आता कमी झाला होता.
तिचं राहणीमान अतिशय साधं होतं. खरेदी वगैरे जास्ती करायची नाही ती. मोजक्या त्याच त्याच साड्या नेसायची. शाळेत तिच्या बरोबरीच्या मास्तरनी (टीचर्स) वेगवेगळ्या साड्या नेसून यायच्या, मात्र तिला त्याचा कधीच मोह झाला नाही.
"किती कंजूस आहे पैशाच्या पुड्या बांधून वर घेऊन जाणार की काय, कुणास ठाऊक?" शाळेत सोबत काम करणारे तसेच शेजारी पाजारी सुद्धा, त्यावरून खुसुरपुसूरं करायचे, पण तिच्या पगारावर तिचा अधिकार तरी कुठे होता? सगळा व्यवहार प्रकाश बघत असल्याने, सगळा पगार ती नवऱ्याला आणून द्यायची. तो तिच्या पैशातून घर चालवायचा. आता तर बरेच दिवस झाले होते, तो नोकरीवर जातच नव्हता. मुलाचं शिक्षण, आईंच आजारपण, घरखर्च तिच्याच पैशावर निभावला जात होता.
शाळेतून आली की पटकन स्वयंपाक आवरला आणि दोन घास पोटात ढकलले, की कधी एकदा पलंगावर पडते आणि झोपते असं तिला वाटायचं. पण.. रात्री पलंगावर नवऱ्याची मर्जी तिची इच्छा नसताना सुद्धा सांभाळावी लागत होती. तसं ही तिला काय हवंय? हे विचारत तरी कोण होतं.
असेच दिवस पुढे पुढे जात राहिले. हातातून वाळू निसटावी असे दिवस ही निसटले. दोन मुलं एक मुलगी. आता त्यांची शिक्षण सुद्धा आटोपली होती. अनिल, सुनील आणि रीना हुशार होते, चांगले शिकले. तिघे ही आता आपल्या पायावर उभे होते.
रीनाच्या ऑफिसमध्ये तिच्यासोबत काम करणारा विनय. दोघांमध्ये छान मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि दोघांनी लग्न करण्याचं निर्णय घेतला पण जात मध्ये आली. दोघांच्या घरी हे लग्न मान्य नव्हतं. "विनय, चांगला मुलगा आहे." रीनाने सांगितलं.
'पती पत्नीच्या नात्यात प्रेम महत्वाचं, एकमेकांप्रती आदर महत्वाचा. माणसाच्या रक्ताचा रंग एक, जात एक नाही म्हणून त्या नात्याला विरोध करायचा, मंदाच्या मनाला पटतं नव्हतं.' पण तिचं मत विचारात कोण घेणार होतं. उलट, पोरीकडे लक्ष दिलं नाही, आई म्हणून ती कशी कमी पडली?' तिला दूषण देण्यात आली.
"लग्न करून दिलं नाही तर पळून जाऊन लग्न करणार, तसं झालं तर आपलंच तोंड काळ होईल." म्हणून दोन कुटुंबाच्या सहमतीने रीना आणि विनयच लग्न लावून देण्यात आलं. रीना तिच्या संसारात खूश होती. आपल्या मर्जीची होती, ते बघून मंदाला खूप आनंद व्हायचा.
अनिल, सुनील दोघेही नोकरी करत होते. सगळं व्यवस्थित सुरू होतं. अध्येमध्ये कधीतरी सुनील पार्ट्यामध्ये दारू प्यायचा. पैसा दिसायला लागला तसं त्याचं व्यसन वाढत गेलं आणि तो दारूच्या चांगलाच आहारी गेला. "तुला वेळ तरी होता का, मुलांकडे लक्ष द्यायला. मुलगा दारूच्या नादी लागला." त्याच खापर सुद्धा सासूने तिच्या डोक्यावर फोडलं.
एव्हाना, सासूबाई जग सोडून गेल्या होत्या. अनिल लग्नाचा झाला होता. त्याच्या लग्नासाठी मुलींचे निरोप यायला लागले होते. "मियां बीबी राजी तो क्या करेगा काझी." प्रणिता अनिलला पसंत पडली. काहीच दिवसात अनिल सोबत लग्न करून प्रणिता लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली.
"आमची ही तर काय? सकाळी उठते, आवरते आणि शाळेत निघून जाते ती रात्रीच उगवते. प्रणिता आली आणि खऱ्या अर्थाने आमच्या घराला घरपण आलंय." एक दिवस, सगळ्यांसमोर प्रकाशने टोमणा मारला. आपल्या बायकोला, काय वाटेल? किंचित सुद्धा त्याने बोलताना विचार केला नव्हता. मंदाला वाईट वाटलं होतं.
मंदाने सुनेसाठी सोन्याचे मंगळसूत्र, कानातले आणि चांदीचे आवश्यक दागिने बनवले. बाकी उरलेले, हार नेकलेस वगैरे सगळे दागिने अनिलने स्वतःच्या पगाराच्या पैशातून बनवले.
"तू काय केलं? एवढी वर्ष नोकरी करून साधे सुनेसाठी चार अंगभर दागिने सुद्धा बनवू शकली नाहीस तू." एक दिवस लग्नात झालेल्या खर्चावरून अनिलने सुनावलं. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकल्या सारखी वाटली तिला.
"तू काय केलं? एवढी वर्ष नोकरी करून साधे सुनेसाठी चार अंगभर दागिने सुद्धा बनवू शकली नाहीस तू." एक दिवस लग्नात झालेल्या खर्चावरून अनिलने सुनावलं. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकल्या सारखी वाटली तिला.
'शहरात एक पत्र्याच छोट घर होत राहायला. मोठ प्लॉट घेऊन त्यावर एवढं मोठं दुमजली घर तुझ्या बापाने नाही तर या आईच्या पैशातून बांधलं. तुमच्या डोक्यावर आज हे छप्पर उभं राहिलं ते माझ्या पगाराच्या पैशातून!' तिला ओरडून सांगावं वाटलं होतं. पण.. घरात नवीन सून, उगाच तमाशा नको म्हणून ती गप्प बसली. 'शिकवून कमावण्या योग्य बनवलं, तेव्हाच बायकोसाठी दागिने बनवता आले, तेवढी जाणीव सुद्धा अनिलने ठेवली नव्हती.' तिला आज जास्तीच वाईट वाटलं होतं.
प्रणिता शिकलेली होती, नोकरी मात्र करत नव्हती. प्रणिता आली तरी, मंदाच्या दिनचर्येत काहीच बदल झाला नव्हता. सकाळी नेहमीप्रमाणे उठायचं, आवरायचं स्वयंपाक करायचा आणि शाळेत जायचं.
प्रणिता सकाळी उशिरा उठायची. दिवसभर हाताला येईल ती काम केली की दुपारी मस्त ताणून द्यायची. सायंकाळचा स्वयंपाक तेवढा तिला जबाबदारीने करावा लागत होता. तिच्याकडे आता वेळच वेळ असायचा. लग्नातल्या रुखवतातल्या वस्तूंनी तिने घर छान सजवलं होत. अनिलला त्याचं जास्तीच कौतुक वाटायचं. त्याच्या कौतुकाने प्रणिता पण हुरळून जायची.
एक दिवस अनिल म्हणाला,"पहिले आमचं घर म्हणजे उकिरडा होता जणू. कपड्यांचे ढीगच ढीग, बेडवरच्या चादरी विस्कटलेल्या, दिवसदिवसभर भांड्यांचा खच आणि बाहेर चपलांचा बाजार पसरलेला."
"तुमच्या आईला पटायचं? त्या रागावल्या नाही का कधीच?" प्रणिताने विचारलं. त्याने फक्तच.. नाही या अर्थाने, ओठांमधून टिचकी बाहेर काढली होती.
"तिला काही पडलेलं नसायचं. तू येण्यापूर्वी आम्ही घरात रहायचो की उकिरड्यात!" किती सहज बोलून गेला होता तो.
"अरे, तुम्ही उशिरापर्यंत झोपून असायचात. तुमचं अंथरूण, पांघरुण घडी करायला, चपला रांगेत ठेवायला, मी घरी तरी असायचे का?" खडसावून विचारावं वाटत असलं तरी शब्दाने शब्द वाढेल म्हणून ती गप्प बसली.
अनिल घरी असायचा, त्या सकाळी प्रणिता छान वेगवेगळा नाश्ता बनवायची. सायंकाळी अनिल ऑफिसमधून आल्यानंतर, घरी आता बऱ्याचदा चटपटीत काहीतरी बनवल्या जात होतं. सुनबाईने केलेल्या प्रत्येक गोष्टीच सासऱ्याला ही कौतुक होतं.
"आजपर्यंत आमच्या घरात, सुट्टीचा दिवस सोडला तर कधी नाश्ता तोंडाला लागला नाही. सून आली तर काय छान छान मस्त मस्त चमचमीत खायला मिळतंय." आज सायंकाळी, सर्वांनी छान गरमागरम बाहेरून आणलेल्या समोस्यावर यथेच्छ ताव मारला होता. चवीसाठी म्हणून एक समोसा ठेवायची तसदी सुद्धा कोणी घेतली नव्हती. मंदाच्या डोळ्यात दाटून आलं तिने गालावरून ओघळणार पाणी हळूच पदराने पुसून घेतलं. पाऊस आला तर कधी गरमागरम कांदाभजी तर कधी बाहेरचा नाश्ता, नेहमीचं झालं होतं.
"माझे सासरे, येता जाता सासूबाईंना मॅड म्हणतात. खरोखरच, पगली आहे गं ती. काय माहिती शाळेत मुलांना ही शिकवते की मुलं हिला शिकवतात? एवढा पगार कमावण्याच्या लायकीची तरी वाटते का ती." प्रणिता कोणाशी तरी, फोनवर दात काढत जोरजोरात बोलत होती.
मंदाने ते सारं ऐकलं, वाईट वाटलं होतं तिला खूप. खूप रडली होती ती त्या दिवशी. दुखावली गेली होती. त्या दिवसापासून मंदा फक्त आपल्या कामाशी काम ठेवायची. प्रणिता सोबत तिने बोलायचं बंद केलं होतं. प्रणिताला तर सासूसोबत बोलण्यात काडीचा रस नव्हता. दरी वाढत गेली आणि पर्यायाने दोघींमधला संवाद खुंटत गेला.
"आई तू प्रणिताशी बोलत का नाही?" हे कळायला सुद्धा अनिलला बहुतेक बरेच दिवस लागले असावे. पण त्याने "असं का?" विचारण्याची तसदी सुद्धा घेतली नव्हती.
प्रणिताला दिवस राहिले. "आता माझ्या बायकोकडून तुमची हमाली जमणार नाही." अनिलने स्पष्टच सांगितलं.
"आपलंच नाणं खोट म्हटल्यावर, दोष तरी कोणाला देणार?" आम्ही वेगळं होतोय त्याने स्पष्टच सांगितलं होतं.
"माझी बायको, गर्भारपणात जीना कसा चढेल?" अखेर राहत्या घरातून त्याने आईवडिलांचीच हकालपट्टी वरच्या खोल्यांमध्ये केली.
सुनील आता जास्तीच दारूच्या आहारी गेला होता. दिवसरात्र रूममध्ये दारूच्या नशेत पडून रहायचा. दोन समजुतीच्या गोष्टी आई म्हणून त्या सांगायला जायच्या तेव्हा,"तुला नाही कळत गं काही." म्हणायचा. दिवस जात होते. घरात दोन छोटी छोटी नातवंड आली होती मात्र प्रणिता, त्यांना कधीच वर येऊ देत नव्हती.
प्रणिता सुनीलला बेवड्या, दारुड्या म्हणायची. आपली आई आजीला, "पगली, मॅड म्हणते." आता दोघे नातवंड सुद्धा मंदाला मॅड मंदा म्हणायचे.
मंदा आता रिटायर्ड झाली होती. थोडी वार्धक्याकडे झुकत चालली होती. निवांत झाली तशा तब्बेतीच्या कुरबुरी वाढल्या होत्या. एक दिवस पायरीवरून पाय घसरण्याच निमित्त झालं आणि मंदाच्या पायाचं ऑपरेशन करावं लागलं. अनिल आणि प्रणिताने तर साधी चौकशी सुद्धा केली नव्हती. रीनाने मात्र मुलगी होण्याच कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं होतं. रीना मंदाला आपल्या घरी घेऊन गेली आईची चांगली काळजी घेतली; त्यामुळे लवकरच त्या व्यवस्थित चालायला लागल्या होत्या.
एक दिवस सुनील दारूच्या नशेत झोपला तर उठलाच नाही.
"सुटला एकदाचा." म्हणत सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दारूसाठी सुनील भांडायचा, अनिलने मोठा भाऊ या नात्याने कधीच त्याला समजावून सांगितले नाही उलट तो त्याला दारूची बॉटल आणून द्यायचा. मंदा काही बोलायची तेव्हा,"तुला काय कळतंय?" म्हणायचा.
"सुटला एकदाचा." म्हणत सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दारूसाठी सुनील भांडायचा, अनिलने मोठा भाऊ या नात्याने कधीच त्याला समजावून सांगितले नाही उलट तो त्याला दारूची बॉटल आणून द्यायचा. मंदा काही बोलायची तेव्हा,"तुला काय कळतंय?" म्हणायचा.
प्रकाशरावांना पण आता आजारपणाने गाठलं होतं. मंदा मात्र त्यांची व्यवस्थित काळजी घेत होती. "मंदा, मी तुझी कधीच किंमत केली नाही. तुझा सन्मान केला नाही. आई बोलायची, तुझ्यावर चिडायची तेव्हा मी तुझी बाजू घेऊन कधीचं बोललो नाही. मी तुला दोष देत राहिलो. तुला साथ दिली नाही. तुला मंदा नाही तर मंद म्हणायचो. शाळेत शिक्षिका होतीस तू, सन्मान होता तुला. मॅडम म्हणायच्या जागी तुला मॅड म्हणालो. आई तुला कामावरून बोलायची, हाताला उरक नाही म्हणायची. मी तुला मंद म्हणून मोकळा झालो. घराचा सगळा भार उचलणारी तू, मॅडमची मॅड आणि मंदाची मंद झाली कळलंच नाही. आता जेव्हा घरातले छोटे नातवंड तुला तुझा सन्मान देत नाही तेव्हा वाईट वाटतं." आयुष्याच्या शेवटी शेवटी प्रकाशला जाणीव झाली. त्याला पश्चात्ताप व्हायचा. ती फक्तच मिश्किल हसायची.
एक दिवस अचानक छातीत दुखण्याचं निमित्त झालं. हार्ट अटॅकच निदान आणि त्याने जगाचा निरोप घेतला होता.
आता मंदा एकटीच होती. आता तिला कुणाकडूनच काही अपेक्षा नव्हती. जवळच असलेल्या शिव मंदिरात आता ती नित्यनियमाने जायची. शिवशंकराकडे बघत मंदिरात तासनतास बसायची. मंदिरात येणारे शेजारपाजारच्या चार बायकांशी आता तिची छान मैत्री झाली होती. अनिल आणि प्रणिताला आता त्यांचं बाहेर जाणं ही खटकायचं.
"एकटीला कशाला लागतं एवढं मोठं घर, तशाही त्या जास्तीत जास्त वेळ मंदिरातच असतात. त्याच्या हवाली संपूर्ण घर राहील तर घाण करून ठेवतील त्या?" प्रणिताने नामी युक्ती शोधून काढली. मंदाचं सगळं सामान दोन खोल्यांमध्ये ठेवण्यात आलं आणि बाकी घर भाड्याने दिलं गेलं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाईट वाटायचं, पण जिथे अन्याय सहन करणारा काहीच बोलत नाही तिथे दुसरे कशाला बोलतील. सगळे मंदालाच दोष द्यायचे.
"बिचाऱ्या, आपल्या काळजाचा तुकडा देतात गं आपल्याला. माझी सासू कडक आहे स्वभावाने. मला फार अधिकार नाहीयेत घरात. त्यांचं ऐकावं लागतं, पण त्यांच्यामुळे मला ह्यांच्यासारखा नवरा मिळाला. तेवढ्यासाठी मी आयुष्यभर त्यांचं ऐकू शकते." शेजारी राहणारी मैत्रीण पायल प्रणिताला नेहमी समजवायची.
"उपकार थोडीच करतात. मुलाचं लग्न करायचं तर सून आणावीच लागणार. आपण नाही तर आपल्या जागी दुसरं कोणीतरी असतं. उगाच पाय धुवून पाणी पिण्याएवढे उपकार नाही केले त्यांनी. मी नाही बसवत कोणाला एवढं डोक्यावर." आजही, दोघींमध्ये यावरून चर्चा रंगली पण प्रणिताने काही एक ऐकून घेतलं नव्हतं.
'आली मोठी मला अक्कल शिकवणारी. ऋणात रहावं वगैरे! घेऊन जा आमच्या घरच्या पगलीला आणि ठेव तुझ्या घरी. पगलीला पगली नाही तर काय म्हणायचं? मॅड म्हणायचं!' घरात आली आणि एकटीच पोटभरून हसली.
एक दिवस मंदिरात भजन सुरू होतं. मंदा शांतपणे ऐकत बसली होती. भजन ऐकता ऐकता महादेवाच्या पिंडीकडे एकटक बघत मंदाने कधी जीव सोडला, कळलंच नाही. कुणाला काही न कळू देता मंदाने या जगाचा निरोप घेतला होता.
अंत्यसंस्काराच्या वेळी डोळ्यातून मंदासाठी अश्रू गाळणारे मोजकेच होते. ओलावल्या डोळ्यांनी "आपली आई सुटली एकदाची." म्हणत शेवटच्या क्षणी, रीना आईच्या केसांवरून, चेहऱ्यावरून हळूवार हात फिरवत होती.
मंदाचं शेवटच दर्शन घ्यायला आलेल्या प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होतं, "क्षणभंगूर या आयुष्यात.. मरण असावं तर अस्स. चालता फिरता, कुणाला काही कळू न देता आलेलं!"
अंत्यसंस्कारात आलेला प्रत्येक जण आज मंदाच्या जगण्याचा नाही तर मरणाच्या मोहात पडला होता. आयुष्याने तिचा पदोपदी अपमान केला, मात्र मरणाने तिचा सन्मान केला होता.
शुभांगी मस्के.
शुभांगी मस्के.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा