मंगळवारचा दिवस. सकाळची वेळ. नेहमीसारखीच मनीषाताईंची घाई गडबड सुरु होती. घरातले केरवारे, अंघोळ, स्वच्छ साडी - मॅचिंग ब्लाउज घालून मग देवाची मनोभावे पूजा, लगोलग भाजी चिरुन ती फोडणीला घालणं, एकीकडे पोळ्यांची कणिक मळणं अशी एक ना अनेक कामं मनीषा ताई हातावेगळी करत होत्या. खरं म्हंटल तर घाई गडबड करायचं तसं काही कारण नव्हतचं. त्या एकट्याचं राहायच्या. एकाचं माणसाचा स्वयंपाक! पण नेहमीच्या सवयीनं त्या तो सकाळी लवकरचं करून ठेवायच्या.
पूर्वी नोकरीचं ओझं मागे असायचं. मनीषाताईंच्या आधी नाश्ता करून, दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन त्यांचे मिस्टर मंगेशराव बाहेर पडायचे. ते गेल्यावर मग अदितीच्या शाळेची घाई असायची. अदिती शहाणी मुलगी होती. ती नेहमी स्वतःचं दप्तर, डबा बाटली स्वतःचं स्वतः भरून घ्यायची. नाश्तासुद्धा बरेचदा हातानी वाढून घेऊन खाऊन घ्यायची.
'आई, आज मला डब्यात अमुक एक पदार्थ दे' किंवा 'आजच्या दिवस माझा डबा तू देतेस का भरून?' असं कधीही अदितीने म्हंटल नाही. तिला माहित होतं आईला ह्यासगळ्या साठी वेळचं नाहीये. अदिती लहान होती पण ती समजून घ्यायची.
मनीषाताई प्रायमरी शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनाही शाळेसाठी सकाळी लवकर आवरून बाहेर पडावं लागे. मराठी विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. दुसऱ्यादिवशी शाळेत काय शिकवायचं याची तयारी त्या आदल्या दिवशी करून ठेवायच्या. शिकवण्यासोबत मुलांशी हसून खेळून वागायच्या त्यामुळे मुलांच्या त्या प्रिय शिक्षिका होत्या. अदिती स्कुलबसने शाळेत जायची आणि लगोलग मनीषाताई आपल्या स्कुटीवरून त्यांच्या शाळेत जायच्या. त्यांचं रोजचं रूटीन अगदी ठरलेलं आणि साचेबद्ध असायचं पण आता मागच्या वर्षी रिटायर्ड झाल्या आणि त्यांच्या मागची सगळी घाई संपली. त्यातून आता मंगेशरावही त्यांच्यात नव्हते.
सहा महिन्यांपूर्वी एका अपघातात त्यांनी मंगेशरावांना गमावलं होतं. आता मागे उरल्या होत्या मनीषाताई आणि अदिती. तरी एक जमेची बाजू होती ती म्हणजे अदितीचं लग्न बाबा जायच्या आधी झालेलं होतं. आपल्या लेकीचा संसार डोळेभरून बघूनचं तिचे वडील अनंतात विसावले होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टू बी ऐच के फ्लॅट मध्ये आता त्या एकट्याचं राहायच्या. एकट्या होत्या तरी त्यांच्या स्वयंपाकाच्या सवयीत अजिबात खंड पडला नव्हता. पूर्वी नोकरीमुळे ताटात डावीकडे उजवीकडे पदार्थ मांडून घेऊन जेवणं त्यांना शक्य झालं नव्हतं पण आता वेळ होता आणि आवडसुद्धा होती त्यामुळे एकटी साठी सुद्धा त्या रोज साग्रसंगीत स्वयंपाक करायच्या.
एक छोटी वाटी इंद्रायणी तांदुळाचा भात, वरण किंवा आमटी, दोन घडीच्या पोळ्या, कोशिंबीर आणि घरात असेल ती कोणतीही भाजी एक वाटीभर! असा सगळा स्वयंपाक शिस्तीत असायचा. आजसुद्धा त्यांनी सगळं उरकलं आणि बेडशीटस धुवावीत म्हणून सगळी बेडशिट घेऊन त्या बाथरूममध्ये गेल्या. बेडशीटच्या टोकात पाय अडकला आणि काही नं कळता अचानक जोरदार आपटल्या. बाथरूमच्या उंबऱ्यावर त्यांचं डोकं चांगलंच आपटलं. काही समजायच्या आत त्यांची शुद्ध हरपली.
तरी बरं, मघाशी दूधवाला दूध घेऊन आला त्यांवेळी उघडलेलं दार आत्ताही उघडं होतं. कसला आवाज झाला म्हणून पाहायला शेजारी राहणाऱ्या सुमन वहिनी आल्या तर त्यांना मनीषाताई बाथरूममध्ये पडलेल्या दिसल्या. प्रसंगावधान राखून त्यांनी शेजारपाजारच्या लोकांना बोलावून आणलं आणि धावपळ करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. एकीकडे अदितीला फोन करून कळवलं. अदिती आणि तिचा नवरा यश धावत पळत आले. छोट्या दवाखान्यातून मग मुलांनी त्यांना मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवलं. मनीषाताईंवर ट्रीटमेंट सुरु झाली. जवळपास चार पाच तासांनी मनीषाताई शुद्धीवर आल्या. त्यांनी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिलं तर उजव्या हाताच्या खुर्चीवर अदिती बसलेली त्यांना दिसली.
"बरं वाटतंय मला अदिती." त्या अस्पष्टपणे बोलल्या. बोलण्यात अजून स्पष्टता आलेली नव्हती.
"आई, शांत पडून राहा. बोलायची घाई करू नकोस. मी इथे आहे तुझ्याजवळचं." अदिती त्यांच्या केसांवरून मायेनं हात फिरवत म्हणाली आणि मनीषाताईंच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. मनीषाताईंना अदितीचं हे रुप नवीन होतं. किती जबाबदारीनं ती सगळं हॅन्डल करत होती.
जलदकथा नोव्हेंबर 2025
क्रमशः
©️®️सायली पराड कुलकर्णी
वरील कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कळवा. सूचना असल्यास त्याही जरूर द्या. लेखिकेच्या नावासहित शेअर करायला हरकत नाही.
©️®️सायली पराड कुलकर्णी
वरील कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कळवा. सूचना असल्यास त्याही जरूर द्या. लेखिकेच्या नावासहित शेअर करायला हरकत नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा