"आई, तुला हॉस्पिटलमध्ये आता चार पाच दिवस राहावं लागेल. एकदा डिस्चार्ज मिळाला ना की आपण माझ्या घरी जाऊ." अदिती शांतपणे आईशी बोलली.
"तुझ्या घरी? नको गं मी राहीन की आपल्या घरी. नको काळजी करू तशी बरी आहे मी." मनीषाताई म्हणाल्या.
"नाही! मी तुझं ह्याबाबतीत काही ऐकणार नाही हं आई. आता तुला एकटीला काही दिवस तरी राहता येणार नाही. काही दिवस आमच्याकडे राहावं लागेल. तसंही कोण असतं घरी? मी आणि यश दोघेच ना! काही अडचण होणार नाही तुला आणि एकदा का बरी झालीस की जाशीलच ना आपल्या घरी. बरं, मी तुझी एकुलती एक मुलगी मग तू आमच्याकडे राहिलीस तर बिघडलं कुठे?" अदितीच्या बोलण्यात माया होती.
'अदितीला तिचं म्हणणं किती छान नीटसपणे समजावून सांगता येतं; आज इतक्या दिवसांनी हे आपल्या लक्षात आलं' मनीषा ताई मनातल्या मनात विचार करत होत्या.
काही दिवस गेले. मनीषा ताईंच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा होत होती. चार दिवसात डिस्चार्ज मिळेल असं वाटलं होतं पण त्यांना घरी सोडायला आठ दिवस लागले.
अदितीने ठरवल्याप्रमाणे मनीषा ताई हॉस्पिटलमधून थेट तिच्या घरी गेल्या. यश त्यांना हॉस्पिटलमधून घरी न्यायला त्याचा वेळ काढून आला होता. मनीषाताईंना खूप भरून येत होतं. त्यांच्यासाठी मुलांची चाललेली धावपळ पाहून खजील व्हायलाही झालं होतं.
अदितीचं घर तसं ऐसपैस होतं. चार खोल्यांचा मोठा फ्लॅट होता. मनीषाताईंची राहण्याची सोय लेकीनं स्वयंपाकघराच्या जवळच्या खोलीत केली होती.
"आई, तू इथे ह्या खोलीत राहिलीस की मग मला स्वयंपाक करताना तुझ्याशी गप्पा मारता येतील. तुझ्याकडे लक्ष राहील माझं. तुला काय हवं नको ते पाहता येईल म्हणून मुद्दाम तुझी सोय ह्या खोलीत करायचं आम्ही ठरवलं. ह्या खोलीत छान उजेडही येतो. तुला फ्रेश वाटेल." अदिती प्रेमाने म्हणाली.
आईला हाताला धरून सावकाश तिने घरात आणलं. खोलीत नेऊन बेडवर अलगद झोपवलं. आईच्या अंगावर मऊ सुती पांघरूण ओढलं. मनीषाताई क्षणोक्षणी भावुक होत होत्या.
"आधी ह्या खोलीत तर टी व्ही नव्हता ना अदिती? मग हा टी व्ही नवीन घेतलात का?" जरा स्थिरस्थावर झाल्यावर मनीषाताईंनी विचारलं.
"आई तुला कंटाळा येईल ना सारखं बेड वर पडून राहायचा म्हणून मग आणला कालचं. त्या निमित्ताने खरेदी झाली बघ." अदिती सहजपणे आईला म्हणाली.
"अगं किती खर्च उगाच? माझ्यामुळे तुम्हाला दोघांना त्रास होतोय ते वेगळंच आणि टी व्ही चं म्हण्टशील तर मी इथे कायम थोडी राहणार आहे?" मनीषा ताई म्हणाल्या.
"अगं आई, हे तुझ्या लेकीचं घर आहे. तुला वाटलं तर तू कायमस्वरूपी पण इथे राहू शकतेस. संकोच कशाला? आणि यशचा स्वभाव तुला माहित आहे. त्यामुळे तू कसलाही संकोच बाळगू नकोस. आम्हाला दोघांना ठाऊक आहे की तुला सकाळी बातम्या आणि संध्याकाळी निवांतपणे मराठी सीरिअल्स पाहायला खूप आवडतं त्यामुळे आणला टी व्ही.आता हा अगदी तुझ्यासाठी राखीव बरं!" हसून अदिती म्हणाली.
'खरंच किती करतेय ही आपल्यासाठी! किती छान बोलतेय. आपला इतका विचार करतेय. खरं पाहिलं तर अदितीसुद्धा दमली असेलचं ना! आपल्यामुळे तिची हॉस्पिटलमध्ये किती धावपळ झाली. घरचं करून आपल्याकडे पाहणं तिला किती अवघड झालं असेल पण चेहऱ्यावर आणि बोलण्यात दमणूक अजिबात नाही पोरीच्या! यश पण किती उत्तम साथ देतायत अदितीला.' मनीषाताईंच्या मनात विचारांनी गर्दी केली.
जलदकथा नोव्हेंबर 2025
क्रमशः
©️®️सायली पराड कुलकर्णी
वरील कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कळवा. सूचना असल्यास त्याही जरूर द्या. लेखिकेच्या नावासहित शेअर करायला हरकत नाही.
©️®️सायली पराड कुलकर्णी
वरील कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कळवा. सूचना असल्यास त्याही जरूर द्या. लेखिकेच्या नावासहित शेअर करायला हरकत नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा