"आई, तुला काहीही हवं असेल तर मला हाक मार. मी इथेचं स्वयंपाकघरात आहे. तू बरी होईपर्येंत मी ऑफिसला काही जाणार नाहीये. इथेचं असणार आहे तुझ्यापाशी." खोलीतून बाहेर जाताजाता अदिती म्हणाली.
नंतर मग कितीतरी वेळ मनीषाताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिल्या. त्यांच्या नकळत त्यांचे डोळे मिटले. नाही म्हंटल तरी दवाखान्यातला क्षीण आलाचं होता. त्या पाठीमागे ठेवलेल्या उशीवर रेलल्या. पांघरून ओढून दिवाणावर पडून राहिल्या. त्यांना पूर्वायुष्यातील सगळं एक एक करून आठवू लागलं....
त्यांचं जुनं वाड्यातलं घर! अवघी दोन खोल्यांची जागा. प्रेम विवाह केल्यामुळे मनीषाताईंच्या सासरच्यांनी त्या दोघांशी कायमचे संबंध तोडले होते. त्यामुळे हातातल्या दोन बॅग्ज घेऊन ते दोघे घराबाहेर पडले आणि मनीषा ताई आणि मंगेशरावांच्या संसाराची सुरुवात इथूनच झाली. त्यांनी त्यांच्या मर्जीने सजवलेला तो त्यांचा संसार होता. सजवलेला असा विशेष नव्हताचं! कारण तेवढा वेळ आणि आवरशक्ती मनीषाताईंच्या अंगात नव्हती. घरात रोजच्या जगण्याला आवश्यक ते सामान होतं आणि ते जसं जमेल तसं रचून ठेवलं होतं इतकंच. मनीषाताईंचा हे घर सांभाळणे, निगुतीने स्वयंपाक करणे अश्या गोष्टीपेक्षा शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्याकडे कल होता. त्यामुळे सांसारिक गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःला कधीच खूप गुंतवलं नव्हतं.
मंगेशराव मात्र खूप हौशी होते. बाजारात गेलं आणि काही नवी वस्तू दिसली की ते घरासाठी आवर्जून खरेदी करत. घरातल्या बऱ्याचश्या शोभेच्या वस्तू त्यांनी हौसेने खरेदी केलेल्या होत्या. कधी अधे मध्ये मंगेश मनीषाताईंना स्वतःच्या आवडीची साडी, गजरा मनानेच घेऊन यायचे. मग मनीषा ताईंचीही कळी खुलायची. संसाराची गोडी मग दुप्पट व्हायची. ते दोघे एकरूप होऊन जात.
लग्न झाल्यापासूनचं मनीषाताई आणि मंगेशराव दोघांनाही एकमेकांबद्दल खूप प्रेम होतं. सहवासानं ते अधिक फुलत होतं. संध्याकाळ झाली की मनीषाताई नीटनेटकं आवरून मंगेशरावांची वाट बघत बसत. ते घरी आले की मग दोघे एकत्र जेवण करत. जेवण वैगरे झाल्यावर दोघे हातात हात गुंफून लांबवर चालायला जात आणि परतल्यावर एकमेकांच्या मिठीत हरवूनही जात. रात्र अशीच सरत जाई.
काही दिवसांनी त्यांच्या संसारवेलीवर अदिती नावाचं गोंडस फुल उमलून आलं. त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक! बाळाच्या जन्माच्यावेळी मनीषाताई माहेरी गेल्या. त्यावेळीही मंगेशराव नियमितपणे त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात. दोन्ही घरं तशी टप्प्यातचं असल्यामुळे हे सहज शक्य होतं. अदिती चांगली सहा महिन्यांची झाल्यावर मनीषाताई तिला घेऊन आपल्या घरी परतल्या. दोघांची एकमेकांप्रती ओढ तसूभरही कमी झाली नव्हती. पण मंगेशरावांना बायकोसोबत बोलायला बसायलाही मिळेना. कारण अदिती बरेचदा रात्री लवकर झोपयाची नाही. ती दुपारभर झोपून काढायची आणि रात्री तिला खेळण्याची लहर आलेली असायची. त्यातचं तिची लहानमोठी आजारपणं असायची. कधी पोट दुखायचं तर कधी सर्दी ताप यायचा. मनीषाताई चिडायच्या.
'किती त्रास देतेस गं! गप्प झोपत जा की!'
असं म्हणून मांडीवर घेऊन जोरजोरात लहानग्या अदितीला रागे भरायच्या. थोपटायच्या. तशी अदिती रडकी नव्हती पण शेवटी लहान बाळचं ते! कधी कुठे दुखत खुपत असायचं त्यामुळे ती रडायला लागे. मनीषा ताईंना मात्र तिला सांभाळणं जमायचं नाही. त्यांची चिडचिड व्हायची. आई म्हणून बाळाच्या काय भावना किंवा त्रास आहेत ते जाणून घ्यायच्या भानगडीतही त्या कधी पडल्या नाहीत. एकंदरीत कधी त्यांनी अदितीला अंगाला लावूनच घेतलं नाही. तुसड्यासारखं वागणं मात्र नेहमी असायचं.
मंगेशराव मात्र मुलीत रमायचे. बाळाशी खेळताना सगळं विसरून जायचे. बघता बघता अदिती चार वर्षांची झाली. छोट्या शाळेत जायला लागली आणि मनीषाताईंनी राहिलेलं शिक्षण पुढे पूर्ण करायचं ठरवलं. अभ्यास करायला त्यांना मनापासून आवडायचं. त्या हुशारही होत्या. त्यांनी त्यांचा आवडता मराठी विषय घेऊन पी. एच. डी. ला ऍडमिशनही घेतली पण आता ह्या सगळ्यात अदितीचं कसं करायचं हा प्रश्न बाकी होता पण नशिबाने तोसुद्धा सुटला!
त्यांच्या नात्यातल्या गरजू सुद्धा मावशी देवदूतासारख्या त्यांच्या अडचणीच्या वेळी धावून आल्या. त्यांना स्वतःचं असं कोणीच नव्हतं आणि ह्यांनाही जबाबदार व्यक्तीची गरज होतीच! मग सुद्धा मावशी ह्यांच्या घरीच आश्रित म्हणून राहू लागल्या. घरातलं स्वयंपाकपाणी, अदितीचं आवरणं, तिला काय हवं नको ते पाहणं सगळं एकहाती सुधामावशी बघत. त्यामुळे आता मनिशाताई निश्चिंत झाल्या. रात्रीच्या वेळी त्यांना अभ्यासाला शांतात हवी असायची त्यामुळे बरेच वेळी अदिती सुधामावशींच्या जवळच झोपी. अभ्यासानंतर मग मंगेशरावांना मग मनीषाताईंना वेळ देता येई आणि मग कोमेजत चाललेल्या प्रेमाला पुनशः पालवी फुटे.
दिवस पटापट सरत होते. बालवाडीत जाणारी अदिती आता प्रायमरी शाळॆत जाऊ लागली होती. शहाणी अदिती नेहमी सगळं सुधामावशींकडूनचं करून घ्यायची पण कधीतरी तिलाही आईची गरज वाटायची. आईने आपली वेणी घालावी, आपल्याला शाळेसाठी तयार करावं, अभ्यास घ्यावा, रोज नाही पण कधी तरी डब्यात आवडीचा शिरा करून द्यावा. तिला खूप वाटायचं पण.......
"आई, उठतेस का गं? चहा आणलाय बघ तुझ्यासाठी. मस्त आलं घालून केलाय बघ. सोबत तुला आवडेल असा बदामाचा शिरा पण केलाय." अदिती हळूच मनीषाताईंच्या कानाशी बोलली.
अदितीच्या बोलण्यामुळे जुन्या आठवणीत लांबवर भरकटत गेलेल्या मनीषाताई खडबडून जाग्या झाल्या.
"अरे बापरे झोप लागली होती वाटतं मला. कळलंच नाही एकदम. उठवतेस का बाळा जरा? " असं म्हणत मनीषाताई अंथरुणात उठून बसण्याचा प्रयत्न करू लागल्या पण आजारपणामुळे ताकद क्षीण झालेली असल्यामुळे एकटीने काही त्यांना उठून बसता येईना. अदितीने मग मानेखाली हात घालून त्यांना व्यवस्थित अलगद उठवलं आणि भिंतीला छान टेकून बसायला मदत केली. अदितीने चहासोबत आणलेला शिरा खाताना मनीषाताईंना पूर्वीच्या शिऱ्याची आठवण झाली.
'ही लहानगी अदिती शिऱ्यासाठी हट्ट करायची. डब्यात कधीतरी तिला आपल्या हातचा शिरा हवं असायचा आणि आपण....?' त्या परत विचारात हरवल्या. हातातला भरलेला शिऱ्याचा चमचा तसाच राहिला. ते पाहून अदितीने विचारलं,
'ही लहानगी अदिती शिऱ्यासाठी हट्ट करायची. डब्यात कधीतरी तिला आपल्या हातचा शिरा हवं असायचा आणि आपण....?' त्या परत विचारात हरवल्या. हातातला भरलेला शिऱ्याचा चमचा तसाच राहिला. ते पाहून अदितीने विचारलं,
"झालाय का गं चांगला शिरा? अजून घेतेस थोडा?"
"हो गं छान झालाय. मला आवडतात तसे बेदाणे पण सढळ हाताने घातले आहेस गं अगदी!" मनीषा ताई म्हणाल्या.
"आई तुझ्या हातचा शिरा पण असाचं व्हायचा की! तू काही वेळा शिऱ्यात केशर आणि काजूसुद्धा घालायचीस!" मनीषाताईंना शिरा वाढताना अदिती म्हणाली. बोलता बोलता आईच्या चेहऱ्यावरचे भाव ती निरखत होती.
"बरं ऐक ना आई, आज पासून मी इथेचं झोपत जाईन हं. तुला बरं वाटेपार्येंत तुला सोबत हवी ना गं." अदिती म्हणाली.
"अदिती बाळा नको गं. यश चिडतील माझ्यावर! आधीच तुमच्या दोघांच्या राजा राणीच्या संसारात मी मध्ये आले आहे त्यातून तू झोपयाला पण इथे म्हंटल्यावर! नको बाई ऐक माझं, तू झोप तुझ्या बेडरूम मध्ये." असं मनीषाताई म्हणाल्या पण तरीसुद्धा अदिती त्यांच्यासोबत त्यांच्या खोलीतच झोपली. बरं ती हे सगळं मनापासून करत होती ते तिच्या चेहऱ्यावरचं दिसत होतं.
जलदकथा नोव्हेंबर 2025
क्रमशः
©️®️सायली पराड कुलकर्णी
वरील कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कळवा. सूचना असल्यास त्याही जरूर द्या. लेखिकेच्या नावासहित शेअर करायला हरकत नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा