रात्री झोपताना बारीक आवाजात अदिती रेडिओ लावायची. जुन्या हिंदी मराठी गाण्याच्या धुनीत माय लेकीची रात्र हळूहळू सरायची. मनीषाताई खुश व्हायच्या. म्हणायच्या,
"अदिती ही गाणी ऐकताना सगळं जुना काळ डोळ्यापुढे नाचतो बघ." अदितीपण हसायची. स्वयंपाकघरात काम करताना आईला आवडतात म्हणून अदिती मग भक्तिगीतं लावायची. मनीषाताईंना खूप प्रसन्न वाटायचं. कधी मूड असला मी मग त्यासुद्धा गाणं गुणगुणायला लागायच्या.
"प्रथम तुला वंदितो" किंवा मग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..." मनीषाताई छान गायच्या. त्यांना पाहून मग अदितीला समाधान वाटायचं. ती म्हणायची,
"आई बघ बरं झालं तू आलीस इथे. शरीरासोबत मनाने पण तू फ्रेश वाटते आहेस." मनीषाताई मग हसायच्या.
एक दिवस अदिती म्हणाली,
" आई, तुला आता माझ्या आधाराशिवाय उठता यायला लागलं आहे. तर आपण आता रोज गॅलरीत जाऊन बसत जाऊया. संध्याकाळच्या वेळी तिथून खूप सुंदर सूर्यास्त दिसतो. तुलाही खूप आवडेल." अदिती म्हणाली खरी पण मनीषा ताईंना तिचं हे बोलणं फारसं पटलं नाही. त्या म्हणाल्या,
"मी येत जाईन गॅलरीत. बसत जाईन. तू माझ्यासोबत बसली नाहीस तरी चालेल अदिती. तुला आणि यशला कुठे जायचं असलं बाहेर तर....."
"छे गं! सध्या तू आहेस ना इकडे मग मी फक्त तुझ्यासोबत थांबत जाणारे. बाहेर काय आम्ही नेहमी जातोचं. सध्या तू आली आहेस तर....."
त्यांना मध्येच तोडत अदिती म्हणाली.
त्यांचं बोलणं संपेपर्येत यश तिथे आला. म्हणाला,
"आई, हे घर आणि आम्ही दोघेही तुमचेच आहोत. अजिबात संकोच करू नका. इथे मजेत रहा. आमची तुमच्यामुळे कसलीही गैरसोय होत नाहीये." मनीषाताईंनी पण त्यांना हसून प्रतिसाद दिला.
रोज सकाळी नाष्ट्याला वेगवेगळे पदार्थ अदिती करत होती. जेवणातही छान काहीतरी आवर्जून बनवायची.
"आई आज जेवायला काय करू? तुला काय खावंसं वाटतंय सांग ते करेन." अदिती विचारायची. तिने असं काही विचारलं कि मनीषाताईंचं मन भरून यायचं.
मनीषाताईंना छान वाटत होतंच पण ह्या सगळ्याचं दडपण पण मनावर येत होतं. अदितीच्या चांगुलपणाचं जणू त्यांना ओझं वाटत होतं. त्यांना सारखं वाटायचं की,
'आपण आल्यापासून यश आणि अदितीच्या संसारात त्यांनी आपल्याला पटकन किती छान सामावून घेतलं आहे पण आपण केलं का असं? आपली पोटची पोर असूनही अदितीला आपण असं सामावून कधी घेऊचं शकलो नाही. आपण आणि मंगेश एवढंच आपलं आयुष्य होतं जणू आणि अदिती नेहमी उपेक्षित राहिली. आपण नेमही मंगेश मध्ये गुंतून असायचो आणि उरलेल्या वेळात आपला अभ्यास, शाळा, आपलं करिअर! म्हणायला अदितीच्या बाबतीतली सगळी कर्तव्य आपण पार पाडली पण हे जे प्रेम आत्ता अदिती आपल्याला देतेय तसं प्रेम माया आपण देऊ शकलो का तिला? तिच्या वाढदिवसाला कधी तिच्या आवडीचा पदार्थ आपण घरी करू शकलो नाही. ना दिवाळीला कधी फराळाचे पदार्थ घरी केले. कायम बाहेर ऑर्डर देऊन सगळं मागवत राहिलो पण अदिती घरचं, तिच्या आईच्या हाताचं मिस करतंच असेल ना? काही वेळा तिला सागर वेणी घालून हवी असायची पण आपल्याला वेळ कुठे असायचा तिचे केस गुंफायला? अदिती मोठी होत गेली आणि कदाचित मानाने दूरसुद्धा….. त्यावेळी हे सगळं जाणवलं नाही पण आता कळतं आहे. इथे आल्यापासून एक एक प्रसंग हृदयाला पीळ पाडत चालला आहे. पहिल्यांदा वाटलं नाही पण जसे दिवस सरतायत तसं मनावरचं ओझं वाढतच चाललं आहे. आपण मोडून जाऊ का ह्या ओझ्याखाली?" असे काहीबाही विचार मनीषाताईनाच्या मनात येत.
जलदकथा नोव्हेंबर 2025
क्रमशः
©️®️सायली पराड कुलकर्णी
वरील कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कळवा. सूचना असल्यास त्याही जरूर द्या. लेखिकेच्या नावासहित शेअर करायला हरकत नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा