Login

मुद्दाम भाग 5 अंतिम

नातं फुलण्यासाठी वेळ देणं खूप महत्वाचं असतं हे सांगणारी अनोखी कथा
"हे काय आई? किती अंधार झालाय खोलीत लाईट का नाही लावलास? आणि मी बघतेय हल्ली तू सारखा कसला तरी विचार करत असतेस काय झालं आहे? तुला काही खटकतंय का इथे?" अदितीने एक दिवस विचारलंच.


मनीषाताईंची बदललेली मानसिकता पण तिच्या लक्षात आली होती. त्याचाही मनीषाताईंना त्रास झाला.
'हिला सगळंच कसं कळतं?' ह्याचं नवल त्यांना वाटत होतं.
'अदितीला आपलं मन वाचता येतंय पण आपल्याला कधी तिच्या मनात काय चाललंय हे कळलं नाही. किंबहुना आपण कधी ते जाणून घेतलंही नाही. तिच्या स्वतःच्या घरात, तिचे जन्मदाते जिवंत असतानाही ती एकटीचं होती! किती भयाण आहे हे!' मनात हे विचार येत क्षणी मनीषाताईंच्या अंगावर एक बारीक शिरशिरी उठली. त्यांनी मनोमन ठरवलं कि आपण आता इथे राहायचं नाही. आपल्या घरी परत जायचं. आता तब्येतही तशी बरी आहे. हळूहळू जमेल आपल्याला सगळं. वाटल्यास एखादी बाई ठेवावी हाताशी कामाला. मनातलं त्यांनी अदितीला सांगितलं. अदिती गहिवरून म्हणाली,

"आई, राहा ना अजून काही दिवस. एवढ्यातचं तर आलीस की."

"बाळा, जावयाकडे इतकं राहू नये असं म्हणतात आणि राहिले की! तुम्ही इतकं केलं माझ्यासाठी." मनीषाताई म्हणाल्या.

"असं कुठे काही फार केलं आई? तुला अजून छान न्हायला घालायचं आहे मला. शक्ती नव्हती अंगात म्हणून पंधरा दिवस झाले डोक्यावरून आंघोळचं घातली नाही तुला. डॉक्टरांनी आता परवानगी दिली आहे त्यामुळे मी ठरवलं आहे उद्या तुला छान न्हायला घालावं." अदिती प्रेमानं म्हणाली.


"उद्या मी करेन गं हाताने अंघोळ." मनीषा ताई म्हणाल्या.


" नाही तू नाही! मीचं घालेन. तुझ्या अंगात अजून अशक्तपणा आहे." अदितीच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती.


"बघ म्हणाले ना किती करतेस बाळा! माझ्यामुळे तुला खूप काम पडतंय पण एक सांगू का? दुसऱ्याचं मन जाणण्याची कला तुला अवगत आहे. ती जप. सगळ्यांनाच नाही जमत हे! ह्या मुक्कामात तुझ्या मनाच्या अजून जवळ आल्यासारखं भासलं अदिती पण आता जाऊदे मला बाळा." मनीषाताईंचा आवाज गहिवरला होता.

"आई तू म्हणजे ना! ऐकणार नाही म्हणजे नाहीसच. एकदा तुझ्या मनात आलं ना जाण्याचं की आलं. तू काही निर्णय बदलणार नाहीस. तरी मला आपलं वाटतंय की अजून एखादा महिना राहिली असतीस तर?" अदिती म्हणाली.


"नको गं खरंच नको बाळा." मनीषाताई म्हणाल्या.

" बरं इतकं म्हणतेस तर ठीक आहे. मी आणि यश मावशींना घेऊन उद्या आपल्या घरी जातो आणि साफसफाई करून येतो. परवा जाऊया मग आपण तिकडे ठीक आहे का?" अदिती म्हणाली.

"चालेल." मनीषाताई म्हणाल्या. आपली मुलगी आपली आईचं झाली आहे असं त्यांना जाणवलं.


दोन दिवसांनी मनीषाताईंना घरी पोचवून अदिती आणि यश घरी परत आले. परतीच्या प्रवासात नकळत अदितीच्या डोळ्यांत पाणी आलं. तिच्या मनात आलं,

'खरंतर आई चुकली आपल्या बाबतीत. सगळ्या विद्यार्थ्यांना घडवताना आपल्या 'मातीच्या गोळ्याला' आकार द्यायचाचं विसरली! "दिव्याखाली अंधार" म्हणतात ना तसंचं झालं बहुदा. आपलं सुद्धा चुकलंच आपण इतकं चांगलं मुद्दाम वागलो आईशी. आपल्या चांगुलपणामुळे आईच्या मनावरचं ओझं वाढत होतं. काहींच नं बोलता तिला जुने दिवस, तिचं वागणं खटकत होतं. प्रेमाचा, आपुलकीचा मी प्रसंग तिच्यावर ओझं निर्माण करत होता. कारण..... तिने आपल्यासाठी ह्यातल कधीच काही केलं नव्हतं. आपण मुद्दाम घडवून आणले ह्यावेळी काही प्रसंग! का केलं आपण हे? काय मिळालं ह्यातून? "मुद्दाम" केलं आपण हे!'

"मुद्दाम! मुद्दाम!" हे शब्द तिच्या मनात धडकत होते. मागच्या महिन्याभरातले प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून सरकत होते.
'आई तरी चुकली पण आपण हे सगळं "मुद्दाम" केलं.' ह्याचा गिल्ट अदितीचं मन पोखरत होता........


जलदकथा नोव्हेंबर 2025

संपूर्ण.
©️®️सायली पराड कुलकर्णी.
वरील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही. कथा आवडल्यास शेअर जरूर करा पण लेखिकेच्या नावासहित!
0

🎭 Series Post

View all