Login

मुखवटा भाग १० अंतिम

A Story Of Soldiers.
कथेचे नाव : मुखवटा ( भाग १०) अंतिम
विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.


             
" अगदी, बरोबर बोलली तु मैथिली! ", कोणीतरी समोरुन म्हणाले आणि मैथिलीची नजर जिन्यावर गेली.

       जिन्यावरुन नितेश, नंदिनी, अर्णव, अनन्या, नवी, पार्थ, आरती आणि अर्जुन खाली येत होते. अर्जुनची नजर मैथिलीवर खिळली होती. त्याने अंदाज काढला होता तो खरा निघाला होता आणि याचा त्याला आनंदच होता पण यामुळे तो मात्र गोंधळला होता. मैथिली मुळात कशी आहे हे राणावत कुटुंब आधीच समजले होते पण आपल्यामुळे तिला काही त्रास नको म्हणून ते सर्व शांत होते. आता मैथिली अनन्याची मैत्रिणच निघेल असे मात्र कोणाला वाटलेच नव्हते.

" बरोबर बोलली तु मैथिली! ", नितेश.

" सर, नमस्कार करते! ", असे म्हणत मैथिलीने नितेश आणि नंदिनीला नमस्कार केला.

" बाळा, जशी अनु आम्हाला तशीच तु. तुझाही आम्हाला खूप अभिमान आहे. ", नंदिनी.

" हो आई, आज मैथिलीने नवी आणि पार्थसाठी जे केले ते खरचं कौतुकास्पद आहे. तिच्यामुळे मी बिनधास्त होते तिकडे कारण मला माहीत होते की मैथिली माझ्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही. ", अनन्या हसत म्हणाली.

" अनु, माझी ड्युटी होती ती त्यामुळे त्यासाठी तरी मला थँक्यू म्हणू नकोस. ", मैथिली.

" मैथिली, पण मला एक गोष्ट सांग. आमचा अर्जुन याबाबतीत माझ्यापेक्षाही प्रविण आहे यामध्ये तरीही त्याला तुझ्याबाबतीत कळले नाही. ", अर्णव.

" दादा, अर्जुन सरांना आणि आजोबांना मी कोण आहे ते माहिती होते पण आम्ही ते लपवून ठेवले कारण कोणीतरी तुमच्या पुर्ण कुटुंबावर लक्ष ठेवून होते त्यात माझे असे अचानक येणे संशय निर्माण करु शकले असते म्हणून मी खोटे नाटक करुन कुटुंबात दाखल झाले म्हणजे कोणाला संशय येणार नाही आणि वेळ येईल तेव्हा मी सहज शाळेत घुसून माझे काम करु शकणार होते. ", मैथिली स्पष्टीकरण देत म्हणाली.

" आजोबा, अर्जुन हे खरे आहे का? ", अर्णव.

" हो दादा, मैथिली घरात आली तेव्हाच मला संशय आला होता म्हणून मी पहिल्याच दिवशी मैथिलीला उचलून  आपल्या अड्ड्यावर नेले आणि तिची चौकशी केली. सुरुवातीला काही सांगतच नव्हती अजिबात. सकाळपर्यंत नाही सांगितलेस तर पेपरमध्ये फोटो टाकून ओळख पटवुन घेईन असे सांगितले तेव्हा कुठे तिने मला सगळे सांगितले आणि मी आजोबांना सांगितले. ", अर्जुनने हकीकत सांगितली.

" वाह रे पठ्ठ्या, चांगलेच गंडवलेस आम्हाला. खुद्द बापालाही कळु दिले नाहीस. ", नितेश.

" बाबा, प्रश्न देशाचा आणि नवी, पार्थचा होता. त्यांना काही झाले असते तर वहिनीचा आपल्या देशावरचा आणि कुटुंबावरचा विश्वास उडाला असता जे की मला चालणार नव्हते म्हणून मी सर्व लपवून ठेवायचे ठरवले होते आणि एकमेकांच्या मदतीनेच आम्ही पुढील गोष्टी केल्या आणि त्याचे नियोजन करतच शेवटपर्यंत पोहोचलो. ", अर्जुन.

" हो, आणि प्रेमातही पडलो. ", आजोबा.

" काय? प्रेमात! ", नितेश.

" चिरंजीव, आमची दुसरी नातसुन शोधली बरे का तुमच्या पठ्ठ्याने.", आजोबा.

        आजोबांचे ऐकून सर्व एकमेकांकडे पाहु लागले पण लाजणा-या मैथिलीला पाहून सगळ्यांच्या पुर्ण प्रकार लक्षात आला आणि आनंदाने उड्या मारत नवी आणि पार्थ तर मैथिलीलाच बिलगले.

" ये..... ये.... आमची काकी. ये... ... ", नवी आणि पार्थ.

" मैथिली, खरचं ", अनन्या.

       अनन्याच्या प्रश्नावर मैथिली चांगलीच लाजली. एकत्र काम करता करता अर्जुन आणि मैथिली कधी एकमेकांना आवडायला लागले त्यांचे त्यांनाच कळाले नाही. हे मिशन पुर्ण झाल्यावर मैथिली तिच्या घरच्यांना तर अर्जुन त्याच्या घरच्यांना सांगणार होता. ते करण्याअगोदरच या दोघांचे बिंग फुटले होते.

" नितेश, मैथिलीच्या घरच्यांना भेटुन घ्या आणि लवकरात लवकर आमची नवीन नातसुन घरात आणा काय? ", आजी.

" आई, तु काळजी नको करु. मी लवकरात लवकर मैथिलीच्या घरच्यांना भेटुन घेतो. ", नितेश.

" या सगळ्यात अजून एक गोष्ट कळाली नाही मला ती ही की त्यादिवशी काही अतिरेक्यांना मारले गेले ते कोणी केले मग? ", नंदिनी.

" आई, तुझा धाकटा चिरंजीव आहे ना त्याने केले हे सर्व. ", अर्णव.

" काय? ", नंदिनी.

" हो, अर्जुन एक सुपर कॉप आहे म्हणजे गुप्तहेर आहे जो सरकारने सागितलेली स्पेशल मिशन करतो आणि यशस्वीही होतो. ", आजोबा.

" बाबा, पण यामुळे त्याच्या जीवाला काही. ", नंदिनी.

" आई, लहानपणापासूनच देशसेवेचे बाळकडू पाजणारी आई आहेस तु आणि तरीही मरणाला घाबरते तु! ", अर्जुन.

" मरणाला नाही घाबरत रे मी पण मैथिली. ", नंदिनी.

" आई, ती स्वतः देशसेवेसाठी काय करु शकते ते आपण पाहिलेच मग तिची कशासाठी काळजी करते तु. ", अर्जुन.

" बरोबर आहे, मला माझ्या पुर्ण कुटुंबाचा अभिमान आहे की सगळे देशसेवा करण्यासाठी सदैव सज्ज असतात. आज आपल्यामुळे देशावरचे संकट दूर झाले आणि अशा ब-याच कामगि-या आपल्याला मिळोत हिच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. ", आपल्या घरातील देवघरात सर्वांना नेऊन नमस्कार करायला लावून आजींनी या कथेची सांगता केली.

     आज आपल्याला अशाच कुटुंबांची गरज आहे जिथे सगळे समान आहेत. एकमेकांशी प्रामाणिकपणे जोडले गेले आहेत आणि मुख्य म्हणजे समाजासाठी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.