कथेचे नाव : मुखवटा ( भाग ४)
विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
मैथिली जिन्यावरुन पडली तसे अर्जुनने तिच्यावर पहिल्यांदा प्रथमोपचार केले आणि तिला ऊचलुन तिच्या खोलीत डॉक्टर येईपर्यंत नेले . आधी त्याने तिला सोफ्यावरच झोपवले होते. डॉक्टर आले आणि त्यांनी मैथिलीला तपासले. एक इंजेक्शन देऊन त्यांनी काही गोळ्या लिहुन दिल्या आणि ते जायला निघाले.
" आशिष, काही मोठे नाही ना! " आजोबा.
" नाही आजोबा, मोठी जखम नाही आहे पण अजाणतेपणी पडल्यामुळे एक छोटासा मानसिक धक्का बसला आहे त्यांना त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आहेत. काही वेळाने त्या येतील शुद्धीवर, काळजी नको. " आशिष.
" आभारी आहे मी तुझा, माझ्या एका फोनवर तु पटकन धावपळ करत आलास ".अर्णव.
" याराचे पण आभार मानणार का तु आता? ",आशिष हसत म्हणाला.
" नाही रे, पण या मुलीचा थोडा गोंधळ आहे त्यामुळे इतर कोणावर विश्वास ठेवणे माझ्यासाठी शक्य नव्हते म्हणून तुझे आभार मानले मी. ", अर्णव.
" अरे, पण ही मुलगी आहे तरी कोण? ", आशिष.
" आशु, आपल्या जहागिरदार साहेबांनी तिला ऊचलून आणली आहे. ", अर्णव अर्जुनकडे पाहत म्हणाला आणि आशिष आश्चर्यचकित झाला.
" काय? हा घेऊन आला, या मुलीला आणि तेही उचलून.",आशिष डोळे मोठे करत म्हणाला.
" दादा, तु त्याला काहीही सांगू नकोस. आशु मी तिला उचलून नाही आणली, तिला वाचवले आणि ईकडे आणले. ऊगीच अर्धवट ऐकुन तुझ्या मनाचे कंगोरे रचु नकोस. ", अर्जुन रागात म्हणाला.
" अहो रागीट शहजादे, जरा राग कमी करा. एकतर मुली आणि तु म्हणजे छत्तीसचा आकडा त्यामुळे जरा झटका लागला मला. ",आशिष.
" कळले हां मला ते! ",अर्जुन.
" बरं, जाऊदे तो विषय. नक्की काय प्रॉब्लेम आहे या मुलीचा. ", आशिष गंभीर होत म्हणाला.
आशिषच्या प्रश्नाचे अर्णवने सविस्तर उत्तर दिले. त्याचे ऐकुन आशिषही विचारात पडला.
" तुम्हाला काय वाटते? तुमचाही तिच्यावर संशय आहे का? " आशिष.
" आशु, आपल्या घरातील सगळे मोठे देशासाठी योगदान देत आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत त्यामुळे नवीन कोणी असुदेत त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकळतपणे बदलतो आमचा आणि म्हणूनच समोरच्या व्यक्तीविषयी पुर्ण खात्री झाल्याशिवाय घरचे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. ", अर्णव.
" हो, बरोबर आहे तुझे. ठीक आहे पहा काय ते? पण लक्ष द्या काही प्रॉब्लेम यायला नको. ", असे म्हणत आशिष निघून गेला.
तासाभराने मैथिली शुद्धीवर आली तेव्हा आरतीने तिला बसायला मदत केली. मैथिलीने सगळ्यांकडे पाहत मान खाली झुकवली.
" मी जाईन संध्याकाळपर्यंत. ", मैथिली कशीबशी म्हणाली.
" काही गरज नाही कुठे जायची? बरी हो, कामाला लाग. काही पैसे जमा झाले की मग जा कुठे जायचे आहे तिथे? ",आजीने असे म्हणत एक रागीट कटाक्ष मैथिलीवर टाकला आणि त्या बाहेर निघून गेल्या. त्यांच्यापाठोपाठ सगळेच बाहेर पडले.
नोकराने काही खायला मैथिलीला आणुन दिले ते तिने निमुटपणे खाल्ले आणि दिलेल्या गोळ्या खाऊन पुन्हा थोड्या वेळासाठी बेडवर कलंडली. थोडा वेळ आराम करुन तिने नोकरांकडुन एक पुस्तक मागवले आणि वाचत बसली. राणावत कुटुंबातील कोणीही तिला यादरम्यान भेटायला गेले नव्हते पण त्यांनी एक नोकर तिच्या सोबत ठेवली होती. मैथिलीच्या पायला लागल्यामुळे तिला जागेवरुन ऊठाताही येत नव्हते त्यात बोलायला कोणी नाही म्हणून मैथिली वैतागली होती. काहीच पर्याय नाही म्हणून ती कशीबशी उठायला लागली. पलंगावरून तिने पाय खाली ठेवला आणि एक वेदना तिला जाणवली. कोणत्या तरी गोष्टीचा ती आधार घेणार तेवढ्यात तिला कोणीतरी पकडले. तिच्या नाजुक कमरेवर पुरुषी स्पर्श झाला आणि ती बावरली. समोर पाहिले तर तिला अर्जुनने पकडले होते आणि अर्जुन तिला रागाने पाहत होता.
" सांगता येत नाही की आवाज देता येत नाही तुम्हाला. कशाला उठायला गेलात तुम्ही. काय झाल असत आणि तुम्ही पडला असतात तर काय केले असते. ",अर्जुन
" सॉरी, मी...... ते.... मला फ्रेश व्हायचे होते. "... मैथिली थोडी दबकत म्हणाली.
तिचे ऐकून नकळतपणे अर्जुनने तिला ऊचलले आणि बाथरुममध्ये सोडले. त्याच्या स्पर्शाने का कोण जाणे तिला शहारा आला होता अंगावर पण जाणीवपूर्वक तिने तो लपवला. कशीबशी ती फ्रेश झाली आणि हळुच स्वतःला सावरत बाहेर आली. तिला वाटले की अर्जुन गेला असेल पण त्याला समोर पाहुन ती चांगलीच दचकली.
" एवढे घाबरायला काय झाले? मी काय खाणार आहे का तुला? ", अर्जुन.
" नाही मला वाटले तुम्ही गेला असाल पण तुम्हाला असे समोर पाहुन मी घाबरले. ",मैथिलीने स्पष्टीकरण दिले.
अर्जुनने एकदा तिच्याकडे पाहिले आणि परत तिला ऊचलुन घेतली. यावेळी मात्र मैथिली निर्विकार होती. अर्जुनने तिला पलंगावर बसवले आणि तो बाहेर निघून गेला तसा मैथिलीने सुटकेचा निश्वास टाकला. ती ज्या कारणासाठी ईथे आली होती ते कार्य करणे खुप गरजेचे होते तिच्यासाठी पण आता ईथे थांबण्यासाठी जे पडण्याचे नाटक तिने केले होते त्यामुळे आता विनाकारण तिला काही दिवस घरीच बसावे लागणार होते. तिने मनातच विचार करत पुढे काय आणि कसे करायचे याची आखणी करायला सुरुवात केली पण कोणीतरी होते जे तिच्या चेहऱ्यावरची रेष न रेष वाचत होते. मैथिली तशी भावना व इतर गोष्टी लपवण्यात माहीर पण शेवटी तिही हाडामासांची माणूसच होती ना! असहायता आणि कर्तव्य यामध्ये तिचा पापड झाला होता त्यामुळे इतकी सावध असूनही आज ती तिच्या भावना लपवु शकली नव्हती.
क्रमशः
विशाखा शिगवण
टिम पुणे
टिम पुणे