Login

मुखवटा भाग ६

A Story Of Soldiers
कथेचे नाव : मुखवटा ( भाग ६)
विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.


        राणावत कुटुंबाने बरेच विचार विनिमय करून शेवटी मैथिलीला नवी आणि पार्थच्या शाळेत शिक्षक म्हणून प्रवेश दिला. मैथिलीही मनासारखे झाले म्हणून खुप आनंदी होती. आता ती पुढील गोष्टी ठरवणार होती. पुढचे पाऊल ऊचलण्याआधी तिला काही बाबींचा अभ्यास करावा लागणार होता त्यानंतरच ती पुढे काय करायचे ते करणार होती. राणावत कुटुंबाची परवानगी मिळताच मैथिली शाळेत निघाली. तिथे जाऊन तिने मुख्याध्यापक मॅडमची भेट घेतली.

" हे खुप कठीण आहे हो माझ्यासाठी. मला नाही जमणार प्लीज समजून घ्या. ", मॅडम म्हणाल्या.

" हे पहा मॅडम, तुम्हाला हे करावेच लागले नाहीतर तुमच्या शाळेतील मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो." , मैथिली खुनशी हसत म्हणाली आणि इकडे मॅडमला घाम फुटला.

" मी...... मी...... करेन तुम्हाला मदत. ", मुख्याध्यापक मॅडम थरथरत म्हणाल्या.

" छान! असाच रिस्पॉन्स ठेवा माझ्यासोबत. ", मैथिली एवढे बोलुन केबिनबाहेर पडली आणि तिने पुर्ण ईमारत चेक केली. सर्व कानाकोपऱ्यात पाहिले. कुठे काही सापडते आहे का तेही पाहिले आणि तिला काहीतरी सापडले.

            जी वस्तू मिळाली ती घेऊन मैथिली घरी निघून आली. उद्यापासून तिचे शाळेचे रोजचे रुटीन चालू होणार होते म्हणून आतापासूनच ती तयारीला लागली होती. नवीन कोणी शिक्षक आले की पुर्ण स्टाफला एकमेकांची ओळख केली जाई त्यामुळे मैथिलीचीही ओळख होणार होती पण उज्ज्वला मॅडम (मुख्याध्यापक ) यांच्या सांगण्यानुसार दोन ते तीन जणांची ओळख करण्यात आली नव्हती आणि गोवर्धन ( आजोबा) यांनाही याबाबत खोटे सांगण्यात आले होते. मैथिलीची जेव्हा कर्मचारी वर्गाशी ओळख करुन देण्यात आली तेव्हा काही लोकांच्या बाबत तिला खटकले होते आणि जास्त विचारपूस केल्यानंतर तिला सत्य कळाले होते त्यानंतर मैथिली लागलीच तयारीला लागली होती.

            तिचे शाळेच जाणे चालू झाले होते. जवळ जवळ १० दिवस झाले होते मैथिलीचे शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होऊन. यादरम्यान तिने बर्याच गोष्टींचे निरिक्षण केले होते. ज्या गोष्टी खटकल्या होत्या त्यासंबंधित काही अहवाल बनवला होता. तिला माहिती होते गोवर्धन आजोबांची आणि अर्जुनची माणसे तिच्यावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे जे काही करता येईल ते शांतपणे ती करत होती. त्या दिवशीही तिचे काम उरकून मैथिली घरी आली होती. तिच्या रुममध्ये ती जाणार तोच आजींनी तिला आवाज दिला तशी पुढे जाणारी ती थांबून मागे फिरली.

" कोण आहेस तु? ", आजी. (गीता)

" असे का म्हणत आहात तुम्ही आजी? ", मैथिली.

" तुला काय वाटले, तु काय करते ते आम्हाला कळणार नाही का? ", आजोबा.

" आजोबा, मी प्रामाणिकपणे माझे काम करते आहे. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात मला काहीच कळत नाही आहे. ", मैथिली.

" ठीक आहे, पाच दिवसांची मुदत देतो मी तुला. तु कोण आहे? आमच्या कुटुंबात कशासाठी आली आहेस? तुझा हेतु काय आहे? हे मला कळायला पाहिजे नाहीतर सहाव्या दिवशी मी पोलिसांना फोन करेन. ", आजोबा.

" आजोबा, माझा या घरात येण्याचा कोणताही वाईट हेतु नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला काहीच सांगु शकणार नाही. तुम्हाला मी चुकीची वाटत असेल तर तुम्ही मला पोलिसांच्या हवाली केले तरी चालेल. ", असे म्हणत मैथिली तिच्या रुममध्ये निघून गेली.

" फार चलाख मुलगी आहे. रमेश ( अर्जुनचे वडिल) आणि रोहिणी ( अर्जुनची आई) नवी आणि पार्थला काही गोष्टी समजावून सांगा. हिच्याबरोबर जास्त जवळीक साधु नका हेही सांगा. ", आजोबा.

" हो बाबा! ", दोघेही सोबतच म्हणाले.

       इकडे मैथिली रुममध्ये येऊन पटकन वॉशरुममध्ये शिरली. एवढ्यात तिच्याबद्दल राणावत कुटुंबाला कळणे तिच्यासाठी धोकादायक होते त्यामुळे लवकरात लवकर तिला पुढच्या गोष्टी करणे गरजेचे होते. बाथ घेऊन बाथरोब घालून ती बाहेर आली तर समोर अर्जुन सोफ्यावर बसलेला तिला दिसला. तिचा बाथरोब स्लीव्हलेस आणि तोकडा असल्याने त्याला समोर पाहुन ती भयंकर लाजली आणि ओशाळली. अर्जुनही गोंधळुन पटकन पाठमोरा झाला.

" तुम्ही ईथे काय करत आहात? ", मैथिली.
 
              मैथिलीने प्रश्न तर विचारला पण अर्जुन काही न बोलता निघून गेला आणि तो का गेला हे मैथिलीच्या लक्षात आले होते. ती तयार झाली आणि खाली गेली पण ती येण्याआधीच सगळे जेवून पांगले होते. तिला यावेळी जरा वाईट वाटले. खर काय आहे ते सांगुन टाकावे का यांना असेही क्षणभर तिच्या मनात आले पण होणारे परिणाम आठवले आणि ती शांत झाली. कोणी कसेही वागुदेत आपण आपला निर्णय बदलायचा नाही यावर ती ठाम होती.

          दुसऱ्या दिवशी मात्र कोणालाही काहीही न सांगता ती शाळेत निघून गेली होती. रात्री कोणीही सोबत नसल्याने ती जेवली नव्हती त्यात सकाळी ती तशीच निघून आल्याने तिला आता खुप भुक लागली होती. कँन्टिनमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घेतले तिने आणि मग तिच्या कामाला लागली.

           दोन ते तीन दिवस तिचे असेच गेले यादरम्यान ना ती राणावत कुटुंबाबरोबर बोलली ना राणावत कुटुंब तिच्याबरोबर. ती सकाळी लवकर जायची ती रात्रीच परत यायची. एव्हाना तिने जे ठरवले होते ते अंतिम टप्प्यात आले  होते त्यामुळे ती पूर्णपणे बिझी होती.ज्या गोष्टीची तिने आतुरतेने वाट पाहिली होती तिच गोष्ट आता पुर्ण होण्याच्या मार्गावर होती. सगळे काम पूर्ण झाले तसे तिने कोणालातरी फोन लावला.

" हॅलो सर, ", मैथिली.

" मैथिली, काय आहेत तिकडचे अपडेट्स. ",समोरील व्यक्ती.

" सगळे बरोबर आहे सर, मी लवकरच माझे काम फत्ते करणार. काळजी नसावी.", मैथिली.

" ठीक आहे. ", असे म्हणत समोरील व्यक्तीने फोन ठेवला आणि मैथिली विचारात गढली.


क्रमशः