Login

मुखवटा भाग ७

A Story Of Soldiers


कथेचे नाव : मुखवटा ( भाग ७)
विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.


              मैथिली आज ब-याच दिवसांनी शांत बसली होती. मागच्या काही दिवसांमध्ये जो काही मनस्ताप तिला झाला होता त्यामुळे ती चांगलीच वैतागली होती. ती जे काही करत होती ते नेमके "कशासाठी?" आणि "का?" करत होती हे फक्त काही लोकांनाच ठाऊक होते त्यात पुन्हा एक भयंकर प्रकार घडला होता आणि त्याने शाळेत एकच खळबळ माजली असती पण मैथिलीने प्रसंगावधान राखत ते प्रकरण आतल्या आत मिटवले होते.

           ती जेव्हा पहिल्यांदा शाळेत दाखल झाली होती तेव्हा तिची ओळख कर्मचारी वर्गाबरोबर करुन देण्यात आली होती. उज्जला मॅडम तिला घेऊन कर्मचारी बसतात त्या रुममध्ये आल्या होत्या. मैथिलीने अगदी साधा पेहराव केला होता. साधा सलवार कुडता, डोळ्यांवर चष्मा, केस अगदी तेल लावून विंचरले होते. तिला तसे पाहुुन राणावत कुटुंबाला चांगलाच धक्का बसला असता. मैथिली घरात आली तेव्हाची आणि आता शाळेत जात आहे तेव्हाची मैथिली यात जमीन अस्मानाचा फरक होता. खरेतर तिची ती पहिली चुक होती जे ती आहे अशीच राणावत कुटुंबाला दिसली होती पण शाळेत जाताना तिने जो अवतार केला होता तो वेगळ्या कारणासाठी होता. तिचे व्यक्तिमत्त्व पाहता कोणाच्याही नजरेत ती सहज येऊ शकत होती आणि हे तिच्या कामासाठी योग्य नव्हते म्हणून तिने तिची वेशभूषा बदलली होती पण आधीच चलाख असणारे राणावत कुटुंब तिच्या या अवतारावर संशय घेणार नाहीत असे होईल का? नक्कीच ते संशय घेऊ शकत होते म्हणून तर मैथिली घरुन निघताना तिच्या नेहमीच्या वेशभूषेत गेली आणि नंतर एका ठिकाणी जाऊन कपडे बदलून ती शाळेत गेली होती. हे ठिकाण तिने तिच्या कामासाठी भाड्याने घेतले होते तसेच राणावत कुटुंबाने समजा चुकुन घराबाहेर काढलेच तर तेच ठिकाण तिला उपयोगी पडणार होते.

        मैथिली आणि उज्ज्वला जेव्हा शाळेतील कर्मचारी रुममध्ये गेल्या तेव्हा,

" इकडे लक्ष द्या सारे. या मैथिली मॅडम आहेत. आजच रुजू झाल्या आहेत इथे आपल्या शाळेत. आपण सगळे मिळून त्यांचे स्वागत करुयात. "...... उज्ज्वला मॅडम असे  म्हणताच सगळ्यांनी टाळ्या वाजवून मैथिलीचे स्वागत केले.

        मैथिलीने सगळ्यांवर नजर फिरवली पण एका ठिकाणी तिची नजर स्थिर झाली. काही चेहरे आणि त्या चेह-यावरचे हावभाव हे कुटिल वाटले मैथिलीला आणि लगेच तिच्या मेंदूने तिला हिरवा सिग्नल दिला होता. ही माणसे दिसतात तशी नाही आहेत हे तिच्या मेंदुने पटकन पकडले आणि गुपचूप तिने कुडत्याला लावलेल्या कॅमे-यातुन त्या माणसांचे फोटो घेतले. तिला आता लवकरात लवकर त्या लोकांची माहिती काढायची होती त्यामुळे उज्ज्वला मॅडमचा निरोप घेऊन ती पटकन तिच्या ठिकाणावर आली. तिच्या ठिकाणावर येताच तिने कोणालातरी सिग्नल पाठवला आणि ती तिच्या कामाला लागली.

        काही वेळाने दरवाजावर काही विशिष्ट पद्धतीने टकटक झाली आणि मैथिलीने पुढे होत दरवाजा उघडला. समोर असलेल्या त्या चार व्यक्तिंना हसुन तिने ओळख दिली आणि त्यांना आत घेतले. आत शिरताच ते त्यांच्या कामाला लागले.

" या चार व्यक्ती मला वेगळ्या वाटल्या शाळेतल्या. यांची सविस्तर माहिती काढायला (आयन १) कोड भाषा. मी तुम्हाला सांगते आहे. ", मैथिली.

" येस (आयन)! ", आयन १

" आयन २, हा शाळेचा नकाशा आहे. यावर योग्य तो अभ्यास करुन सविस्तरपणे हा नकाशा समजावून सांगण्याची जबाबदारी तुमची. ", मैथिली.

" येस आयन! ", आयन २.

" बाकी मला सपोर्टला रहा. कधीही शाळेत दाखल व्हावे लागेल त्यामुळे हत्यारे आणि इतर वस्तू़ंच्या तयारीत रहा. ", मैथिली.

" येस आयन! ", चौघेही एकसाथ ओरडले आणि बाकी गोष्टी बोलुन त्यांवर विचारविनिमय करुन सगळे पुन्हा आपापल्या कामाला परतले.

              मैथिली घरी आली तेव्हा सगळे जेवायला बसले होते. मैथिलीही पटकन आवरुन जेवायला आली. यावेळी मैथिली बरोबर जास्त कोणी बोलले नव्हते आणि तिही तिच्या विचारात असल्याने तिचे काही या गोष्टीकडे लक्ष गेले नाही.

       अशीच रोजनिशी सुरू होती आणि मैथिली एका बाजूने त्या लोकांची माहिती काढत होती. आतापर्यंत बरीच माहिती तिला मिळाली होती आणि तिने कोणालातरी फोन करुन त्याविषयी सविस्तर चर्चाही केली होती. समोरुन उत्तर आल्यावर तिने तिचे पुढील पाऊल उचलले होते.

      त्या दिवशी रात्री ती हळुच तिचे वेषांतर करुन मैथिली घरातून बाहेर पडली होती. तिने तिच्या साथीदारांनाही बोलावले होते. ते सगळे शाळेतील त्या वेगळ्या वाटणा-या माणसांना ताब्यात घेण्यासाठी चालले होते. जास्त गरज पडली तर अधिक माणसे बोलवण्याचे त्यांचे प्रयोजन होते.

         मैथिली व बाकी तिचे साथीदार ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. आत जाण्यासाठी मैथिलाने कमांड दिली आणि सगळे विजेच्या चपळाईने आत शिरले. एक दोनदा फेरफटका मारुन मैथिलीच्या साथीदारांनी आतमध्ये शिरण्याची ठिकाणे पाहुन ठेवली होती त्यामुळे यावेळी आतमध्ये शिरताना त्यांना काहीच त्रास झाला नाही. आयन २ एका खिडकीतून आत शिरला आणि त्याने बाकीच्यांना आत येण्यासाठी पुर्ण खिडकी उघडून दिली.
सगळे आत गेले. चोरपावलाने आत जात ते हळूहळू पुढे सरकत होते पण.......

       अचानक बंदुक चालवण्याचा आवाज आला आणि पुर्ण आयन टिम सतर्क झाली. कानोसा घेत सगळे ईकडे तिकडे पांगले पण त्यांना यायला मात्र उशीर झाला होता कारण कोणीतरी आधीच त्या संशयितांना गोळ्या घालून फरार झाला होता आणि आता मैथिलीपुढे पेचप्रसंग निर्माण झाला होता. एवढे सगळे करून ती पुन्हा शून्यात गेली होती आणि शुन्यातून तिला पुन्हा सुरुवात करावी लागणार होती. वैतागून तिने भिंतीवर हात आपटला आणि बाकी साथीदारांना इशारा करत आली तशी निघून गेली.

         सगळ्या साथीदारांना सुचना देऊन मैथिली राणावत कुटुंबाच्या घराकडे वळली. ज्या मार्गाने ती घरुन निघाली होती त्याच मार्गाने ती परत आत शिरली पण यावेळी घोळ झाला होता. कोणीतरी तिथे होते आणि त्या व्यक्तीने मैथिलीला येताना पाहिले होते. मैथिलीला तशा रुपात पाहून ती व्यक्ती चाट पडली होती आणि सकाळ होताच या गोष्टी कोणाच्यातरी कानावर घालायच्या असे ठरवत ती व्यक्ती मैथिली जाताच तिथुन निघून गेली.

क्रमशः.

कोण असेल ती व्यक्ती? मैथिली नेमके कशासाठी शाळेत गेली आहे? तिचे साथीदार कोण आणि मैथिलीने शोधलेल्या संशयितांना कोणी मारले असेल? वाचत रहा आणि कमेंट्स करा. माझी कथा आवडल्यास मला फॉलो करा.