विषय : रहस्यकथा.
फेरी: राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मैथिली पेचात सापडली होती. जे काही तिने ठरवले होते त्याच्या उलट झाले होते. मैथिली आपले काम झाल्यानंतर त्या माणसांना संपवणारच होती पण त्याआधीच त्या माणसांना कोणीतरी मारले होते. हवी असलेली माहिती मिळवण्या आधीच हे झाले असल्याने ती व्यक्ती आपल्या बाजुने आहे की आपल्या विरुद्ध हे काही मैथिलीला कळेना. जर ती व्यक्ती आपल्या विरुद्ध असेल तर सावधानतेने आपल्याला पाऊल पाऊल टाकणे गरजेचे होते आणि जर ती व्यक्ती आपल्या बाजूने असेल तर माहिती मिळवण्या अगोदरच त्या माणसाला का मारुन टाकले? असे एक ना अनेक प्रश्न मैथिलीच्या मनात फेर धरत होते पण त्याची उत्तरे तिलाच शोधायची होती. त्यात घरच्यांचा गोंधळ होताच ( राणावत कुटुंब)
मैथिली त्यादिवशी तिचे काम संपवून घरी परतत होती तेव्हा तिला आजींनी पाहिले होते. आजींना समोर पाहुन आता काय करायचे? खरे सांगायचे की नाही? हेच त्यावेळी तिच्या मनात फिरत होते.
" आजी तुम्ही इथे? ", मैथिली.
" हो! तुला काही हरकत आहे का? ",आजी.
" नाही हो आजी, मी आपली असेच म्हटले. ", मैथिली.
" काय गं, रोज तर साधी राहतेस. हे असे कसे काय केलेस तु? ", आजी.
" मी, मी काय केले? ", मैथिली.
" डोळ्यावर चष्मा, पंजाबी ड्रेस घालणारी तु ही अशी या कपड्यांत. ", आजी.
" आजी, कामच तसे होते त्यामुळे हा पेहराव करावा लागला. ",मैथिली.
" असे काय काम करते तु की त्यासाठी हा असा पेहराव करावा लागला? ", आजी.
" आजी, काम थोडे जोखमीचे होते म्हणून असा पेहराव करावा लागला मला. बरे मला थोडे काम आहे मी आलेच! ", असे म्हणत मैथिलीने तिथून पलायन केले पण जाता जाता आजींच्या मनात शंका उत्पन्न करुन मात्र गेली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आजोबांनी तिला " ती कोण आहे? असे विचारले होते आणि तिने तिचे सत्य सांगितले नाही तर ते पुढचे पाऊल उचलतील त्यामुळे आता त्यांना सत्य सांगण्याची वेळ आली होती आणि जमल्यास त्यांची मदत घेण्याचीही. मैथिली राणावत फॅमिलीला सर्व खरे तर सांगणार होतीच पण त्याआधी तिला काही गोष्टी प्रत्यक्षात उतरवायच्या होत्या आणि त्या गोष्टी केल्यानंतरच ती तिचे खरे रुप सगळ्यांसमोर उघड करणार होती. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती कोणालाही न सांगता तिच्या फ्लॅटवर आली होती जिथे आधीच तिची टिम येऊन थांबली होती आणि मैथिली काहीही न सांगता गेली म्हणून बाकी सगळे म्हणजेच राणावत कुटुंब प्रचंड रागात होते.
" आयन्स मी तुम्हाला दिलेली कामे पूर्ण झाली असतील अशी मी आशा करते. ", मैथिली.
" येस आयन. ", चौघेही एकसाथ बोलले.
" ठीक आहे मग प्रत्येकाने मला आपल्या आपल्या कामाविषयी सांगा. ", मैथिली.
" त्यानंतर मैथिलीच्या टिमने त्यांना त्यांना सोपवलेल्या कामाचा तपशील सांगायला सुरुवात केली. सगळ्यांचे सांगुन झाले तसे मैथिली व बाकी सगळ्यांनी त्यांच्या कामाची आखणी करायला सुरुवात केली. ही आखणी करायलाच त्यांना संध्याकाळ झाली. अजून बरेच काही ठरवायचे बाकी होते त्यामुळे कोणी काही घरी जाण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुर्ण कामाची आखणी करायला त्यांना सगळ्यांना दुसरा दिवस उजाडला त्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवायला जाण्याची तयारी केली.
जवळ जवळ तीन दिवस झाले होते आणि मैथिलीचा काहीच तपास नव्हता. राणावत कुटुंब मोठ्या पेचात पडले होते. नक्की ही मुलगी कोण होती आणि अचानक कुठे गायब झाली हे काही कोणाला कळेना. अगदी अर्जुनही यावेळी कमी पडला होता एवढी मैथिली त्यांना पोबारा देऊन गायब झाली होती. होती तरी कुठे मैथिली?
मैथिली मात्र तिचे कर्तव्य करत होती. ती शाळेत जाऊन तिचे काम करत होती. सुरुवातीला घाबरणा-या मुख्याध्यापक मॅडमही आता तिला पुर्ण पाठिंबा देत होत्या. त्यांनी म्हणजेच उज्ज्वला मॅडमने मैथिलीला आणि सर्व आयन साथीदारांना शाळेतच राहण्याची सोय केली होती. मैथिलीचे काम अंतिम टप्प्यात होते. जे काही होणार होते त्याची परिणती नक्कीच चांगली होणार होती. मैथिलीने शाळेत जाऊन पुर्ण तयारी केली होती आता फक्त प्रत्यक्ष त्या गोष्टी करणे गरजेचे होते.
" आयन्स, ही आपली महत्त्वाची लढाई आहे. प्रसंगी प्राणही जाऊ शकतो त्यामुळे डोळ्यात प्राण आणुन आपले काम करावयाचे आहे अन्यथा परिणाम मृत्यू होऊ शकतो. ",मैथिली.
" हो आयन, आम्ही तयार आहोत या सगळ्यासाठी. ", सर्व आयन्स.
" चांगली गोष्ट आहे, लागा तयारीला. ", मैथिली.
" हो आयन. ", असे म्हणत सर्व आपापल्या कामाला लागले.
दुसऱ्या दिवशी सर्व टिव्ही आणि वर्तमानपत्रातुन एकच बातमी झळकत होती. ती म्हणजे भारतीय हेरांनी दहशतवादी संघटनेची खूप मोठी मोहिम नाकाम केली. अगदी सगळीकडे हिच बातमी पसरली होती. एकतर भारतीय हेर संघटना ही लोकांसाठी एक वेगळीच जादु असते त्यात अशा लोकांची मोहिम म्हटल्यावर लोकांचे देशप्रेम जागे होते.
राणावत कुटुंबानेही ही बातमी पाहिली होती आणि त्यांनाही या गोष्टीचा सार्थ अभिमान होता. जे काही घडले आहे आणि ज्या कोणी केले आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते खुष होते पण या सगळ्यात मैथिली कुठे होती. तिचा काहीच पत्ता नव्हता.
" आई, बाबा, हद्द झाली आता. मी या मुलीला सोडणार नाही. काहीतरी कारण असल्याशिवाय ती आपल्या घरात येणे शक्यच नाही. ", नितेश.
" हो नितेश, यावेळी त्या मुलीला सोडायचे नाही. कोण कुठली मुलगी, आपल्याकडे येऊन अशी गायब होते म्हणजे काय? ", आजोबा.
" शांत व्हा सगळे. लवकरच त्या मुलीचे सत्य सर्वांना कळेलच. ", अर्जुन.
" अर्जुन, तुला माहिती आहे का तिच्याविषयी सर्व.", नितेश साशंक मनाने म्हणाले.
" मला खात्री नाही आहे बाबा, मी फक्त अंदाज बांधला आहे जो कितपत बरोबर आहे काय माहिती. ", अर्जुन.
" ठीक आहे आली की कळेलच काय ते? ".... आजोबा.
सगळ्यांनी यावर सहमती दर्शवली तेवढ्यात अर्जुनला एक फोन आला आणि कोणालाही काहीही न सांगता तो निघून गेला. घरच्यांना अजून मैथिलीचे एक कोडे उलगडत नव्हते आता अर्जुनचे असे जाणे सर्वांना जरा विचित्र वाटत होते.
क्रमशः
विशाखा शिगवण
टीम पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा