Login

मुखवटा भाग १

मुखवटा भाग १
भाग १

"आई, अगं ए आई... कुठे आहेस? बघ कोण आलंय ! "

सकाळी आठ वाजत आले होते. मानसीने विचार केला होता की आज थोडा उशिरा उठून निवांत चहा घेऊया, पण घराची बेल करकर्जुन वाजली. दारात अविनाशची धाकटी बहीण सरिता, तिचे पती निमिष आणि त्यांची दोन दंगा करणारी मुले उभी होती.

रविवारची ती प्रसन्न सकाळ. खिडकीतून येणारी कोवळी उन्हे आणि बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट... कोणत्याही नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी हा दिवस म्हणजे आठवडाभराचा थकवा घालवण्याची एक सुवर्णसंधी असते. मानसीसाठीही तो दिवस असाच काहीसा खास असायला हवा होता. मानसी एका नामांकित खाजगी बँकेत 'ब्रँच मॅनेजर' या जबाबदारीच्या पदावर कार्यरत होती. दिवसभर शेकडो फाईल्स, ग्राहकांचे प्रश्न आणि टार्गेट्सच्या कचाट्यातून सुटल्यानंतर तिला रविवारी घरच्या शांततेची ओढ असायची.

पण तिच्या दुर्दैवाने, तिच्या घराचा उंबरा ओलांडला की तिची ही मॅनेजरची ओळख पूर्णपणे पुसली जायची. घरात ती फक्त एक सून होती.जिला थकायचा किंवा स्वतःच्या आवडीनिवडी जपण्याचा कोणताही अधिकार नव्हता.

मानसीचा नवरा अविनाश एका आयटी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता, पण घरच्या बाबतीत तो कायम तटस्थ राहणे पसंत करायचा. तिची सासू, सुलोचनाबाई, या जुन्या विचारांच्या आणि काहीशा हट्टी होत्या. त्यांच्या मते, नोकरी करणारी सून असली तरी तिने घरची सर्व कामे स्वतःच्या हाताने आणि तक्रार न करता केली पाहिजेत.

सरिताने घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या पूर्ण घर डोक्यावर घेतले. तिच्या आवाजाने मानसीची झोप उडालीच, पण डोकेही दुखू लागले.

सरिताने सोफ्यावर आपले पाय पसरले आणि आपली जड पर्स धाडकन मानसीच्या हातात सोपवली.

" वहिनी, घ्या ही बॅग बेडरूममध्ये ठेव ना आधी. आणि प्लीज, जरा गार पाणी द्या ना.प्रवासात जीव नकोसा झालाय. आई, तू कुठे गेलीस ? चहा दे ना लवकर, डोकं जाम झालंय माझं ! "

मानसीने पाणी दिले आणि हलक्या आवाजात विचारले,

" अगं सरिता, येण्यापूर्वी निदान एक फोन तरी करायचा होतास. मी आईंच अन्यूअल चेकअपसाठी दवाखान्यात जायचं होत. डॉक्टर सानेंची अपॉइंटमेंट घेतली होती. त्यांचे रिपोर्ट घेऊन आज डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं होतं."

मानसीचे हे बोलणे ऐकताच सरिताच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. तिने तोंड वेडेवाकडे केले आणि मोठ्याने म्हणाली,

"अय्या ! वहिनी, आता माहेरी यायला सुद्धा आम्हाला तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागणार का ? तुमचं चेकअप काय , ते तर तुम्ही उद्या किंवा परवा कधीही करू शकता ना. आम्ही आज खास वेळ काढून, मुलांच्या ट्युशनला सुट्टी देऊन इकडे आलोय आणि तुम्ही आम्हाला हे असं ऐकवताय ?"

सुलोचनाबाई तोपर्यंत हॉलमध्ये आल्या होत्या. लेकीचे शब्द ऐकताच त्यांचा चेहरा उतरला. त्या मानसीकडे वळून जरबेच्या स्वरात म्हणाल्या,

" मानसी, काय हे ? आता लेक कौतुकाने माहेरी आलीये तर काय दवाखान्यात जायचं ? तिला पाणी दे आणि चहा ठेव आधी. आज दवाखाना नको, आज माझी लेक खुश झाली पाहिजे असा बेत कर. डॉक्टर कडे जाऊ नंतर."

मानसीने एक दीर्घ श्वास घेतला. तिला माहिती होते की इथे तर्क मांडून काहीही उपयोग नाही. ती निमूटपणे स्वयंपाकघरात गेली. बाहेरून सरिताच्या गप्पांचा आणि हसण्याचा आवाज येत होता. सरिता सांगत होती की सासरी तिला किती काम करावे लागते आणि तिथे तिचा छळ कसा होतो जो प्रत्यक्षात कधीच नव्हता.

मानसीने सकाळी साडेआठ पासून काम सुरू केले. आधी सर्वांचा चहा, मग मुलांसाठी नाश्ता, त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी. सरिताची फर्माईश होती. 'पुरणपोळी, कटाची आमटी आणि कुरडया'. उन्हाळ्याचे दिवस, त्यात पुरणपोळीचा घाट घालणे म्हणजे साधे काम नव्हते.

मानसीचे पाय दुखत होते, हाताला वाफेचे चटके बसत होते, पण बाहेर बसलेल्यांपैकी कोणालाही तिची विचारपूस करावी असे वाटले नाही. अविनाश आपल्या मेहुण्यासोबत क्रिकेटच्या गप्पा मारत बसला होता, तर सरिता आईसोबत गप्पा मारत नखं रंगवत बसली होती.

दुपारी दोन वाजता जेवणाची ताट वाढली गेली. मानसीने अतिशय प्रेमाने आणि मेहनतीने स्वयंपाक केला होता. सरिताने ताटातली आमटी पहिल्यांदा चाखली. सर्वांचे लक्ष तिच्या प्रतिक्रियेकडे होते. तिने एक घास घेतला आणि ताडकन चमचा ताटात टाकला.

" काय ग आई, वहिनींच्या हातच्या जेवणाला पूर्वीसारखी चव राहिली नाही का ग ? आमटीत मीठ अगदीच कमी आहे आणि तिखट तर इतकं की घसा जळतोय माझा. मला वाटतं वहिनींचं लक्ष आता फक्त बँकेच्या पैशांकडे असतं, घरच्यांच्या जिभेकडे नाही ! " सरिताने नाक मुरडले.

सुलोचनाबाई लगेच म्हणाल्या,

" अगं हो, मी मघाशी सांगत होते मानसीला की नीट लक्ष दे, पण हल्ली ही ऐकते कुठे ? तिला बँकेच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा ना ! "

मानसी शांतपणे उभी होती. तिने स्वतः आमटी चाखली होती, ती अगदी छान झाली होती. सरिता फक्त नाटक करत होती, हे तिला स्पष्ट जाणवत होते.

" वहिनी, मला हे जेवण जाणार नाही आता. मी इतक्या लांबून आले आणि मला असं बेचव जेवण मिळालं. तुला माझा अपमान करायचं आहे असं मला वाटतंय ! " असे म्हणून सरिताने ताटावरून हात काढला आणि ती सोफ्यावर जाऊन रुसून बसली.

अविनाशने मानसीकडे रागाने पाहिले,

" मानसी, नीट बनवता येत नव्हतं तर सांगायचं ना? उगाच तिचा मूड खराब केलास. जा, आता तूच तिची समजूत काढ ! "

मानसीच्या डोळ्यात आता पाणी नव्हते, तर रागाची एक ठिणगी पडली होती. तिला जाणीव झाली होती की, काही माणसे फक्त हक्क गाजवण्यासाठी येतात, पण त्यांच्या मनात तिच्या मेहनतीबद्दल काडीचीही किंमत नाही. ज्या सरिताला मीठ कमी म्हणून इतका राग आला होता, तिने गेल्या सहा महिन्यात आईची साधी फोनवरून विचारपूसही केली नव्हती.

मानसीने शांतपणे ताट उचलले आणि ती स्वयंपाकघरात गेली. तिने मनोमन काहीतरी ठरवले होते. आता फक्त 'सून' म्हणून राबण्याचे दिवस संपले होते.