Login

मुक्ती ( लघुकथा )

एका छोट्या मुलाच्या आत्माला मुक्ती मिळवून देणारी रहस्यमय भय लघुकथा

मुक्ती
( रहस्यमय भय लघुकथा )

राज व नैना सुंदरपूरला गाडीने निघाले होते. तो पोस्ट ऑफिसमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. या गावात त्याची बदली झाली म्हणून सोबत तो त्याची पत्नी नैनाला घेऊन चालला होता. ती थोडी धार्मिकवृत्तीची होती. त्याचबरोबर तिचा भूतावर देखील विश्वास होता. त्या गावातील सरपंचाने त्या गावातीलच एका जुन्या वाड्यात त्यांची राहण्याची सोय केली होती. हे जेव्हापासून तिला कळलं होतं  तेव्हापासून वेगळं काहीतरी घडणार असे तिला वाटू लागलं कारण तो वाडा न पाहताही तिला स्वप्नात दिसत होता. काही तरी आहे त्या वाड्यात जे आपल्याला तिथे जाण्यास भाग पडत आहे असे तिला नेहमी वाटायचे. मग मनातून एक भीती दाटून यायची. त्या वाड्यात येण्या आधी तिने तिच्या मनातील वाड्याबद्दलची भीती राजला सांगितले तेव्हा तो हसण्यावर नेत म्हणाला,"अगं नैना, असे काही नसतं गं. याच्या आधीही तू माझ्यासोबत किती तरी ठिकाणी सोबत होतीस. मग तेव्हा त्या ठिकाणी जाण्या आधी असे कधी तुला जाणवलं नाही मग आताच का जाणवत?"

"माहिती नाही, ओ! जा बाबा, तुम्ही ना नेहमी असेच हसता, कधी विश्वास ठेवता का माझ्या कोणत्या बोलण्यावर? हसण्यावरी घालवता. हो, मान्य आहे की तुमच्यासोबत कित्येक गावे सोबत होते पण तिथे तसं काही नाही जाणवल. पण .."

ती चिडत गाल फुगवत म्हणत होती तोच राज तिचे म्हणणे मधेच तोडत म्हणाला,"अगं वेडाबाई, असं काही नाही गं. मी तुला हसत नाही. पण तुझं हे बोलणं पटत नाही बसं एवढंच. ज्या जागी तू कधी गेलीच नाही किंवा कधी पाहिलच नाही तर त्या ठिकाणाबद्दल आधीच तर्क काढणं कितपत योग्य आहे सांग बरं." तिला त्याचं बोलणं पटलं. तिने होकारार्थी मान डोलावली. हे सगळं आठवत असताना गाडी त्या वाड्यासमोर कधी उभी राहिली हेही तिला कळलं नाही. राजने आवाज दिल्यावर ती भानावर आली.

कारमधून उतरून ते वाड्याच्या दिशेने निघाले. वाडा जुना असला तरी अजूनही सुस्थितीत, भक्कम होता. आजूबाजूला खूप झाडे होती. त्यातील एका मोठ्या अशोकाच्या झाडाने तिचं लक्ष वेधून घेतले. तिला असं वाटलं की त्या झाडाच्या मागून कोणीतरी तिला बघतोय. तिची पावले तिकडे वळणार तोच राजने हाक मारली तेव्हा ती मागे फिरली. दोघे वाड्यात आले. ते येणार असल्याने त्याची साफसफाई केली होती. त्यामुळे तो स्वच्छ दिसत होता. मधोमध तुळशी वृंदावन, दोन्ही बाजूला ओसरी, खाली एका बाजूला स्वयंपाकघर, सोबत अजून एक दोन प्रशस्त खोल्या, लाकडी व जाडसर लोखंडी साखळदंडाचा झोपाळा, वरती जाण्यासाठी लाकडी जिना व वरतीही दोन खोल्या. एकंदरीत वाडा खूप सुंदर होता. असा वाडा पाहून नैनाच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या ती काही क्षणासाठी विसरून गेली होती.

राज पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर नैना वाड्यात एकटीच असायची. तिला कधी असं वाटायची की त्यांच्यासोबत आणखी कोणी इथे राहते. तिचा भास असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण जेव्हा गावकऱ्यांकडून काही भीतीदायक गोष्टी ऐकल्यावर पुन्हा तिला भीती वाटू लागली. त्या लोकांचं म्हणणं होतं की या वाड्यात एक आत्मा भटकतोय, रडणे ऐकू येते. त्यांनी राजला सांगितले होते पण त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. तिलाही सांभाळून राहायला सांगितले. त्या गोष्टी सतत तिच्या मनात रुंजी घालत होत्या.

एक दिवस ती त्याच विचारात होती की तिच्या कानावर एका छोट्या मुलाचा रडण्याच्या आवाज आला.

"वाड्यात आतापर्यंत तर छोटं मुलं दिसलं नाही मग आता आवाज ऐकू येतोय तो त्या आत्म्याचा तर नसेल ना?" भीतीने तिची गाळण उडाली, स्वतःशीच मनात बोलत इकडेतिकडे बघत हळूहळू जिना उतरत खाली आली.

तिने ओसरीत पाहिले तर तेथील झोपाळा मोठ्याने हलत असलेला दिसला. वारा तर नव्हता मग तरीही रिकामा झोपाळा हालताना पाहून नैना जास्तच घाबरली. आता तिला पाठीमागून कोणीतरी भरकर निघून गेलं असं वाटलं. तेवढ्यात वाड्याचं दार आपोआप उघडलं. वाड्याच्या सभोवताली तिची घाबरणारी नजर भिरभिरत होती. पुन्हा दाराबाहेर तिला सावली दिसली. ती पळतच वाड्याबाहेर आली. "कऽऽ कोण आहे?" असे मोठ्याने ओरडत भीत भीतच आजूबाजूला शोध घेत होती. पुन्हा त्या झाडामागून कोणी तरी डोकवत आहे असे तिला वाटलं. म्हणून ती त्या झाडामागे जाऊन पाहिले तर एक साधारण पाच-सहा वर्षाचा मुलगा दोन्ही गुडघ्यात डोकं घालून पायांना हाताचा विळखा घालून मुसमुसत असताना तिला दिसला. ती जाऊन त्याला विचारणार तोच राज गाडीचा हाॅर्न वाजवत आत आला. तिने वळून तिकडे पाहिले व इकडे झाडाच्या मागे कोणीतरी आहे इशाऱ्याने सांगत त्याला तिथे यायला सांगितले. तिथे येऊन त्याने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिला आश्चर्य वाटले. पुन्हा पुन्हा सांगत तिने सगळीकडे पाहिले तर खरंच कोणीच नव्हतं. राजने नेहमीप्रमाणे तिला भास झाला असेल. जास्त विचार करू नको असे सांगत  वाड्यात तिला घेऊन आला. पण तिला मात्र पक्की खात्री होती की तिने त्या मुलाला पाहिले पण तो कोण याचा शोध घ्यायचा व तो भास नाही हे राजला पटवून द्यायच हे तिने मनाशी ठरवलं.

असेच काही दिवस गेले. तो मुलगा तिला घरात व त्या झाडामागे दिसायचा पण त्याने कधीच तिला त्रास दिला नाही. उलट त्याच्या डोळ्यांत तिला नेहमी पाणी व विनंती दिसायची. जणू तो काहीतरी तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय असे तिला वाटायचे. पण काय हे कळत नव्हते.

एक दिवस ती वाड्याच्या अंगणात संध्याकाळाचा चहा पित खुर्चीवर बसली होती. ती विचार करत होती,"तो फक्त मलाच दिसतोय याचे कारण काय असेल? त्याला काही सांगायचे आहे हे त्याच्या डोळ्यात दिसते."

आताही तो मुलगा त्या झाडाच्या पाठीमागून डोकावताना तिला दिसला. ती हिम्मत करून त्याला म्हणाली,"कोण आहेस तू? काय हवं आहे तुला? तू मला कधी त्रास दिला नाहीस. पण तुला काही सांगायचे आहे असे मला वाटतं. हे बघ घाबरू नकोस. समोर ये."

तिच्या बोलण्यावर त्याला विश्वास वाटला. तो भरकर तिच्या समोर येऊन उभा राहिला व त्याने काहीही न बोलता तिच्या कपाळाला हात लावला. तिचे डोळे आपसुकच बंद झाले आणि त्याच्याबाबतीत जे झालं ते तिला त्या बंद डोळ्यांत चित्रपटासारखं दिसू लागलं.

याच वाड्यात फार पूर्वी आधी एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील मोठ्या सुनेला लग्न होऊन सात-आठ वर्षे झाली तरी मुलं होतं नव्हतं म्हणून तिची सासू व नवरा तिला खूप त्रास देऊन वांझ म्हणत उठता बसता टोमणे मारून तिचा खूप छळ करत होती. या सर्वांला कंटाळून तिने एका तांत्रिकाची मदत घेतली. त्या तांत्रिकाने तिला एक साधना करण्याचा उपाय सांगितला की जर तिला एका छोट्या नुकत्याच मृत मुलाला जिथे पुरले असेल तेथील माती एका कलशात घेऊन त्याच्या आत्म्याला जागृत करून लाल कापडाने बांधून तो कलश तिच्या घराच्या अंगणात पुरायचे व ती साधना करायची त्यामुळे  तिला मुलं होईल. पण ती साधना खूपच कठीण होती. मुलं होण्यासाठी तिने काहीही करायची तयारी दर्शवली. रोज स्मशानात जाऊन कोणी लहान मुलाचे प्रेत पुरले का पाहत होती. सात-आठ दिवसांनी तिने एका पाच-सहा वर्षाचे मुलाचे प्रेत त्याचे आईवडील रडत पुरताना पाहिले. ती मनातून खूप खूश झाली. त्या तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सगळे विधी करून ती रात्री त्या प्रेताला जिथे पुरले होते तेथील माती घेतली. रात्रीच्या त्या काळोखात तिने रक्ताची आहुती देऊन जोर जोरात मंत्रोच्चार करत त्या आत्म्याला जागृत केले. ती एक धूसर आकृती बनून त्या कलशात सामावल्यावर तिने त्याला त्यात बंदिस्त करून त्यावर लाल कापड बांधून ते वाड्यात अशोकाच्या झाडाखाली अंगणात पुरले. पण ती एक गोष्ट साफ विसरली. त्या तांत्रिकाने तिला काहीही झालं तरी मागे वळून पाहू नकोस असे सांगितले होते पण तिने तिच चूक केली. "आई" असा आवाज आल्याने तिने मागे वळून पाहिले तेव्हा एक भयानक आकृती पाहून घाबरल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आणि त्या छोट्या मुलाचा आत्मा त्या जागीच कैद झाला. त्याच्या मुक्तीसाठी भटकणारा आत्मा तोच छोटा मुलगा नैनाला दिसत होता. तिला हकीकत कळल्यावर तिने दुसऱ्या दिवशी तिच्या गुरूजींशी बोलली तेव्हा त्यांनी तिला २१ ब्राह्मणांकडून महायज्ञ महापूजा करायला सांगितले. पूजा करताना त्या अशोकाच्या झाडाखाली पुरलेले ते कलश ठेवले होते. तिने ती पूजा यथासांग केली. तेव्हा त्या मुलाची धूसर आकृती त्या यज्ञातून बाहेर पडताना तिला दिसली जो मुक्ती मिळाली म्हणून खूश होता. त्याच्या डोळ्यांत आभार मानत असल्याचे कृतज्ञतेचे भाव तिला दिसले. खरं तर या गोष्टीवर राजचा विश्वास नव्हता पण त्यालाही त्या पूजेच्या पवित्र वातावरणात तो दिसल्याने त्याला खरे वाटले. नैनामुळे त्या छोट्या मुलाच्या आत्म्याला अखेर मुक्ती मिळाली, वाड्याचे रहस्यही कळले. तिला या मुलाच्या मुक्तीसाठी तो वाडा तिला स्वप्नात येऊन येथे येण्यासाठी खुवणत होता याचाही उलगडा झाला.

समाप्त-

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. प्रस्तुत कथा ही मनोरंजनाच्या दृष्टीने कल्पना करून लिहिलेली असून जर त्यात नाव, स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत व्यक्तींशी साम्य आढल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.