Login

मुलांचे क्युट से किस्से ...

मुलांचे क्युट से किस्से ...

मुले म्हणजे देवाघरची मुले असं म्हणतात. ह्याच फुलांना थोडी मोठी झाली की शिंग फुटतात. मग हट्ट, उलट उत्तरं .. ह्या वाटेने जाता जाता कधी कधी पालक म्हणून ती शिंगे (किंवा फुलांचे काटे ) आपल्याला बोचतात.

पण त्या आधीचा काळ फारच अगदी छान असतो. त्यांचं निरागस, निष्पाप मन कधी आपल्या काळजाला हात घालत, (लिहिताना, पुलंचं "निरागसता का काय म्हणतात त्या गुणाने कधी कार्ट काळजाला हात घालेल नेम नाही " आठवलंच ) तर कधी कधी चानस हसू फुलवत.
अशाच काही गमती.

***

आम्ही नुकतेच US ला शिफ्ट झालो होतो.
आमच्या नर्सरीतल्या लेकाची पीड़ियाट्रीशनकडची पहिलीच अपॉइंटमेंट होती. सुरुवातीला नर्स आमच्या कडून माहिती घेत तिच्या सिस्टिम मध्ये टाकत होती. होता होता तिने विचारलं,
" अँड race ?"
इतका वेळ टंगळ मंगळ करणाऱ्या लेकाने त्वरीत तो ओळखीचा शब्द पकडला आणि पटकन म्हणाला.
"कालच आमच्या शाळेत running race झाली, आणि आमचा ग्रुप जिंकला. " त्या उत्तराबरोबर सगळी खोली हसण्याच्या आवाजाने भरून गेली.

***

साधारण दोन एक वर्षाचा असेल. स्वयंपाक घरात आला. मी तिकडेच काम करत होते. फ्रिजच दार काही कारणाने उघड होत.
फ्रिजच्या दरवाज्यात त्याला पांढरे बॉल्स एका लायनीत मांडून ठेवलेले दिसले. छोटे डोळे चमकले आणि एक बॉल उचलला. चिमुकल्या हातातून बॉल निसटला,.
"फटॅक.." चिमुकले डोळे विस्फारून बघतच बसले, बॉल उसळून वर नाही आला. पण फुटला. आतून थोडा जेल आणि अजून एक पिवळा सॉफ्ट बॉल बाहेर पडला. अरे हे तर जादूचं आहे काहीतरी .
छोट्या छोट्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये हसू उमटले. अजुन दोन तीन दिसतायत वरती. अजून एक "फटॅक.." अरे परत तसच झालं, एक अजून "फटॅक" पुन्हा तेच.
मी फक्त २-३ फुटांवरून हे सगळं बघत होते.
मी पुरती गोंधळून गेले. छोटूच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणार आश्चर्य बघू कि त्याला अजुन पसारा करण्यापासून थांबवू आणि मौल्यवान अंडी वाचवू. खरं सांगते सगळं नीट समजायला आणि त्यावर action घ्यायला तीस एक सेकंद लागली. तिथपर्यंत ३-४ अंडी फुटली होती
त्या ३० सेकंदात केलेला पसारा आवरण्यात माझा कमीतकमी अर्धा तास तरी गेला हे वेगळ नकोच सांगायला !

***

घरातले शेवटचे दोन आंबे कापून दिले. हापूस आंबा म्हणजे तुमच्या सगळ्यांसारखा आमचाअत्यंत लाडका. आंबा मुटु मुटु संपवून स्वारी आत स्वयंपाक घरात आली. त्याची उंची ओट्याशी पण पोहोचली नव्हती. हातातील वाटी ओट्यावर ठेवली आणि म्हणाला
"अजुन ...?"
"संपला "
त्याने डोळे वर करून पाय उंचावून बोट दाखवले "तो बघ तिकडे, दे ना !"
" राजा, तो आंबा नाहीये, ती बाठ आहे, म्हणजे आंब्याची बी. बघ किती मोठीये. ए, जर बिनबाठीचे म्हणजे सीडलेस आंबे आले तर .... "
अहाहा ! बिनबाठीचा मोठा रसाळ आंबा, त्याचा सुमधुर रस, झालच तर बरोबर गरमागरम पुऱ्या .. स्वर्गसुखच ... माझं स्वप्नरंजन सुरु...
"पण बी नशेल तर अजून आंबे कशे मिळतील ??" मान तिरकी करून वर बघत त्या निरागस चेहऱ्याने मला प्रश्न केला.
खाडकन स्वप्न भंगलं ! मी अचंबित !! एकाच क्षणी बाळाच्या चाणाक्षपणाचं खूप सारं कौतुक आणि स्वतःच्या तारे तोडणाऱ्या डोक्याचं *** (जाऊन दे मी आता त्या भावना सांगत नाही :))

तुमच्याकडे पण छोट्यांच्या काही गमती असतील तर जरूर सांगा.

0