Login

मुलगा झाला हो भाग 3 अंतिम

एक खुसखुशीत विनोदी कथा

मुलगा झाला हो भाग 3 अंतिम भाग
मागील भागात आपण पाहिले सुमेधाला प्रेगनन्सी कन्फर्म होते आणि तिची प्रचंड चिडचिड होत असते . ती कधी एकदा श्रीरंग घरी येतोय याची वाट बघत असते आता पाहूया पुढे .


श्रीरंग आज एकदम फ्रेश मुडमध्ये होता . फ्रेश होऊन तो हळूच किचनमध्ये आला आणि त्याने मागून सुमेधाला मिठी मारली . तिने जोरात चिमटा काढला . श्रीरंगला ओरडता देखील येईना .

" आई,जरा खरेदी करायची आहे आम्ही जाऊन येतो." सुमेधाने आईला आवाज दिला आणि श्रीरंगने ओळखले प्रकरण गंभीर आहे .

तो गुपचूप तिच्यासोबत गाडीत जाऊन बसला.

"कुठे जायचं आहे?" त्याने हसुन विचारले .

बदल्यात मिळालेला जळजळीत कटाक्ष पाहून त्याने गाडी सुरू केली. त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी गेल्यावर सुमेधा गप्पच .


" सुमेधा काय झाले ? आई काही बोलली का ? शाळेत काही झालेय का ? " श्रीरंग काळजीने विचारत होता .


" काय म्हणाला होतास ? एका डावात काय होत नसते.. लगेच काही होते का ? " सुमेधा चिडून बोलत होती .


आपण चिडलो की नवरा फुल कन्फ्युज होईल असे बोलणाऱ्या तमाम भारतीय बायका गरिबांची गोची करतात . आपण कशाबाबत बोललो हेच त्याला आठवत नव्हते ?

" अग पण एवढे चिडायला काय झाले? " श्रीरंग काकुळतीला येऊन म्हणाला .


सुमेधाने पर्स मधून प्रेगनन्सी किट काढून आपटले .

" बघ , तुझी एक दिवसाची मजा किती महागात पडणार आहे." तिला रडू आवरत नव्हते .


दोन लाल रेषा पाहून मनात फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या कशाबशा दाबून श्रीरंग शक्य तेवढे गंभीर रहायचा प्रयत्न करत होता .

" आता ते आपल्या हातात थोडेच आहे . मला काय माहीत नेमका तोच डाव लागेल!" श्रीरंग भोळेपणाचा आव आणून बोलत होता.


" ते काही नाही आपण डॉक्टरकडे जायचे उद्याच्या उद्या. यावर मला काहीच ऐकायचे नाहीय."
सुमेधा चिडून बोलत होती.


तिची कशीबशी समजूत काढून दोघे घरी आले. बेल वाजली आणि दार उघडले तर समोर आई.


" आई,अचानक कशी आलीस तू?" सुमेधा आनंदाने ओरडली.


" अग एक कार्यक्रम होता या बाजूला. संपायला उशीर झाला. मग म्हंटले थांबुया . चल तुझ्या आवडीचे पिठले केले आहे."
आई उत्साहाने म्हणाली.


सुमेधा आत शिरली आणि फोडणीचा वास नाकात शिरताच तिने बेसिन गाठले.


" श्रीरंगराव,रात्री मी झोपेत हो लेकिसोबत." सासूबाई असे म्हणताच त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.


आईने काय जादूची कांडी फिरवली काय माहित पण सुमेधा बाळ होऊ द्यायला तयार झाली.


संध्याकाळी सुमेधा घरी आली आणि बघते तर काय सगळीकडे गुलाबी रंगाची खेळणी .

" मम्मा यार तुला आधीच सांगतो पिंक कलर मला नाही आवडत." युवराज चिडले होते.


" अरे पण हे सगळे आणले कुणी?" सुमेधा विचारत असतानाच श्रीरंग बाहेर आला.

" सुमेधा,आपल्या कन्येच्या स्वागताची तयारी." उत्साहाने श्रीरंग म्हणाला.


त्यादिवशी संध्याकाळी त्याने प्रशांतला ही बातमी सांगितली.

" शिऱ्या अरे काय हे? कशाला आता चान्स घेतला तू?" प्रशांत चिडला.

" पशा मला एक सुंदर बाहुलीसारखी मुलगी हवी." श्रीरंग बोलून गेला.

" शिऱ्या तुला मुलगा होणार लाव बेट?" प्रशांत पटकन म्हणाला.

" गप रे,तुला काय कळत यातल?" श्रीरंग चिडला.

" मला सांग वहिनीला खूप उलट्या होतात? काहीच पचत नाही? चेहरा सुकला आहे?" प्रशांतने विचारले.

" पशा तु ज्योतिषी झालास यार." श्रीरंग चिडला.


त्यानंतर आपल्याला मुलगीच होणार असे ठाम समजून श्रीरंग सुंदर छोटे फ्रॉक,बाहुल्या,दागिने खरेदी करायचा.

" श्री काय हा वेडेपणा? " सुमेधा त्याला रागवत असे.

" अग राघवसाठी बहीण नको का? मुलगीच बापावर माया लावते." श्रीरंग भावनिक होऊन म्हणायचा.


" हो का? पण आपल्या वन्स आणि पप्पांचे एक मिनिट पटत नाही." सुमेधा त्याला चिडवत असे.


" माझ्या पोरिशी माझे पटणार. " श्रीरंग तिला उडवून लावायचा.


अखेर तो दिवस आलाच. सकाळपासून सुमेधा अस्वस्थ होती.
" श्री उठ लवकर." सुमेधा ओरडली.

" अरे यार रविवार आहे. झोपू दे थोडा वेळ. " श्रीरंग कुरकुरला.


" मजा करताना कशी येत नाही रे झोप पुरुषांना?" तार स्वरातले हे वाक्य ऐकताच श्रीरंगची झोपेची तार ताडकन तुटली.

"काय झाले? काही होतेय का तुला? अजून पंधरा दिवस आहेत ना पण?" श्रीरंग प्रश्न विचारत होता.


" आता गप्प बस आणि आईंना उठवून खाली जाऊन गाडी काढ."
येणारी कळ दाबत सुमेधा ओरडली.

आहे त्याच अवतारात अक्षरशः पंधरा मिनिटात सगळे दवाखान्यात दाखल झाले.


"आई, कोपऱ्यावरून बर्फी घेऊन येतो." श्रीरंग उत्साहात म्हणाला.

आईने होकारार्थी मान डोलावली. श्रीरंग चांगली दोन किलो बर्फी घेऊन आला. इकडे सुमेधा वेदनेने विव्हळत होती. शेवटी डॉक्टरांनी सिझेरियन करायचा निर्णय घेतला.

फॉर्मलिटी पूर्ण झाल्या आणि एक बसकी रडण्याची किंचाळी सगळीकडे ऐकू आली. नर्स आनंदाने बाहेर आली.

" अभिनंदन मिस्टर श्रीरंग. तुम्हाला मुलगा झाला." हे वाक्य ऐकताच श्रीरंगच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

" अहो इकडे लोक मुलगा व्हावा म्हणून देव पाण्यात ठेवतात." नर्स खांदे उडवत बोलली.
तितक्यात प्रशांतने फोन केला.


" शिऱ्या पेढे खायला कधी येऊ?" तसा श्रीरंग सुटलाच.

" पशा नालायक,तुला सांगायलाच नको होते."

इकडे बाकी सगळेजण आनंदात होते. शेवटी श्रीरंग देखील बाळ पाहून आनंदी झालाच. परंतु मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दुःख होतेच. म्हणतात ना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना.


हल्ली पहिला मुलगा असताना दुसरी मुलगीच हवी ह्या हट्टाने चान्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावरच सुचलेली ही खुसखुशीत कथा.

🎭 Series Post

View all