Login

मुलगी शिकली, घमेंडी झाली-1

बायका शिकतात, नोकरी करतात म्हणून घमेंडी बनतात आणि त्यामुळेच घटस्फोट वाढले या विचारांचा मंदार, जेव्हा मुलीवर बेतलं तेव्हा..
"बायका शिकल्या की घमेंडी होतात, आणि म्हणून हे असे घटस्फोट होतात..पाहिलं ना? लग्नाला अगदी सहा महिनेही होत नाही तोच घटस्फोट होऊ लागलेत.."

मंदार tv वरच्या बातम्या बघत होता आणि सोबतच शेजारी बसलेल्या आपल्या मित्राशी बोलत होता. थोडक्यात घटस्फोटाला कारणीभूत एकमेव "मुलीचा घमंडीपणा" यावर दोघांनी अगदीच शिक्का मारला होता. पलीकडून स्वयंपाक करणारी त्याची बायको त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होती. विषय वाढतच चाललेला, नवऱ्याचा मित्र अजून काही उदाहरणं देत होता,

"आमच्या शेजारचंच उदाहरण घ्या ना..त्या बाईने नोकरी करायला सुरुवात केली, हातात पैसे यायला लागले, वर ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यासोबत लफडंही सुरू..मग काय, घेतला घटस्फोट.. "

"काय एकेक बायका असतात ना, आधीच्या काळी बरं होतं.. बायका कमवत नसत, आपल्या नवऱ्यावर अवलंबून असल्याने नवऱ्याला सोडायचा विचारही त्यांच्या मनात यायचा नाही. घरातच असल्याने बाहेर माणसांशी संपर्क नसायचा अन लफडी लांबच राहायची.."

किशोरीला त्यांच्या सगळ्या बोलण्याचा प्रचंड राग येत होता. पण आता बोलायला गेलं तर "बघा, बायकांना मुभा दिली तर जीभ कशी चालते यांची" असं म्हणायलाही कमी करणार नाही हे तिला माहीत होतं. पण या दोघांना चांगली अद्दल घडवायचं मात्र तिने नक्की केलं..तेही बोलून नाही, तर कृतीने!

दुसऱ्या दिवशी सकाळी मंदार ऑफिसला जायची तयारी करत होता, एरवी तो ऑफिसला जायच्या आत त्याची मुलगी रेवा शाळेसाठी तयार होऊन बसलेली असायची, पण आज ती चक्क झोपूनच होती, त्याने बायकोला आवाज दिला,

"किशोरी.. आज शाळा नाही का??"

"नाही.."

"आज कसली सुट्टी?"

"काही नाही, मी एक निर्णय घेतलाय.."

"कसला?"

मंदार हातातलं काम सोडून गंभीरपणे ऐकू लागला,

"रेवाची शाळा बंद करायची..काही गरज नाही शिकायची."


हे ऐकून मंदार चिडला,

"काय बोलतेय तू? अक्कल आहे का तुला?"

"खूप विचार करून बोलतेय मी, काय उपयोग आहे तिचा शिकून? शेवटी लग्न करून सासरीच जाणार ना ती?"

"सासरी जाणार म्हणून शिकवायचं नाही? हे कोणतं लॉजिक?"

"अहो तुम्हीच नाही का, काल तुमच्या मित्रासोबत बोलत होतात..की मुलगी शिकली तर घमेंडी होते, मग नवऱ्याला सोडून द्यायच्या बाता करते.. आधी कसं मुली नवऱ्यावर अवलंबून होत्या तर घटस्फोट होत नसत...बरोबर ना?"

मंदार दुसऱ्या स्त्रियांबद्दल अर्वाच्य बोलत होता पण जेव्हा स्वतःच्या मुलीला त्या ठिकाणी ठेवलं तेव्हा तो गडबडला..

"आपल्या रेवाला शिकवायचं नाही..म्हणजे ती लग्नानंतर नवऱ्यावर अवलंबून राहील..म्हणजे तिला घमंड नसेल आणि घटस्फोट सारखे प्रकार घडणारच नाहीत..काय वाटतं?"

मंदार मौनच होता, तेवढ्यात मंदारची बहीण म्हणजे रेवाची आत्या दारात..

"नणंदबाई? या...आज सकाळी सकाळी?"

"वहिनी आधी हे घे पेढा..मला जॉब मिळाला, दहा लाखाचं पॅकेज आहे.."
क्रमशः
0

🎭 Series Post

View all