Login

मुलगी झाली हो...

Mulgi sasar ani maher donhi sambhalte

मुलगी झाली हो...


दवाखान्यात जोरजोरात किंचाळण्याचा आवाज सुरू होता, आणि काही क्षणात तो आवाज बंद होऊन त्याची जागा एका गोंडस बाळाच्या आवाजाने घेतली होती.


बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सगळे सुखावले.
 डॉक्टरांनी आई किंवा मुलं दोघांपैकी कोणीही एक वाचू शकेल असं सांगितलं होतं पण देवाच्या कृपेने आई आणि बाळ दोघेही सुखरूप होते.

अदिती लग्न होऊन सासरी आली, सासरचे सगळे स्वभावाने खूप छान होते. तिला कोणताच त्रास झाला नाही. मानस पण तिची खूप काळजी घ्यायचा. एकंदरीत सगळं सुरळीत चाललं होतं.


लग्नानंतर वर्षभरातच अदितीला मुलगी झाली. घरचे सगळे खूप आनंदात होते. पहिली मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली. त्यामुळे सगळे आनंदात होते पण  नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या होत्या. 


पहिलं बाळंतपण झालं तर मुलगाच व्ह्यायला हवा होता, वंशाला दिवा नको का? हे कुटुंब समोर न्यायला कोणी वारसदार नको का? नातेवाईकांचे टोमणे सुरू झाले.
अदिती आणि तिच्या घरचे मंडळी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचे.


पहिली मुलगी दोन वर्षांची होताच अदितीला पुन्हा दिवस गेले.
यावेळी आदितीची प्रकृती जरा नाजूक होती, तिला काही कॉम्प्लिकेशन सांगितले होते.


मानस आणि त्याच्या आईने अदीतीची संपूर्ण काळजी घेतली. शेवटचे दोन महिने पूर्ण आराम करायला सांगितला होता.

मानसच्या आई सगळं हाताहातात आणून द्यायचा. शेवटच्या महिन्यात अदितीला पोटात खूप दुखून आलं, तिचा त्रास असह्य झाला, तिला लगेच दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की आई किंवा बाळ दोघांपैकी कुणाला एकाला  वाचवता येईल.


पण देवाच्या कृपेने आई आणि बाळ दोघेही सुखरूप होते.
अदिती घरी आली, तीचं छान हसतमुखाने स्वागत झालं.

अदितीच्या मदतीला तिची आई आली होती, बाळाचं सगळं तीच करायची आणि घरच सगळं मानसच्या आई करायच्या.
मोठया उत्साहात बाळाचं नामकरण विधी झाला. “मीरा” नाव ठेवण्यात आलं.


इथेही शेजारचे आणि नातेवाईक यांचे टोमणे सुरू झाले.


दुसरीही मुलगीच झाली. दोन दोन मुलीचं शिक्षणात किती खर्च होईल आणि लग्नानंतर ह्या येणार आहेत का सांभाळायला. मुलगा असता तर जवळ राहीला असता.


आदीतीच्या सासू खूप समजदार होत्या.जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांच्या नव्हत्या म्हणून अदितीला त्यांचा आधार वाटतं होता.


दिवस, महिने, वर्ष उलटत गेले, दोन्ही मुली मोठ्या झाल्या.
मोठी मुलगी गायत्री डॉक्टर झाली, लहान मुलगी मीरा इंजिनिअर झाली.


दोघींनाही आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती. आई वडिलांनी कष्ट करून आपल्याला मोठं केलं याची त्या दोघी स्वतःला  वेळोवेळी जाणीव करून द्यायच्या.


मीरा गव्हर्नमेंट मध्ये नोकरीला लागली.  

मीराचा पहिला पगार आला त्यातून तिने आजीसाठी काठाची साडी घेतली. आईसाठी सिल्कची साडी, बाबांसाठी कुर्ता घेतला. घरी गेली.


“आई, आजी कुठे आहे?” मीरा


“त्यांच्या खोलीत आहेत.” अदिती


“काय ग आज आल्या आल्या आजीची आठवण?.” अदिती
“आजी साठी काही आणलंय.” मीरा


मीरा आजीच्या खोलीत गेली, आजी माळ जपत बसल्या होत्या.
“आजी..” मीरा
मीरा आजीला जाऊन बिलगली.


“आजी माझ्या सोबत बाहेर हॉल मध्ये चल.” मीरा
“अग कशाला.?” आजी


“आजी चल तर.” मीरा
मीरा आजीला हॉल मध्ये घेऊन गेली, तिला सोफ्यावर बसवलं.
आतून आरतीची थाल आणली.


आजीला ओवाळलं आणि तिच्या हातात साडी दिली.
“अग हे काय आहे?” आजी
“आजी आज माझा पहिला पगार झाला, म्हणून ही पहिली साडी मी तुझ्यासाठी घेतली.आवडली ना,मला नेसून दाखव.” मीरा


“अग मी म्हातारी झाली आता मला कशाला लागते नवीन साडी,उगीच माझ्यावर खर्च करू नको, आई बाबासाठी नाही आणलस?.” आजी


“त्यांना कसं विसरीन? पण आजी पहिला मान तुझा आहे.” मीरा
आजीच्या डोळ्यात पाणी आलं,
 अदीतीही भावुक झाली.


“आजी तुझ्यामुळे मी आज इथे उभी आहे.”तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही.” मीरा


“ काय बोलतेस तू?” आजी


“आजी काही वर्षापूर्वी जेव्हा मी हळूहळू वयात यायला लागले होते ना तेव्हा आईने मला सगळं सांगितलं होतं,माझ्या जन्माच्या वेळी काय काय घडलं? माझ्या जन्मानंतर तुम्हाला काय काय ऐकून घ्यावं लागलं होतं,सगळं  आईने मला सांगितलं आणि हेही सांगितलं की तू तिच्या पाठीशी कशी भक्कम उभी राहिलीस, म्हणून ती पण स्ट्रॉंग झाली.


आजी त्यावेळी  जर तू साथ दिली नसतीस ना तर सगळं खूप कठीण झालं असतं. सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तू खंबीरपणे उभी राहिलीस. मुलगा-मुलगी काहीही भेद नसतो ही शिकवण तू आम्हाला दिलीस.


मुलगा वंशाचा दिवा आहे, पण तो फक्त एकाच घरी प्रकाश देतो आणि मुलगी सासर आणि माहेर दोन्ही कुटुंब  सांभाळून घेते. आजी माझ्या आई बाबांना जरी मुलगा नसला ना तरी मी त्यांना मुलाची उणीव कधीच भासू देणार नाही, मी त्यांचा सांभाळ करेल आणि  देवाकडे प्रार्थना करेल की माझ्या लग्नानंतर माझ्याही पदरात मुलीचं दे.”


“आज मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय.” मानस
“आई माझं जीवन सार्थक झालंय ग, देवाने मला इतक्या समंजस मुली दिल्या.” मानस


सगळयांना मिराचं खूप कौतुक वाटलं.
सगळे एकमेकांकडे हसतमुखाने बघत राहिले.

समाप्त:

मुलगा- मुलगी भेद करणं खरं तर हा एक मानसिक आजार आहे. याला काहीच इलाज नाही, एखादयच्या मनात घर करून गेली की ती कीड काढणं कठीण आहे.
मानसच्या आई सारख्या सगळ्याच बाया वागल्या तर अर्धा प्रश्न इथेच सुटतो.
तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा, आणि लाईक करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया लिहिण्यास हुरूप देऊन जातो.


धन्यवाद

0