नेहाची आई तिला समजावत होती, "मागच्या वेळेस जसं दात दाखवून हसत होतीस तसं यावेळेस हसू नकोस. थोडं लाजूनच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. उगाच फालतू बडबड करू नकोस. मागच्या वेळेस जे घडलं ते घडायला नको यावेळेस. यांनी म्हणायला नको की मुलगी डोक्याच्या वर आहे."
नेहा रागात होती. तिला मागच्या वेळेस क्षुल्लक कारणांवरून दिलेला नकार खूप टोचला होता. त्यात तिची तर काहीच चूक नव्हती.
मुलाकडचे येऊन पोहोचले होते. धिरज एका आय. टी कंपनीत कामाला होता. त्याचा स्वभाव मोकळा होता. दिसायला ही चांगलाच होता. तो व त्याचे आईवडील सोफ्यावर बसले.
नेहाची आई म्हणाली, "थांबा मी नेहाला बोलावते."
त्यांनी नेहाला आवाज दिला. नेहा हातामध्ये एक ट्रे घेऊन आली. त्या ट्रे मध्ये चहा व पोहे होते. तिने तो ट्रे टेबलवर ठेवला व त्यांच्या हातात चहा दिला. नंतर ती खाली नजर करून तिथेच उभी राहिली.
धिरज ची आई म्हणाली, "अगं उभी का आहेस? खाली बस."
ती खाली बसली. ती बराच वेळ खाली बघत होती. तिच्या आईला जाणवलं की तिने डोक्यावर पदर घेतलेला नव्हता. त्या तिला खुणावू लागल्या. पण तिचं लक्ष नव्हतं.
धिरजने तिला काही प्रश्न विचारले. तिने शांतपणे त्यांची उत्तरं दिली. तिची उत्तरं नेमकी होती. तिच्या बोलण्यात मोकळेपणा वाटत नव्हता. तसेच तिची नजरही जमिनीकडे खिळलेली होती.
धिरज म्हणाला, "तुम्ही पण काहीतरी विचारा ना. केव्हाचा मीच प्रश्न विचारतोय. असं वाटत आहे की मी तुमचा इंटर्व्यू घेतोय."
हास्याची एक लहर येऊन गेली. पण ती मात्र गंभीरच होती. धिरज व त्याच्या आईवडिलांना ते थोडंसं खटकलं.
ती म्हणाली, "नाही. मला काहीच विचारायचं नाही."
धिरज ची आई म्हणाली, "अगं असं कसं. तुला प्रश्न असतील तर मोकळेपणाने विचार. कुठलाच संकोच करू नकोस. तुम्ही प्रश्नांनातून एकमेकांना जाणून घ्यायला हवं."
ती म्हणाली, "नाही. नको."
तिचा चेहरा गंभीर होता. तिची आई पण चिंतेत वाटत होती. धिरजच्या आईला काहीतरी गडबड वाटत होती.
त्या म्हणाल्या, "बाळा काही दडपण तर नाहीए ना तुझ्यावर? तू जर लग्नासाठी तयार नसशील तर तसं सांग. मोकळेपणानं सांग. संकोच करू नको. जे तुझ्या मनात असेल ते बिनधास्त बोलून टाक."
ती बोलू लागली, "दबाव वगैरे काही नाही. मागच्या वेळेस मला त्यांनी नकार दिला होता. तेही क्षुल्लक कारणांवरून."
ती मधेच थांबली.
त्या म्हणाल्या, "बोल-बोल. थांबलीस का? सगळं सविस्तर सांग."
ती बोलू लागली, "मागच्या वेळेस जेव्हा मला मुलगा बघायला आला तेव्हा मी खूप मोकळेपणानं त्यांच्याशी बोलत होते. काही विनोद झाला तर मनसोक्त हसत होते. त्या मुलाची आई मी डोक्यावर पदर घ्यायचा विसरले याकडेच बघत होती. त्या मधे-मधे नाक मुरडत होत्या. त्या मुलाचे प्रश्न विचारायचं झाल्यावर मी म्हणाले मला पण काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा तर त्यांना धक्काच बसला. मी त्या मुलाला व्यसन करता का? पगार किती आहे? अश्या गोष्टी विचारल्या. प्रश्न तर महत्वाचे आणि साधेच होते. पण त्यांना ते फारच खटकलेलं दिसत होतं. त्या काहीतरी कुजबुजत होत्या. नंतर त्यांनी नकार कळविला. कारणही नीट सांगितलं नाही. पण मला एक कळत नाही की कुणी मुलीने मनमोकळेपणानं बोलल्याने किंवा मनसोक्त हसल्याने ती मुलगी वाईट तर होत नाही ना! डोक्यावर पदर असणं इतकं महत्वाचं असतं का? मुलीने नेहमी नजर खालीच ठेवावी का? नेहमी बंधनातच रहावं का? मुलीने मुलाला पगाराबद्दल विचारल्यावर ती डोक्याच्या वर असते का? त्याच्या अर्थ मी त्याच्या आईवडिलांना वागवणार नाही असा होते का? त्या मुलाला मी गुलाम बनवेल का? त्यामुळे मी जास्त बोलत नव्हते."
तिचे डोळे ओलावले होते. धिरज च्या आईवडिलांना व त्याला पण वाईट वाटत होतं. बऱ्याच वेळी समोरच्याला पारखण्यात चूक होते माणसांकडून. कदाचित त्यांच्याकडे मुलीचं असं वागणं वरचढपणा समजला जात असावा. त्यामुळे त्यांना तिच्याबद्दल तसं वाटलं असावं.
धिरजची आई म्हणाली, "जाऊदे. तू रडू नकोस. अश्या गोष्टी होत असतात. त्याचं एवढं मनावर घेऊ नकोस."
त्यांनी तिला होकार कळवला होता. त्यांना तिचा मोकळेपणा, प्रामाणिकपणा खूप आवडला होता. कमाल आहे ना जी गोष्ट एखाद्याला फार वाईट वाटते तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्याला चांगली वाटते.
आवडल्यास share नक्की करा.
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा