मुलीची आई -भाग 1

गोष्ट आईची
सुनेची आई आली म्हणून विदुला काकूंनी नाक मुरडलं आणि त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या. तशी चहाची वेळ झाली होती म्हणून त्यांनी दोन कप चहा ठेवला. आभाळ गच्च दाटून आलं होतं. कधी पाऊस पडेल याचा नेम नव्हता.
विदुला काकूंनी मनोमन प्रार्थना केली..'देवा, आत्ता पाऊस पडायला नको. नाहीतर या इथेच थांबायच्या!' सोपस्कार म्हणून त्यांनी आपल्या सुनेच्या आईसमोर चहाचा कप जवळ जवळ आदळलाच.
"हे घ्या. आत्ता कसं येणं केलंत?"

"तुमच्या सुनेच्या डोहाळ जेवणाची तारीख ठरवायची आहे ना? त्यासाठी आले." रजनी ताई म्हणाल्या.

"अहो, आम्ही ठरवून कळवली असती तारीख. तुम्ही कशाला आलात? म्हणजे पाऊस कधीही येईल. मग तुम्हाला घरी जाणं मुश्किल होईल म्हणून म्हणाले मी."

हे ऐकून रजनी ताई गप्प बसल्या. कारण विदुला काकूंच्या बोलण्यामागचा अर्थ त्यांना उमगला होता. त्यांचं लक्ष वारंवार घड्याळाकडे जात होतं. सई यायच्या वेळेत त्या आल्या होत्या. कारण तिच्याशी बोलून लगेच घरी जाता येईल. हा त्या मागचा उद्देश!

आपण इथे आलेलं विदुला काकूंना आवडत नाही हे रजनी ताईंना माहिती होतं. पण लेकीसाठी हा अपमान सहन करण्याची त्यांची तयारी होती. रजनी ताईंनी आपल्या लेकीचं म्हणजेच सईचं लग्न व्यवस्थितरित्या करून दिलं होतं. कुठल्याही सणवारात कोणतीही कमी ठेवली नव्हती. तरीही विदुला काकू अशा का वागतात? हे एक कोडंच होतं.

आज नेमका साईला यायला उशीर झाला. त्यातच पावसाचे थेंबही बरसू लागले. बेफाम वाराही सुटला. आता मात्र रजनी ताई चलबिचल झाल्या.
"अशा अवस्थेत कशाला नोकरी करावी पोरीने?"
हे वाक्य नकळत त्यांच्या तोंडून एकदम निघून गेलं.

"त्यात काय एवढं? गरोदरपणात आम्हीही नोकरी करत होतो. आम्हाला काहीही झालं नाही. उलट दोन्ही मुलं गुणीच निपजली." विदुला काकू तोऱ्यात म्हणाल्या.

यावर रजनी ताई नुसत्याच हसल्या.

इतक्यात सई आली.
"आई!" रजनी ताईंना अचानक आलेलं बघून तिला आनंद झाला.
"आज कशी काय आलीस?"

"अगं, तुझ्या डोहाळ जेवणाची तारीख ठरवायची आहे ना! त्यासाठी तर आले."

'तर.. जणू काय सगळा खर्च ह्या स्वतः करणार आहेत.' विदुला काकू मनातल्या मनात म्हणाल्या.

त्यांच्या मनातलं जणू काही रजनी ताईंनी ओळखलं आणि पुढे त्या म्हणाल्या,
"सई, बाबांनी पुन्हा नोकरी धरली. रिटायर झाल्यानंतर घरात बसून त्यांना अगदीच कंटाळा येत होता. शिवाय साहेबांनी 'घरी बसून काय करणार आहात?' असं म्हणत परत बोलावून घेतलं."

क्रमशः

🎭 Series Post

View all