मुलीची आई -भाग 2

गोष्ट आईची
"आई, बाबा यातलं काहीच बोलले नाहीत." सई.

"अगं, अगदी काल -परवाचीच गोष्ट आहे ही. ते राहू दे. तू सुट्टी कधीपासून घेतेस? म्हणजे एखादी छानशी तारीख ठरवू आणि डोहाळ जेवण उरकून टाकू." रजनी ताई उत्साहाने म्हणाल्या.

या वाक्यावर सईने आपल्या सासुबाईंकडे पाहिले.

"तुम्ही तारीख ठरवा. आम्ही येऊ." विदुला काकू जागेवरून उठल्या.
"आई कधीपासून तुझी वाट बघत होती. त्यातच बाहेर पावसाळी वातावरण. अशा अवस्थेत तुला काही कार चालवता यायची नाही. त्या घरी जातील कशा?"

"त्यात काय? राहतील आज. उद्या सकाळी ऑफिसला जाताना आम्ही त्यांना घरी सोडू. मग झालं तर." समीर दारातून आत येत म्हणाला.

'तेच तर मला नको आहे.' विदुला काकू तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या आणि आपल्या खोलीत आल्या. जुनं -पानं काहीतरी आठवत त्या रजनी ताईंवर मनातल्या मनात तोंडसुख घेऊ लागल्या.
---------------------

डोहाळ जेवण झालं आणि सई माहेरी आली.

"समीर, सई माहेरी गेली खरी. पण तिथे तिची नीट काळजी घेतली जाईल की नाही माहिती नाही. मी गेल्या सहा महिन्यांपासून तिची काळजी घेतली. तिला काय हवं नको ते पाहिलं. तशी काळजी तिची आई घेऊ शकेल?
बरं तिचं माहेर तसं सधन नाही. त्यात पाहिलं बाळंतपण माहेरी होणार म्हणून रजनी ताई आपल्या लेकीला घेऊन गेल्या." विदुला काकू समीरशी कमी आणि स्वतःशी जास्त बोलत होत्या.

"आई, सई माहेरी गेली आहे. कुठल्या परक्या ठिकाणी गेली नाहीय आणि आई आपल्या लेकीची काळजी घेणार नाही असं होईल का?" समीर.

"आता काय बोलावं? मला वाटतं, जसा माझ्या पोटी तू जन्माला आलास तसा सईला पहिला मुलगाच व्हावा. म्हणूनच मी तिचं इतकं कोड कौतुक केलं."

"आई, काय बोलतेस हे? ते आपल्या हातात असतं? मुलगा होऊ दे अगर मुलगी. मला आणि सईला काहीही चालणार आहे. फक्त दोघांची तब्येत नीट राहावी इतकंच." इतकं बोलून समीर ऑफिसला निघून गेला.

आईच्या मनात हे भलतचं काय सुरू आहे हे समीरला कळत नव्हतं. आई सईच्या आईचा राग राग करते हे त्याला माहिती होतं. पण विदुला काकूंना समजावण्यापलीकडे त्याने यात फारसं लक्ष घातलं नव्हतं. पण आता मुलगाच हवा या हट्टा पाठीमागे आईचा काय हेतू आहे? हे मात्र त्याला कळत नव्हतं.

"मी शिकून घर सांभाळून नोकरी केली. पै -पै साठवून संसार केला. हे घर उभारण्यासाठी मदत केली. माझ्या दोन्ही लेकरांना शिकवलं. लेकीचं लग्नही अगदी थाटामाटात करून दिलं. पण याची जाण कोणाला आहे? कोणालाही माझं कौतुक नाही. पण आता या माझ्या मोठ्या इस्टेटीचा वारस माझा येणारा नातू असेल.

तुला सांगते माया, त्या रजनी ताईंचं वागणं मला अजिबात पसंत नाही. त्यांच्या वागण्या -बोलण्यात अगदी साधेपणा आहे. जराही बडेजावपणा नाही. माणसाने कसं छान राहावं. भरपूर पैसा मिळवावा अन् आयुष्य आरामात जगावं. पण त्यांच्याकडे यातलं काहीही नाही. शिवाय त्यांचं घरही थोडकं आहे गं." विदुला काकू आपल्या बहिणीशी फोनवर बोलत होत्या.

"त्यांचा रागराग करून तुला काय मिळतं? आपलं जीवन कसं जगावं हे ज्याचं त्याने ठरवावं. मला तू म्हणतेस तसं काही वाटत नाही. रजनी ताई मनाने खूप चांगल्या आहेत आणि तुला नातू झाला काय अन् नात झाली काय..आजकाल दोन्हीही सारखंच आहे." विदुला काकूंच्या बहिणीने इतकं बोलून फोन ठेवून दिला.

क्रमशः

🎭 Series Post

View all