मुलीची आई -भाग 3 (अंतिम)

गोष्ट आईची

इकडे सई आनंदात होती. नऊ महिने नुकतेच सरले होते. आता येणाऱ्या बाळाची ती आतुरतेने वाट पाहत होती. सासुबाई तिला फोनवरून सारख्या सूचना देत होत्या. असं कर, तसं कर. हे करू नको, ते करू नको असं सांगत होत्या.

दिवस भरले आणि सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला. समीरने विदुला काकूंना फोनवरून ही बातमी कळवली. मुलगी झाली हे ऐकून मात्र त्यांचा चेहरा पडला.
"मला मुलगाच हवा होता रे. या घराचा, माझ्या मिळवलेल्या संपत्तीचा वारस.."

"आई, काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का?" समीर चिडून म्हणाला.
"बरं, तू इकडे कधी येतेस? सई कधीची तुझी आठवण काढते आहे."

"मी कशाला येऊ? सईचे आई-वडील आहेत ना तिथं? शिवाय तू आहेस. तुझे बाबाही पोहोचतीलच इतक्यात."

"आई.. कसले हे तुझे विचार? आपला मुलगा 'बाप' बनला या आनंदात तू सगळं काही विसरून धावत -पळत इकडे यायला हवं होतंस. खरंच मला कीव वाटते तुझ्या विचारांची." समीरच्या डोळ्यात पाणी आलं. गहिवरल्या स्वरात त्याने फोन ठेवून टाकला.

"समीर काय झालं?" रजनी ताई समीर जवळ येत म्हणाल्या.

"काय नाही." हे आनंदाचे अश्रू आहेत आई."

"माझ्यापासून काय लपवता? तुमच्या आई मुलगी झाली म्हणून नाराज तर झाल्या नाहीत ना? माझ्या मते तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंचं खरं कारण हेच असावं. असो, तुम्ही आनंदात आहात ना? सई आई झाली आणि तुम्ही बाबा.. याहून आणखी दुसरा मोठा आनंद कोणता असू शकतो?
मी बोलते तुमच्या आईंशी. जा तुम्ही आत. सई तुमची वाट पाहते आहे."

रजनी ताईंनी विदुला काकूंना फोन लावला.
"येताय ना इकडे? तुमची सून एका गोंडस 'मुलीची आई' झाली. जशा तुम्ही तुमच्या लेकीच्या आई आहात, अगदी तशीच. तुम्हाला जसा लेक झाल्याचा आनंद झाला होता, तसा आज माझ्याही लेकीच्या म्हणजेच तुमच्या सुनेच्या वाट्याला आला बघा. निदान आज तरी मुलीच्या आईचा राग मनात धरू नका. सई कधीची तुमची आठवण काढते आहे आणि इवलीशी नात आपल्या आजीची वाट पाहते आहे. नातीचे स्वागत करायला तुम्ही इथे हव्या आहात." रजनी ताईंनी आपले डोळे पुसले.

रजनी ताईंचे गोड, हळवे शब्द विदुला काकूंच्या मनावर परिणाम करून गेले. आपल्या नातीच्या ओढीने त्या सारं काही विसरून त्या धावत - पळत आल्या. या इवल्याशा गुलाबी रंगाच्या दुपट्यात गुंडाळलेल्या आपल्या नातीला पाहून विदुला काकूंना प्रेमाचा पान्हा फुटला. सईला प्रेमाने जवळ घेत त्यांनी रजनी ताईंची डोळ्यांनीच माफी मागितली. रजनी ताईंनीही आपल्या विहीण बाईंना मनोमन माफ करून टाकलं. कारण नातीच्या पायगुणाने आता सारं काही ठीक होणार हे यावर त्यांचा दृढ विश्वास होता तर!

समाप्त.
सायली धनंजय जोशी.

🎭 Series Post

View all