Login

मुंज्याचा प्रतिशोध ४

एकता आणि मुंज्या
मुंज्याचा प्रतिशोध

भाग ४

गावातले वातावरण तणावपूर्ण झाले होते. एकतेच्या डोळ्यांत आता निरागसतेचा प्रकाश उरला नव्हता. कधी कधी तिचे डोळे अगदी पांढरे शुभ्र होत असत. रात्री ती झोपेतून उठून अंगणभर पळायची, भिंतींवर काहीतरी खरडत बसायची, आणि कधी कधी तिच्या आवाजात नामदेवचे नाव ठामपणे घुमायचे.

गावकरी घाबरले होते. शेवटी मंदिरात सगळ्यांना एकत्र करून भुजंग महाराज म्हणाले:

“हा साधासुधा खेळ नाही. मुंज्या जर कोणी त्याच्या इच्छेनुसार वागला नाही, तर तो प्रचंड रौद्र होतो. त्याला नकार दिला की तो सूडाने पेटून उठतो. एकतेच्या शरीरावर त्याने कब्जा केला आहे, आणि जर आपण वेळेत उपाय केला नाही तर तिचे आयुष्य संपेलच, पण गावही संकटात येईल.”

चेतन अजूनही काही बोलण्याआधी नेहा रडत म्हणाली,


“महाराज, काहीही करा. माझ्या मुलीला वाचवा. तिचे जीवन आमच्यासाठी सर्वस्व आहे.”

“ मुंज्या मोक्ष विधी करावा लागेल. या विधीने आत्म्याला शांती मिळू शकते. पण यात धोका आहे. कारण नामदेवचा आत्मा खूप शक्तिशाली आणि अस्वस्थ आहे.” महाराज गंभीरपणे सांगत होते.

गावकरी घाबरून कुजबुजू लागले. त्यावेळी नेहा, एकतेची आई, पुन्हा पुढे आली.

“मी तयार आहे. जे काही करावे लागेल, आम्ही ते करू. फक्त माझ्या मुलीला या छायेतून मुक्त करा.”


त्या रात्री विधीची सगळी तयारी झाली. मंदिरासमोर तांदळाचा ढीग ठेवला होता, तेलाचे दिवे, धूपाचा वास, आणि मंत्रोच्चारांनी वातावरण भारावून गेले. गावकरी दुरून उभे राहून थरथरत सगळे बघत होते.

भुजंग महाराजांनी एकतेला मंडपात बसवले. तिच्या डोळ्यांत वेगळेच तेज होते. अचानक तिच्या ओठांवरून हसू उमटले, पण ते एकतेचे नव्हते, तिच्या तोंडातून नामदेव बोलू लागला.


“मला सोडवायचंय? मला शांत व्हायचंय? तुम्हाला कोणाला माहितीच नाही माझा मृत्यू कसा झाला ते!”

सगळ्यांच्या अंगावर काटा आला. महाराजांनी शांतपणे विचारले,


“नामदेवा, सत्य काय आहे? तुझा अपघात झाला नव्हता का?”

एकतेच्या शरीरातून येणाऱ्या त्याच्या आवाजाने वातावरण आणखीनच गडद झाले.

“नाही! मी झाडावरून पडलो नव्हतो. गावातल्या आपल्याच लोकांनी मला मारले. कारण मी एका गरीब घरच्या मुलीवर प्रेम करत होतो. त्यांनी मला ठार मारले, आणि सगळ्यांना सांगितले की हा अपघात आहे.”

गावात कुजबुज उसळली. काही वयोवृद्ध लोक लाजिरवाणे डोळे खाली घालून उभे राहिले होते.

“माझे प्रेम अधुरे राहील, माझे आयुष्य हिसकावले गेले. आता मला शांती नकोय, मला सूड हवा आहे! जोपर्यंत मी रक्ताने सूड घेत नाही, तोपर्यंत मी परत जाणार नाही!” नामदेवचा आवाज पुढे म्हणाला.


भुजंग महाराजांनी जोरात मंत्रोच्चार सुरू केले. शंखनादाने मंदिर दणाणले. पण एकतेच्या शरीरातून प्रचंड किंकाळी बाहेर पडली. तिचे केस हवेत फडफडू लागले, डोळे लाल झाले. तिने अचानक जवळच्या गावकऱ्यांवर झेप घेतली.

लोक घाबरून पळाले. काहींना धक्काबुक्की झाली. नाव घेत घेत, “एकता नाही… मी आहे… नामदेव!” असा गडगडणारा आवाज तिच्या घशातून निघत होता.

झाडाभोवती वारा भिरभिरू लागला होता. फांद्या मोडायला लागल्या होत्या. सगळे दिवे विझले गेले. गावकऱ्यांनी आक्रोश सुरु केला.

“तो शांत होत नाही आहे! तो सूड मागतोय!” कुणीतरी ओरडले.


त्या भीषण क्षणी भुजंग महाराज उभे राहिले. त्यांनी हातातला त्रिशूळ घेऊन एकतेसमोर येत ठामपणे म्हटले,

“नामदेवा! ही ती मुलगी नाही. ही निर्दोष आहे. तुझा सूड हा या गावाशी आहे, मी हिचे आयुष्य तुला घेऊ देणार नाही. तुला कोणी मारले ते आम्हाला सांग आम्ही त्याला तुझ्या समोर आणतो.

"पाटलाच्या पोराला आणा त्यानेच मला मारून टाकले होते." नेहाच्या आतून मुंज्या रागाने म्हणत होता.

महाराजांनी धीर करून मंत्र उच्चार सुरू केले. नेहा आणि चेतन भोवती भुजंग महाराजाने रक्षणकवच आखले होते. पवित्र पाणी शिडकावले जात होते. पण विधी जसजसा पुढे सरकत होता, तसतसा मुंज्याचा राग द्विगुणित होत गेला.

त्याने झाडाच्या मुळाशी उभ्या असलेल्या काही दगडी ओव्यांना फोडले. दगड तुटून हवेत उडाले. गावकरी घाबरून पळू लागले, पण महाराज म्हणाले “कोणी हलू नका! जर पळालात तर तो तुमच्यावर तुटून पडेल.”

तेवढ्यात मुंज्याने हल्ला चढवत नेहाकडे झेपावला. सर्व ओरडले, “वाचवा तिला!”


भुजंग महाराज विजेच्या वेगाने पुढे आले. त्यांनी आपले हात उंचावले आणि जोरात मंत्र चीत्कारला.


“ॐ स्वाहा!”

क्षणभर प्रकाशाचा प्रखर झोत पसरला. मुंज्या मागे फेकला गेला, पण तो डगमगला नाही. उलट त्याचा कोप अधिकच दाहक झाला. त्याने सगळ्यांना ठार मारण्याची शपथ घेतली.

“तुम्ही माझ्या सूडाचा मार्ग रोखलात, आता तुम्हा सगळ्यांना मी संपवणार!” तो गर्जला.

गावकरी पळू लागले. पण भुजंग महाराज पुन्हा उभे ठाकले. ते नेहाला आणि गावकऱ्यांना मागे हटायला सांगून पुढे सरकले.

पण या वेळी मुंज्याची सावली त्यांच्या अंगात शिरली. क्षणभर ते थरथरले, आणि मग धडामकन् जमिनीवर कोसळले.

वातावरणात विचित्र किंकाळी घुमली, आणि मग अचानक शांतता पसरली.

“महाराज…!” कुणीतरी त्यांना हलवले, पण ते निष्प्राण पडले होते. त्यांनी स्वतःचे बलिदान दिले होते.