मुंज्याचा प्रतिशोध
भाग ३
रात्र गडद होत गेली होती. गाव शांत होते, फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि वाऱ्याने हलणाऱ्या पानांचा सरसराट ऐकू येत होता. वाड्यातल्या खोलीत एकता पुन्हा पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होती, पण डोळे मिटले तरी कानात एकच आवाज घुमत होता, “एकता… चल ना… माझ्यासोबत ये…”
तिच्या स्वप्नात पुन्हा तोच मुलगा समोर उभा होता, नामदेव. चेहऱ्यावर नेहमीचेच निरागस हसू, डोळ्यांत चमक जाणवत होती.
“आज तरी मला एकटी सोडू नकोस. चल, झाडाखाली जाऊया. तिथे आपण खेळू…”तो हात पुढे करून हळू आवाजात म्हणाला,
एकता घामाघूम झाली. पण तिच्या पावलांना जणू स्वतःचा ताबा उरला नव्हता. अंधारात डोळे मिटलेले असूनही ती उठली, आवाज इतका मोहक आणि गूढ होता की तिने घरातल्या लोकांना काही न सांगता आपले पाऊल थेट बाहेर टाकले.
एकता हळूहळू पिंपळाच्या झाडाकडे चालू लागली. ते झाड गावाच्या मंदिराजवळ उभे होते, जिथे नेहमी मुलांना न जाण्याचा इशारा केला जात असे. त्या झाडाखाली जाताच तिच्या समोर सावली उभी राहिली, तो होता नामदेव.
“शेवटी तू आलीस...” त्याचा आवाज गुंजारव घेत तिच्या कानात शिरला. एकता काही बोलू शकली नाही, पण तिच्या शरीराने एकदम शिथिल व्हायला सुरुवात केली. नामदेवचा आत्मा तिच्या भोवती फिरू लागला, जणू वाऱ्याच्या झुळुकीने तिला घट्ट वेढले. अचानक ती थरथरली, डोळे मिटले आणि काही क्षणांतच तिला स्वतःचे भान राहिले नाही. ती पूर्णपणे त्याच्यात ओढली गेली होती.
पुढच्या सकाळी आईने उठून पाहिले, तर एकता खोलीत नव्हती. बिछाना रिकामा होता. तिने तात्काळ तिच्या वडिलांना उठवले. सगळ्यांनी तिला घरभर शोधले, अंगणात, गोठ्यात, घराच्या मागच्या पायवाटेवर पण ती कुठेच नव्हती.
गावभर बोंबाबोंब झाली. कुणीतरी मंदिराजवळून धावत आला आणि ओरडला,
“मुंज्याच्या झाडाखाली… त्याच झाडाखाली बसलीये ती!”
सगळे गावकरी तिथे धावले. विशाल पिंपळाच्या मुळाशी एकता बसलेली होती. तिचे केस विसकटलेले होते. तिच्या डोळ्यांखाली काळ्या रंगाची वर्तुळे जमा झाली होती. तिच्या ओठांवर हलके चमत्कारिक हसू होते. ती जमिनीत तिथलीच एक काडी उचलून काही विचित्र वर्तुळे काढत होती. कुणी तिला हालवायचा प्रयत्न केला तर ती अचानक हिसका देऊन परत शांत बसून जायची. हा प्रकार पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला.
चेतनने तिला हलवून विचारले,
“एकता! इकडे कशी आलीस? रात्री बाहेर का निघालीस?”
पण तिने काही उत्तर दिले नाही. ती पुटपुटत होती, जणू कुणाशी तरी गप्पा मारत आहे असे वाटत होते.
“हो, हो… मी आली आहे… तुझ्यासाठी… आता तुला सोडणार नाही…”
गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला.
त्या दिवसानंतर एकतेचे वागणे वेगळेच झाले होते. ती वारंवार स्वतःशीच बोलू लागली होती. रात्री झोपेतून उठून अंगणात फिरायची. कधी जमिनीवर भेसूर चिन्हे काढायची, वर्तुळे, त्रिकोण, आणि तिला समजतही नसलेल्या आकृत्या त्यात असायच्या. तिचा आवाज कधी स्त्रीसारखा, कधी गंभीर पुरूषी होत असे, पण नंतर तिला त्याबद्दल काहीच आठवायचे नाही.
आई घाबरली होती, पण चेतन अजूनही म्हणत होता,
“हे सगळे मानसिक आहे. कदाचित गावाच्या अंधश्रद्धा तिच्या मनात भरल्या आहेत, आपल्याला तिला एखाद्या मानसोपचार तज्ञा कडे नेले पाहिजे.”
पण गावात कुजबुज सुरु झाली होती, “मुंज्याचा प्रभाव आहे हा.”
नेहाला काय करू काय नको असे वाटत होते. तिने शेवटी चेतनचा रोष पत्करून एकताला गावच्या मंदिरात ती घेऊन आली. तिथे राहणारे वृद्ध पुजारी, भुजंग महाराज, यांनी तिच्या डोळ्यांत खोलवर पाहिले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाले,
“ही साधी गोष्ट नाही. मुलीवर नामदेव मुंज्याचा प्रभाव झालेला आहे, त्याने तिला झपाटलेले आहे.”
“हे काय गुरुजी ? आजच्या काळात अशी अंधश्रद्धा? ती फक्त झोपेत चालते, इतकेच.”
“चेतनराव, तुमचे शिक्षण मोठे आहे, पण या भूमीवर काही शक्ती आहेत ज्या तुमच्या विज्ञानाच्या पलीकडे आहेत. ही मुलगी नामदेवला दिसतेय, त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसारखी.” भुजंग महाराज शांतपणे म्हणाले.
सगळे थबकले.
महाराजांनी हळूवार सांगायला सुरुवात केली,
“नामदेव लहान होता तेव्हा गावातल्या एका मुलीशी स्मिताशी त्याचे मन गुंतले होते. ती त्याची बालसखी होती. त्याचे लग्न देखील तिच्याशी ठरले, पण नशिबाने त्याला ती मिळाली नाही. लग्न ठरण्याआधीच तो मेला. त्या अपूर्ण इच्छेनेच तो मुंज्या बनून या झाडाला बांधला गेला आहे. आणि आता… या मुलीत त्याला त्याचीच स्मिता दिसत आहे.”
“पण … एकतेला का त्रास देतोय तो?” नेहाच्या डोळ्यात अश्रू आले.
“त्रास नाही… तो तिला परत खेचतोय. त्याला वाटते तीच स्मिता आहे, जी त्याच्यासाठी परत आली आहे. आता त्याला त्याचा अपूर्ण बंध पूर्ण करायचा आहे. म्हणूनच तो तिच्या शरीरात प्रवेश करू लागलाय.” महाराज गंभीरपणे म्हणाले.
आजूबाजूचे सगळे कुजबुज करू लागले. कुणी घाबरले, कुणी राम राम करून देवाची प्रार्थना करू लागले .
चेतन तिला सगळ्यांसमोरून उचलून घेऊन गेला आणि गावाच्या बाहेर घेऊन जाऊन डॉक्टरांकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण अचानक पाऊस सुरु झाला. जोगवाडी आणि रत्नागिरी या दोघांना जोडणारा नदीवरील पूल पत्त्यासारखा घसरून पडला. आता चेतनला नवीन काही साधन मिळेपर्यंत जोगवाडीत राहणे क्रमप्राप्त होते.
त्या रात्री पुन्हा एकता झोपेत उठली. या वेळेला तिने कागदावर वेडसर अक्षरे काढली. तोंडातल्या तोंडात पुटपुटत राहिली.
“मी तुझी आहे… सदैव…”
चेतन अजूनही वास्तव मान्य करायला तयार नव्हता. पण गावात मात्र खात्री झाली होती मुंज्याने एकतेला झपाटले आहे.
“ही मुलगी नामदेवच्या सावलीत अडकली आहे. तो तिला आपल्या अपूर्ण प्रेमाची पूर्णता समजतोय. जर वेळेत उपाय केला नाही तर तिचे आयुष्य धोक्यात येईल.” मंदिराचे पुजारी भुजंग महाराज म्हणाले.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा