Login

मुंज्याचा प्रतिशोध ५ अंतिम भाग

एकता आणि मुंज्या
मुंज्याचा प्रतिशोध

भाग ५ अंतिम भाग

इंदापूरातील त्या छोट्याशा जोगवाडीत अजूनही लोकांच्या चेहऱ्यावर भयाचे सावट होते. भुजंग महाराजांच्या आत्मत्यागानंतर गावकरी काहीसे धास्तावले होते, पण त्यांचे मनही जड झाले होते. एकेकाळी दैवी छायेत वावरणाऱ्या त्या पिंपळाच्या झाडाकडे आता कुणाचाच पाय वळत नव्हता. मात्र चेतन आणि एकता मात्र शांत बसणार नव्हती.

त्या रात्री तिच्या स्वप्नात पुन्हा नामदेव दिसला. 

"तूच मला मुक्त करशील… सत्य सांगशील…" तोच आवाज तिला वारंवार ऐकू येत होता.

सकाळीच एकता उठली आणि वडिलांना चेतनला म्हणाली,
“बाबा, मला त्या झाडाजवळ जायलाच हवे. मीच या सर्वाचा शेवट करणार आहे. जोवर सत्य उघड होत नाही, तोवर हा मुंज्या शांत होणार नाही.”

चेतन थोडा घाबरला होता. “एकता, पुन्हा तिथे जाणे म्हणजे वेडेपणा आहे. तेथे काय होईल कुणास ठाऊक?” पण एकता ठाम होती.

त्या रात्री गाव शांत झाले होते. फक्त झाडाच्या फांद्यांवरून येणारा वारा आणि घुबडांचे आवाज ऐकू येत होते. एकता हळूहळू त्या झाडाकडे गेली. आकाशात चंद्र काळ्या ढगांमध्ये हरवून गेला होता.

पिंपळाच्या मुळाशी उभी राहिली तशी झाडाच्या पानांत जोरात सळसळ झाली. जणू कुणीतरी तिचे नाव पुन्हा पुन्हा उच्चारत होते,

“एकता… एकता…”

क्षणात तिच्या भोवती एक थंड सावली पसरली. नामदेवाची आकृती झाडाच्या मुळाशी उमटली.


“का मला इतके थांबवलेस? माझ्या रक्ताचा सूड अजून बाकी आहे,” तो गुरगुरला.


“नामदेवा, मला सत्य सांग. अपघात नव्हता म्हणतात… तुझ्या मृत्यूचं खरं कारण काय आहे?” एकता थरथरत म्हणाली.

नामदेवचा आवाज कापरा होत गेला.

“माझे लग्न ठरले होते… पण जिच्यावर माझे मन जडले होते, तिच्यावर या गावच्या एका घराण्याची सुद्धा नजर होती. तिला मिळवण्यासाठी… त्यांनी मला संपवले.”

एकतेच्या अंगावर शहारा आला.


“कोण… कोण करते असे?”

तेवढ्यात पानांची आणखी जोरात सळसळ झाली. झाडाच्या मागून काही गावकरी आले. त्यातच होता पाटलांचा मुलगा, लक्ष्मण. तो नुकताच केरळ राज्यातून आला होता. गावाच्या बाहेर राहून देखील तो नेहमीच ‘गावाचा कर्ता’ मानला जात होता. पण नामदेवाचा आत्मा आता जणू त्याच्याकडे बोट दाखवत होता.

एकताने हे गावकऱ्यांना सांगताच लक्ष्मण गडबडला, “हे खोटे आहे! ही मुलगी खोटे पसरवत आहे!”


“लक्ष्मणा, सत्याला पळता येत नाही. तूच नामदेवाचा घात केला होतास, नाही का? तुझ्या मनात नामदेवाची होणारी बायको भरली होती आणि त्यापोटीच तू त्याला मारून पिंपळाच्या झाडाखाली फेकून दिलेस!”  एकता धाडसाने पुढे आली.

गावकरी थबकले. श्वास रोखून त्यांनी लक्ष्मणाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम आणि डोळ्यातली भीतीच पुरावा होती.

क्षणातच मुंज्या उसळला. लालसर धुराच्या वावटळीतून तो लक्ष्मणावर झेपावला.


“माझे रक्त व्यर्थ जाणार नाही!”

लक्ष्मण किंचाळला. त्याचे शरीर थरथर कापू लागले. काही क्षणांत त्याचे दोन्ही पाय जड झाले. तो जमिनीवर कोसळला. गावकरी घाबरून मागे सरकले.

“यापुढे आयुष्यभर तू या जमिनीवरून उभा राहू शकणार नाहीस,” नामदेवचा आवाज गर्जला.
लक्ष्मण ओरडत राहिला, पण त्याचे पाय कायमचे बधिर झाले होते.


“नामदेवा… तुझा सूड पूर्ण झाला आहे. आता तू शांत हो… मुक्त हो…”एकता अश्रू गाळत म्हणाली.


“माझ्या अन्यायाचा पर्दाफाश तुझ्यामुळे झाला. आता मी विसावतो.”

अचानक एक प्रचंड गडगडाट झाला. पिंपळाच्या फांद्या वादळासारख्या हादरू लागल्या. काळ्या धुरात नामदेवाची सावली हळूहळू विरून गेली. झाडाच्या खोडावर भेगा पडल्या, आणि एका क्षणात संपूर्ण झाड निखाऱ्यासारखे जळून गेले.

गावकरी थरथरत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांसमोर पीपळाचे झाड राखेत परिवर्तित झाले होते. जणू त्या ठिकाणचा  वर्षानुवर्षांचा शाप आज संपुष्टात आला होता.

काही दिवसांनी एकता गाव सोडून निघून गेली. तिच्या जाण्याच्या वेळी गावकरी डोळ्यांत पाणी घेऊन उभे होते. पीपळाचे झाड आता उरले नव्हते, पण त्याची राख अजूनही जमिनीतून धुरकट वास सोडत होती.

गावाच्या पोरांना, शेतकऱ्यांना, आणि येणाऱ्या पिढ्यांना तो मुंज्याचा किस्सा सांगितला जाऊ लागला.

नामदेवाचा आत्मा, त्याचा सूड, आणि एकताचा त्याला दिलेला शेवटचा न्याय.


 समाप्ती

भालचंद्र नरेंद्र देव
0

🎭 Series Post

View all