Login

मुंज्याचा प्रतिशोध १

एकता आणि मुंज्या
मुंज्याचा प्रतिशोध


भाग १

"हय पिंपळाच्या झाडाखाली बसा नको, हय मुंज्या असतत" एकताला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले पाहून एक वृद्ध शेतकरी ओरडत ओरडत तिला तेथे बसू नको म्हणून लांबूनच उभा राहून बोलत होता.

उन्हाळ्याच्या सुट्टीत, चौदा वर्षांची एकता तिच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या मूळ गावी कोकणातल्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये लपलेल्या एका इंदापूरच्या जोगवाडीत आली होती. शहरात वाढलेल्या एकतेसाठी हे सगळे नवीन होते, खारट वारे, वाहणारा तुफान वारा, मोकळ्या शिवारात गाजणाऱ्या झाडांची सळसळ, आणि ओल्या मातीचा मोहक वास मन मोहवून घेत होता. तिचे वडील चेतन यांचा आग्रह होता की, "मुलांनी गावातल्या मुळाशी जोडून राहायला हवे." आईलाही आपल्या माहेरच्या आठवणींनी पाय खेचले होते. त्यामुळे तिघे मिळून खूप वर्षांनी गावात आले होते.

जुना, पण विशाल असा त्यांचा पिढीजात वाडा उघडण्यात आला होता.वाड्याचे जाड दरवाजे चर्रकन् उघडले तेव्हा अंगणात पसरलेल्या तुळशीच्या कुंड्यांनी, कोपऱ्यातील जुन्या पितळी दिव्यांनी, आणि धुरकट छपरातून झिरपणाऱ्या सूर्यकिरणांनी एक वेगळीच ओढ निर्माण केली. एकता या सगळ्या नव्या अनुभवात हरवून गेली होती.

संध्याकाळी वडील म्हणाले,
“चल, गावच्या मंदिरात दर्शन घेऊन येऊया. तुझ्या आजोबांचे, पणजोबांचे पिढ्यानपिढ्यांचे हेच देवस्थान आहे.”

गावचे मंदिर डोंगरउतारावर, दगडी पायऱ्यांच्या टोकाशी होते. सभोवताली मोठमोठ्या वृक्षांची दाट सावली पडलेली होती. मंदीराच्या गाभाऱ्यात बसलेल्या दगडी देवतेच्या समोर एकतेला शांतता जाणवली. ती आई-वडिलांसोबत नमस्कार करताना नकळतच त्या सुंदर वातावरणात गुंतली.

मंदिरातून बाहेर पडल्यावर ते शेजारच्या भव्य पिंपळाच्या झाडाखाली थोडावेळ थांबले. विशाल फांद्यांवर लटकलेल्या पारंब्या, पानांतून येणारा वाऱ्याचा आवाज, आणि सावलीत दाटून आलेली संध्याकाळ, सगळे काही जणू गावात आलेल्या एखाद्या मुंबईकरासाठी हवेहवेसे होते.

पण त्याच वेळी काही गावकरी तिथून जात होते. त्यांनी चेतनच्या कुटुंबाकडे पाहून कुजबुज सुरू केली. शेवटी त्यातील एक वयोवृद्ध शेतकरी लांबूनच थोडा घाबरल्यागत म्हणाला,


“चेत्या, तुझे शिक्षण शहरात झालंय, म्हणजे तू मोठा शहाणा झाला आहेस असे नाही. एक सांगतो, या झाडाखाली जास्त वेळ बसू नको. हे झाड साधे नाही. इथे मुंज्या वावरतो.”

चेतन भुवया उंचावत हसला,
“अहो, तुम्ही अजूनही या जुन्या समजुतींवर विश्वास ठेवता? मुंज्या फुंज्या काही नसतो. फक्त अंधश्रद्धा आहे ती. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना घाबरवायला सांगतात लोक, असे काही भूतपिशाच्च नसते कुठे!" ”

वृद्ध थोडा गंभीरपणे म्हणाला,


“तू नाही मानत, हे खरे. पण गावातले आम्ही सगळे मानतो. कारण आम्ही त्याचे अनुभव घेतले आहेत. लग्न होण्याआधी मेला त्या मुलाचा आत्मा… अविवाहित राहिलेल्या पोरांचे आत्मे मुंज्या बनतात. रात्री या झाडाखालून कोणी गेले की परत फिरून येत नाही. इथल्या आवाजांनी, कुजबुजांनी ते आकर्षित होतात…सुंदर मुलींना तो आपल्यासोबत खेळायला घेऊन जातो, सावध राहा एवढंच सांगतो, नाहीतर तुझ्या मुळे गावाला त्रास नको, आला आहेस तर चार दिवस नीट राहा.”

चेतनने हसून खांदे उडवले. एकता मात्र कान टवकारून ऐकत होती. तिच्या मनात भीती आणि कुतूहल जागे झाले होते.

"आई कोण ग मुंज्या?" तिने तिच्या आईला नेहाला विचारले.

नेहाने जरा गोंधळून पहिले , पण तिने एकताची समजूत काढली, "एकता, तू या गोष्टी खूप मनावर घेऊ नकोस बरं का. तुझ्या बाबांना माहिती आहे, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत."

गावकरी एकमेकांकडे बघत कुजबुजले आणि शांतपणे निघून गेले. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता एकतेच्या नजरेत सुटली नव्हती.

त्या रात्री वाड्यात एकतेला झोप पटकन आली नाही. दिवसभरच्या थकव्यामुळे सगळे गाव शांत झोपले होते, पण एकतेच्या मनात पिंपळाच्या झाडाची प्रतिमा सतत झळकत होती. त्याच्या पारंब्या तिच्या डोळ्यासमोर फिरत असताना दिसत होत्या. तिने खिडकीतून बाहेर डोकावले. काळोख्या रात्री आकाशात चंद्रकिरणांनी गावाला एक उजेड दिला होता.

एकता दचकली. तिला हलका, कुजबुजेसारखा आवाज ऐकू आला,

“ये… ये इकडे… झाडाजवळ…”

ती उठून बसली. आवाज कोणीतरी बाहेरून बोलावत असल्यासारखा वाटत होता. सुरुवातीला तिला वाटले कदाचित तिचा भ्रम असेल, पण नंतर तिला पावलांचे हलके आवाज ऐकू येऊ आले. जणू कोणीतरी खिडकी जवळ घुटमळत होते.

“ये, पुन्हा खेळायला ये. मी वाट बघतोय.”एकताने डोळे मिटून घेतले आणि तिला पुन्हा त्या पिंपळाचे दृश्य डोळ्यासमोर दिसले. तिला त्या झाडाकडे जाण्याची खूप तीव्र इच्छा झाली. ती दचकून उठली. तिला खूप घाम फुटला होता. तिने आपल्या आई-वडिलांना उठवले आणि त्यांना लगेच कळले कि ती घाबरलेली आहे.

“काय झाले गं एकता? का घाबरलीस एवढी?” नेहाने तिला विचारले. एकताने घाबरत घाबरत तिला आणि तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले.

“मला भीती वाटली, आई. मला वाटते की तो मुंज्या माझ्याकडे आला होता,” ती म्हणाली.

चेतनने एकताला समजावून सांगितले, “एकता, हे सर्व तुझ्या मनाचे खेळ आहेत. तू उगाच त्या म्हाताऱ्या लोकांच्या बोलण्याने घाबरून गेली आहेस. तसे काहीही नसते. तू आता झोप. सकाळी आपण पुन्हा त्या मंदिराकडे जाऊ आणि त्या झाडाखाली बसू. मग तुला कळेल की तिथे काहीही नाही ते,” तो म्हणाला.