Login

मुंज्याचा प्रतिशोध २

एकता आणि मुंज्या
मुंज्याचा प्रतिशोध


भाग २

सकाळी एकता थोडी गोंधळलेली होती. रात्रीचे कुजबुजणारे आवाज, आणि वाऱ्यातून येणारे ते आमंत्रण तिच्या मनात अजूनही ताजे ताजे होते. ती आईला काही सांगू पाहत होती, पण शब्द सुचत नव्हते.

नाश्त्याच्या वेळी चेतन म्हणाले,

“एकता, काल गावातले लोक काहीतरी मुंज्याबद्दल सांगत होते. तुला त्यानेच घाबरवून टाकले असेल?”

एकता थोडी दचकल्यासारखी झाली. तिने काही बोलायच्या आधीच चेतन पुढे म्हणाले,

“काल रात्री म्हटल्याप्रमाणे आज दुपारी आपण परत त्या पिंपळाच्या झाडाकडे जाऊ. तुला दाखवतो की ते फक्त एक साधे झाड आहे. लोकांच्या अंधश्रद्धा एवढ्याच आहेत. तू शाळे जातेस ना? विज्ञानाच्या प्रकाशात हे सगळे काही खरे नसते.”

आईने थोडं संकोचाने पाहिले, पण चेतन हट्टाला पेटले होते.


दुपारी सूर्य डोक्यावर आला तसा ते तिघे पुन्हा मंदिराच्या दिशेने निघाले. मंदिर शांत होते, पण पिंपळाचे झाड नेहमीसारखे भव्य आणि दडपण आणणारे भासत होते.

चेतन हसत म्हणाले,
“बघ नीट बघ? काही भूत-प्रेत आहे का? फक्त सावली, वाऱ्याची सळसळ कळते आहे. या सगळ्या गावंढळ लोकांच्या कल्पना आहेत.”

एकता मात्र झाडाकडे एकटक बघत होती. जसजशी ती पुढे गेली तसतशी पाने सरसरू लागली. जणू तिच्या प्रत्येक पावलावर झाड प्रतिसाद देत होते. चेतन मात्र ते वाऱ्याचे खेळ मानून हसत होते.

पण एकतेला स्पष्ट ऐकू आले, हलकेसे कुजबुजणे. कोणीतरी तिला नावाने हाक मारत होते.

“एकता… एकता…”

ती थबकली. श्वास अडकून राहिला. पण वडील काहीच न ऐकल्यासारखे उभे होते. ते अजूनही म्हणत होते,


“हे बघ, मी झाडाच्या फांद्या हलवतो, आवाज होतो. इतकंच.”

एकतेच्या मनात मात्र भीती आणि ओढ दोन्ही दाटत होती. तिला वाटत होते की त्या झाडातले कोणीतरी तिला ओळखत आहे.


त्या संध्याकाळी गावातल्या अंगणात बसलेली एकता विचारांत गुंतली होती. तिथेच तिच्या वयाचा एक मुलगा तिला दिसला. काळसर वर्ण, डोळ्यात खट्याळ चमक, आणि हातातमध्ये गोफण फिरवत होता.

“हाय, मी महेश. तू शहरातून आलीयस ना?” त्याने सहज विचारले.

एकताने मान हलवली.

“हो, सुट्टीसाठी. पण… इथे सगळे त्या झाडाबद्दल बोलतात. तिथे मुंज्या आहे असे म्हणतात.”

महेश थोडा गंभीर झाला.


“ते सगळे खरे आहे. तुला कोणी नीट सांगितले नाही का?”

“नाही, फक्त त्या दिवशी एक आजोबा सांगत होते. पण… नक्की खरे काय आहे?”

महेश जवळ येत कुजबुजला,


“तो नामदेव होता. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट, त्याचे लग्न ठरले होते, पण लग्नाच्या आधीच तो अचानक हरवला. दोन दिवसांनी त्याचा मृतदेह त्या पीपळाच्या झाडाखाली पडलेला मिळाला. कोणी म्हणतात तो झाडावरून पडला, कोणी म्हणतात कोणीतरी त्याला मुद्दाम मारले. पण खरी गोष्ट कुणालाच ठाऊक नाही. लग्नाआधी मरलेल्या मुलाचा आत्मा मुंज्या बनतो म्हणतात. आणि कदाचित नामदेव देखील अजूनही त्या झाडाखाली वावरतो.”


एकता अंगावर शहारे आलेल्या अवस्थेत ऐकत होती.

“म्हणजे तो… खरंच आहे?” एकताने भीतीने विचारले.

“मी काही पाहिले नाही. पण अनेकांनी आवाज ऐकले आहेत. नावाने हाक मारताना ऐकू येते असे म्हणतात.” महेशने खांदे उडवले.


एकता अजून घाबरली. तिच्या मनात गोंधळ वाढत होता. महेश तिला त्या मुंज्याच्या गावातील गोष्टी रंगवून रंगवून सांगत होता. तिला वाटले की महेशच्या गोष्टीतली प्रत्येक गोष्ट खरी आहे.


रात्री एकता गाढ झोपेत गेली होती. पण झोप गडद होताच तिला एक स्वप्न दिसू लागले. धूसर प्रकाशात एक मुलगा तिच्यासमोर उभा होता. साधी चड्डी, डोळ्यांत निरागस चमक, आणि ओठांवर हसू असा त्याचा वेष होता.


“एकता… माझ्याशी खेळशील? मला मित्र हवे आहेत. चल, खेळू या…” तो मुलगा हात पुढे करत म्हणाला,

एकता घाबरून मागे सरकली. पण त्याचा आवाज मधुर वाटत होता. जणू कुणीतरी फार काळ एकटे राहिले आहे आणि आता त्याला कोणीतरी खेळायला मिळाले आहे. ती झटकन जागी झाली. घामाने पूर्ण भिजलेली होती. खोलीत अंधार होता, पण तिला अजूनही त्या मुलाच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येत होता.

“चल, खेळू या…”

या वेळी तिने आई वडिलांना सांगणे टाळले, कारण तिला माहित होते की तिचे वडील पुन्हा तिलाच वेड्यात काढतील.


दुसऱ्या दिवशी सकाळी ती गावाच्या ओसरीवर बसून होती. तेव्हा महेश तिला रानातले आंबे द्यायला आला.


“काय झाले ? तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळे दिसतंय.”


“महेश… नामदेव कसा होता माहितेय का तुला? म्हणजे… दिसायला वगैरे?” एकताने संकोचाने विचारले,

महेशने डोळे बारीक केले.


“लोक म्हणतात तो बारीकसा, काळसर वर्णाचा मुलगा होता. नेहमी हसतमुख असायचा पण गावच्या पाटलाच्या पोराशी त्याचे पटायचे नाही.

एकतेचा श्वास अडकला. कारण काल रात्रीच्या स्वप्नात तिला दिसलेला मुलगा अगदी तसाच होता.

आता तिच्या मनात का कुणास ठाऊक एक अनामिक ओढ सुरू झाली होती. कधी झाडाजवळून वारा आला तरी तीला तिचे नाव ऐकू यायचे. तिचे वडील मात्र अजून मुंज्याचा विषय आला कि जोरात हसत सुटायचा, “हे सगळे भ्रम आहे, एकता. विज्ञानाने याला कधीच खोटे ठरवले आहे.”

पण एकतेला माहित होते तिचे अनुभव हे सगळे खरे आहे हे दर्शवत होते. त्या झाडाशी, त्या आवाजाशी, आणि त्या मुलाशी देखील तिचा काहीसा गूढ संबंध आहे असे तिला वाटू लागले होते.


त्या रात्री तो मुलगा तिचा हात धरून म्हणाला,


“एकता, मला एकटे सोडू नकोस. माझ्यासोबत खेळायला चल…” आणि झाडाच्या सावलीत त्याचा चेहरा धूसर होत गेला.

एकता दचकून जागी झाली. तिच्या मनात प्रश्नांचा गुंता सुरु झाला होता, हे फक्त स्वप्न आहे की तो मुलगा खरंच मला बोलावत आहे?