Login

मूर्ख पाणीपुरीवाली !

.
संध्याकाळचा प्रहर होता. जान्हवी आणि भावना आनंदात घरी परतत होत्या.

" आज कोर्टात जितका आनंद झाला तितका तुझ्या लग्नातपण झाला नव्हता. " भावना म्हणाली.

" लग्न केलंच होते मी याचसाठी. आता नवऱ्याचे पैसे उधळत मस्तपैकी जगणार आहे. " जान्हवी म्हणाली.

" आणि बाळ ?"

" बाळ तर एटीएम मशीन आहे माझ्यासाठी. त्याला माझी आई सांभाळेल. "

" चल ना. इसी बहाणे पाणीपुरी खाऊ. "

" काय यार तू. मला उद्यापासून एवढी मोठी एलीमोनि मिळणार आहे आणि तू मिडल क्लाससारखं पाणीपुरी खायच्या गोष्टी करत आहेस. "

" प्लिज प्लिज. "

दोघीही पाणीपुरी खायला गेल्या. तिथे एक स्त्री पाणीपुरी विकत होती. बाजूला तिचा नवरा व्हील चेअरवर बसला होता. त्याला अर्धांगवायू झाला होता. जान्हवी आणि भावनाने मनसोक्तपणे पाणीपुरी खाल्ली.
जान्हवीला त्या पाणीपुरी विकणाऱ्या स्त्रीचे कुतूहल वाटले.

" काय ग तू एकटीच पाणीपुरी विकते ?"

" ताई माझ्या नवऱ्याची अवस्था तुम्ही पाहतच आहात. म्हणून मी एकटीच पाणीपुरी विकत आहे. "

" तुला तुझ्या नवऱ्याला सांभाळावे लागते आणि पैसेही कमवावे लागतात ?"

" हो. "

" मूर्ख आहेस तू. या नवऱ्याला सोडून का नाही देत ? एखादा श्रीमंत माणूस पकड. त्याच्यासोबत लग्न कर. त्याचे पैसे उधळत आरामात आयुष्य जग. आणि कुणी लग्न करत नसेल तर गर्लफ्रेंड म्हणून रहा. तारूण्य जगातल्या सर्व सुख सुविधा उपभोगण्यासाठी असते. या अपंग नवऱ्याची सेवा करून काय मिळणारे ? जो स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही तो तुला काय सुख देणारे. "

" ताई , माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करायचा. पण आमच्या सुखी संसाराला कुणाची तरी दुष्ट लागली. ह्यांचा अपघात झाला. आता ह्यांना माझी सर्वात जास्त गरज आहे तर मी त्यांना एकटे सोडू ? मी इतकी स्वार्थी होऊ शकत नाही. "

" हेच चुकते आपल्या भारतीय स्त्रियांचे. आपण त्याग खूप करतो. स्वतःचा विचार करत नाही. मी एका उद्योगपतीला स्वतःच्या जाळ्यात अडकवले. काळा होता दिसायला. मला अजिबात आवडत नव्हता पण मी प्रेमाचे नाटक करत राहिले. आता आमचं एक बाळ होताच मी त्यांना घटस्फोट दिला. पोटगी म्हणून मला भरपूर रक्कम मिळेल. मी तर डोमेस्टिक व्हायलन्सची खोटी केस पण टाकली होती त्याच्यावर. ती मागे घेण्याची वेगळी रक्कम वसूल केली. याला म्हणतात डोकं वापरणे. "

पाणीपुरी विकणारी स्त्री हसली.

" ताई , तुम्ही सुशिक्षित लोकं. मी गावातली साधी बाई. मला लग्नात आईने म्हणले मन लावून संसार कर. पत्नीचे सर्व कर्तव्य पूर्ण कर. तेच करत आहे. पै पै जोडत आहे. लवकरच मी माझ्या नवऱ्याचे उपचार करेल. त्यांना परत आधी सारखे बनवेल. "

जान्हवीने पेमेंट केले.

" चल भावना , या मूर्ख पाणीपुरीवालीला "सावित्री" बनण्याचा शौक आहे. पाणीपुरी विकण्याचीच लायकी आहे हिची. " इतके बोलून जान्हवी तिथून निघाली.

पाणीपुरी विकणाऱ्या स्त्रीच्या पतीला आपल्या पत्नीचा अभिमान वाटला.

©®पार्थ धवन
0