Login

दोन संग्रहालये (म्युझियम्स)

संग्रहालयांची माहिती
*आगळळीवेगळी दोन संग्रहालये*

ज्यांना फिरायला आवडते, त्यांच्यासमोर तशा संधी आणि ठिकाणे आपोआपच समोर येतात, असे मला वाटते.
मी त्यातलीच एक भाग्यवान आहे.
नोव्हेंबर महिन्यात योगायोगाने दोन म्युझियम बघण्याचा योग आला.
एक होते मुंबईतील सीएसटी स्टेशनजवळचे "पॅराडाॅक्स म्युझियम" आणि दुसरे पुण्याजवळचे " अभय प्रभावना म्युझियम".
अर्थाअर्थी या दोघांचा काहीही संबध नाही एक निखळ मनोरंजन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खेळ तर दुसरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जैन संस्कृती आणि तत्वांची भव्यदिव्य ओळख करुन देणारे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हादोघांमधील समान दुवा म्हणावे लागेल.

पॅराडाॅक्स म्युझियम

मुंबईच्या सीएसटी स्टेशन समोर असणारे हे म्युझियम म्हणजे नजरेचं पारणे फिटवणारे आहे .
दुबई सारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये अशी अनेक म्युझियम्स असतील.आता हळूहळू आपल्या भारतातही ती होत आहेत.
दोन तासाची एक छोटीशी गंमत, या म्युझियममध्ये अनुभवता येते. मला तरी त्याचे सकाळी बारापर्यंत सहाशे, आणि बारानंतर सातशे रुपये तिकीट आहे ते योग्य वाटले मतमतांतरे असू शकतात.
अवकाशात फिरणे ,उलटे सुलटे चालणे, आरशांचे खेळ, आणि अनेक नजरेचे भ्रम इथे आहेत.
आपले फक्त डोके दिसणे, एका ठिकाणी आपले पाय वेगळे आणि आपले तोंड वेगळीकडे दिसणे, आरशात आपल्या दोन प्रतिमा दिसणे ,असंख्य प्रतिमा दिसणे, स्वतःच्या चार प्रतिमांशी बुद्धिबळ खेळणे, एकंदरीत सारी गंमत जंमत फक्त या म्युझियमला जाण्यासाठी त्यांचे इंस्टाग्राम वरचे रील बघून जावेत, म्हणजे आपण कसे फोटो काढायचे हे कळते.
बाकी फार काही लिहिता येण्यासारखे नाही,अनुभवण्यासारखेच आहे, पण मुंबईला गेलात किंवा मुंबईला असला तर हे म्युझियम एकदा तरी अवश्य बघण्यासारखे आहे.

दुसरे पुण्याजवळ इंद्रायणी काठी वसवण्यात आलेले "अभय प्रभावना म्युझियम"
प्रत्येक जैन व्यक्तीला जैनधर्मासंबधी असे म्युझियम असल्याचा अभिमान वाटावा.
सुरुवातीला पूर्ण म्युझियम बघण्याचे तिकीट अडीच हजार रुपये म्हटल्यावर दडपण आले, परंतु त्यामध्ये साडेसातशे ,पंधराशे आणि अडीच हजार असे तीन पर्याय आहेत.
पूर्ण म्युझियम बघितल्यास अडीच हजार रुपये तिकीट आहे.
आमचे एक स्नेही या म्युझियमच्या उद्घाटनाला गेले होते आणि त्यांनी एवढं महाग तिकीटही योग्य आहे, अशी ग्वाही दिली आणि तरीही थोडे घाबरतच आम्ही दीड हजाराची तिकीट काढली.
तिथे गेल्यावर मानस्तंभा मध्ये चढून जायचे असल्यास शंभर रुपये भरून ॲआॅन करता येणार होते, त्यामुळे आम्ही शंभर रुपये भरुन तिकीट घेतले.
182पायर्‍या चढुन गेल्यावर म्युझियमचा पूर्ण परिसर दिसतो ,पण फार काही विशेष वाटले नाही.
आम्ही ज्या तीन गॅलरी आणि ओपन परिसर बघितला, मानस्तंभ बघितला अगदी त्याला पैशांचे चीज झाले म्हणता येईल,एवढे तिकीटही योग्यच वाटले. उलट आपण अडीच हजार वाले तिकीट काढून उरलेली चौथी गॅलरी ही बघायला हवी होती ,अशी रुखरुख परततांना लागली.
अतिशय रम्य असा परिसर ,भव्य दिव्य
डोळ्यांना सुखावणारी हिरवळ, हाय टेक टेक्नॉलॉजी, अतिशय स्वच्छता.
मुख्य म्हणजे आत मध्ये गॅलरीमध्ये कुठेही फोटो काढायला परवानगी नाही. फक्त अनुभवा.
बाहेरच्या मोकळ्या परिसरात मात्र फोटो काढता येणार होते, तेवढे फोटो काढायला मिळाले तरी, आम्ही भरून पावलो.
म्युझियम मध्ये खरोखरच फोटो काढण्यापेक्षा, ते सर्व आपलं जैन तत्त्वज्ञान आणि संस्कृती अनुभवणे,हा खूप समृद्ध करणारा अनुभव होता.
फक्त हे म्युझियम फिरताना, आपण आपल्या मनातील फक्त जैन असण्याचा आधार घ्यावा.
श्वेतांबर, दिगंबर,स्थानकवासी, सगळ्यांचे वेगळे तत्त्वज्ञान याचा विचार करत बसू नये.
सत्य ,अहिंसा,अचौर्य,अपरिग्रह,अनेकांतवाद,स्याद्वाद,
सम्यकदर्शन,सम्यकज्ञान,सम्यक चारित्र्य,यांची ओळख इथे होते.
ध्यानाचा अनुभव आहे.
आहारविहार शैलीचे मार्गदर्शन आहे.
मोकळ्या परिसरात अनेक जैन तीर्थांच्या प्रतिकृती आहेत.
फुलवलेली अप्रतिम बाग आहे.
गंगा,यमुना,सरस्वतीच्या पाण्याचे कुंभ ओतणार्‍या मुर्त्या आहेत.
चार दिशांना महावीर, नेमिनाथ, पार्श्वनाथ,महावीर अशा सुरेख मुर्त्या आणि समोर विस्तिर्ण तळे आहे.
या परिसरात पुढे मागे एखादा जैनियांसाठीचा लाईट म्युझिक शो असेल तर किती छान होईल, असे वाटले.
अर्थातच तसा अभिप्राय आणि सूचना देऊन आलो आम्ही.
राहिलेल्या गॅलरीत काय असावे याची उत्सुकता आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा मी जाईनच.

इथे जातांना लक्षात ठेवायच्या गोष्टी-

इथे बारा वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही.
सकाळी साधारणतः दहा वाजता पोहोचावे. परतायला संध्याकाळी पाच वाजतातच. एवढे सगळे बघण्यासारखे आहे .
खायला आत मध्ये काहीच नेता येत नाही. अगदी पाण्याची बाटलीही नाही .
आत मध्ये असणाऱ्या कॅफ्टेरियामध्ये पाण्याची व्यवस्था आहे आणि पाण्याची बाटली विकत घेऊन तिथेच पाणी पिता येते .आणि नंतर फिरताना पाणी बॉटल नेता येत नाही.
बाहेर फूड कोर्ट आहे .जैन चौपाटी सुरु होईल.आम्हाला काही भूक नसल्यामुळे आम्ही तिथे खाल्ले नाही, पण शुद्ध शाकाहारी असे पदार्थ कॅप्टेरिया आणि फूड कोर्ट दोन्हीकडे मिळतात.
आपल्याला सगळीकडे फिरताना गाईड सोबत असतो. बाहेरच्या परिसरात अगदी आपले फोटो काढायला ही मदत करतो.
आपले वाहन बाहेर पार्किंग एरियामध्ये ठेवून, त्यांच्या इलेक्ट्रिक बस मधून ते आपल्याला म्युझियम पर्यंत नेतात आणि बाहेर आणून सोडतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हिलचेअरची सोय आहे. त्याचे सध्या तरी 1100 रुपये वेगळे द्यावे लागतात.

ता. क.- दोन्ही म्युझियममध्ये आम्ही आॅनलाईन आदल्यादिवशी बुकिंग केले होते.सगळ्यांना हाच सल्ला आहे.
अभय प्रभावनात सध्या तरी गर्दी कमी होती , त्यामुळे तिथे गेल्यावरही तिकीटे मिळतील असे ते म्हणाले, पण तिथेही फोन करुन जाणे योग्य ठरेल.

भाग्यश्री मुधोळकर