Login

माझी बिझनेसशी झटापट.

मी इंजीनियर बनावं म्हणून त्यांनी किती काटकसर केली आहे ते. आपल्या किती इच्छा त्यांनी मारल्या, य?

माझी बिझनेसशी झटापट.  

१९७४ साली मी इंजीनियर झालो. आता पुढे काय? त्यावेळेला MSEB मधे ट्रेनी म्हणून इंजीनियर लोकांची भारती सुरू होती. मला सरकारी नोकरी करायचीच नव्हती म्हणून मी तिकडे लक्ष दिलं नव्हतं आणि प्रायवेट कंपनी च्या जाहिराती बघून अर्ज करत होतो. पण सर्वांना अनुभवी लोकं हवे होते म्हणून दोन तीन महीने झाले, तरी मला साधा इंटरव्ह्युचा कॉल पण येत नव्हता. मोठी कठीण परिस्थिती होती. एवढं शिकून सुद्धा बेरोजगार. आई वडील काही बोलत नव्हते, पण मन खात होतं.

एक दिवस माझा अकोल्याचा मामा आला. त्याचा व्यवसाय होता. काही कंपन्यांच्या एजन्सी त्याच्या कडे होत्या, आणि त्याच्या साठी त्याला बरंच फिरावं लागायचं.  त्याने साहजिकच माझ्या नोकरीची चौकशी केली. मी अजून बेकार आहे असं पाहून त्याने मला विचारलं,

”माझं काम करतोस का? नोकरी मिळे पर्यन्त कर, चार पैसे मिळाले तर काय वाईट आहे?” – मामा.

“म्हणजे काय करायच?”- मी

“माझे काही प्रोडक्टस आहेत, ते मी अजून नागपूर मार्केट मधे चालवू शकलो नाहीये. तू प्रयत्न कर. मला १५ परसेंट कमिशन मिळतं त्यातले मी तुला १० परसेंट देईन. बघ, विचार कर.” – मामा.

“म्हणजे १०० रुपयांचं सामान विकल तर मला १० रुपये मिळतील असं?” – मी

“हो.” – मामा.

“काय प्रोडक्टस आहेत?” – मी.

“हे बघ ही मुंबईची कंपनी आहे. अनंत आणि आठवले ग्रुप. यांचे कॅडबरी सारखे बार चाकोलेट आहेत, पण यांच्यात कोको नाहीये. बदाम, पिस्ता, काजू अश्या प्रकारचे चाकोलेट आहेत. याने मुलांचे दांत खराब होत नाहीत, आणि उपासाला पण चालतात. एक शिवरंजनी नावाची उदबत्ती आहे. तुलनेने बरीच महाग आहे. पण श्री सत्य साईबाबांचा हिला आशीर्वाद आहे. इथे जर सत्य साईबाबांचंचे भक्त मंडळ असेल तर तू शोधून काढ. त्यांच्यामध्ये या उदबत्तीला प्रचंड मागणी आहे. आणखी एक सिंधी कंपनी आहे, तिचे जनरल टॉफी आणि चाकोलेट आहेत. पण त्यांचा एक प्रॉडक्ट आहे, ऑरेंज नावाचा, तो युनिक आहे. टेबल टेनिस च्या बॉल पेक्षा थोडा मोठा, पण आत मधे रसपूर्ण पाकळ्या. हा खूप चालेल. बघ तू.” – मामा.

“अरे मामा, तू काय बोलतो आहेस? मी इंजीनियर झालो आहे, आणि चाकोलेट विकू? छे, नाही पटत माझ्या मनाला. नोकरी काय आज ना उद्या मिळेल. आई बाबांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण मला माहीत आहे, की मी इंजीनियर बनावं  म्हणून त्यांनी किती काटकसर केली आहे ते. आपल्या किती इच्छा त्यांनी मारल्या, याची मला कल्पना आहे. मी हे काम केलं तर ते काय सांगतील लोकांना? मुलगा इंजीनियर झाला आहे पण आता तो पेपरमिंट आणि गोळ्या विकतो. किती क्लेश होतील त्यांच्या मनाला.” – मी

“दिलीप,” आता बाबा बोलले. “मला असं वाटतं की तू हे करावंस.”

“काय बाबा तुम्ही पण!” – मी.

“हे बघ, तुला MSEB मधे जायचं नाहीये, आणि आज माझ्या माहिती प्रमाणे, सध्या रिसेशन चा काळ चालू आहे. नोकऱ्या मिळणं अवघड आहे. समजा येत्या सहा सात  महिन्या मधे तुला नोकरी मिळाली नाही, तर नैराश्य येऊ शकतं. डिप्रेशन आलं तर तो तुझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ असणार आहे. मला ते नको आहे. मामा म्हणतो आहे तो उपक्रम तू जर केलास, तर तू किती पैसे कमावतोस, नफा होतो, की तोटा याच्याशी मला काही कर्तव्य नाही. आत्ता पर्यन्त तू घर आणि कॉलेज या सुरक्षित चौकटीत वावरत होतास. बाहेर पडलास तर चार माणसांशी संबंध येईल. समाजात कसं वावरायचं आणि आपला हेतु कसा साध्य करायचा याचं ज्ञान तुला मिळेल. दहा लोकं अपमान करतील, तो गिळून पुन्हा जिद्दीने आपलं काम कसं करायचं यांचा अनुभव मिळेल. पैसे किती मिळतील याचा विचारच करू नकोस. या अनुभवाचा तुला पुढच्या आयुष्यात खूप उपयोग होईल. मुख्य म्हणजे यात गुंतून राहशील आणि डिप्रेशन येणारच नाही. एक प्रकारची परिस्थितीवर मात करण्याची जिद्द अंगी बाणेल. हे सर्वात महत्वाचं आहे. बाकी तू सुज्ञ आहेस. तू ठरव. सल्ला देण्याचं आमचं काम आहे. मानायचा की नाही हे तूच ठराव.” – बाबा.

बाबांचा प्रत्येक शब्द माझ्या मनावर परिणाम करून जात होता. मी मामाची ऑफर अॅक्सेप्ट केली.

“कुठून सुरवात करायची? काय बोलायचं? कोण घेईल आपला माल?” – मी मामाला विचारलं.

“हे बघ आमच्या युक्त्या आणि पद्धती आता जुन्या झाल्या आहेत. तुमची जनरेशन वेगळी आहे, तू स्वतंत्र पणे तुझी पद्धत डेव्हलप कर. ऑल द बेस्ट.” – मामा.  

बाबांनी मामाला १००० रुपये दिले. मामाने १००० रुपयांचा माल मागवून दिला. आता माझी पाळी होती. दोन दिवस प्राइस लिस्ट पाठ करण्यात गेले. काय बोलायचं दुकानात गेल्यावर यांची उजळणी करून झाली.

तिसऱ्या दिवशी, मी विकी वर सामानाच्या पिशव्या लांडून निघालो. विकी हे त्यावेळेचं लुना पेक्षा पॉवर फूल पण स्कूटर पेक्षा कमी अशी गियर वाली गाडी होती.

जे पहिलं दुकान लागलं तिथे थांबलो. मनात विचार आला की इथे नको इथे आपल्याला सर्वच ओळखतात. मग अजून समोर गेलो. तिथेही दुकानात जाण्याचं धाडस झालं नाही. मग अजून समोर. अजून समोर. असाच दिवसभर चाललं होतं. संध्याकाळी काहीच न करता घरी वापस. असेच दोन दिवस गेले. तिसऱ्या दिवशी बाबांनी विचारलं,

“काय प्रगती?” – बाबा.

“अजून दुकानात जायची हिम्मत होत नाहीये. दोन दिवस पेट्रोल वाया गेलं.”- मी

“हरकत नाही प्रयत्न चालू ठेव. एक ना एक दिवस यश येईल.” – बाबा.

दिवस असेच चालले होते, मग एक दिवस मी नागपूरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सदर बाजारात गेलो. तो भाग श्रीमंत लोकांचा होता. तिथे काही माल खपण्याची शक्यता नव्हती, पण त्या बाजूला मला कोणी ओळखत नव्हतं. तिथे मेन रोड वरच एक आशा स्टोअर नावाचं मोठं दुकान होतं. दुपारची वेळ होती, कोणीही ग्राहक दुकानात नव्हता. मालक गल्ल्यावर आरामात बसला होता. पिशव्या विकीवरच ठेवल्या, आणि मी धीर करून दुकानात शिरलो.

“आवो सेठ क्या चाहिए? आपको यहाँ सब मिल जाएगा.” – दुकानदार

पहिला धडा मिळाला. तो माझ्या सारख्या फाटक्या माणसाला सेठ म्हणत होता. मराठी माणूस उगाच कोणाला मान देत नाही. ही गोष्ट शिकण्यासारखी होती. ते नागपूर होतं. सगळं संभाषण हिंदीतून झालं पण मी मराठीतून लिहीत आहे.

“मी काही घ्यायला आलो नाहीये, काही विकायला आलो आहे. तुम्ही माझ्या जवळच्या वस्तु जर बघितल्या तर मेहरबानी होईल. काही घेतलच पाहिजे असा आग्रह नाही. पण एकदा बघा ही विनंती.” – मी.

“काय आणलं आहेस तू?” – दुकानदार. तो सिंधी होता हे त्यांच्या भाषेवरून काळात होतं. आता तो मला “तू” अस संबोधन करत होता.

मग मी एक पिशवी आणली आणि त्यातून बार चाकोलेट  बाहेर काढले.

“हे बघा मुंबईची कंपनी आहे आणि खास मुलांसाठी हे चाकोलेट बनवलेले आहेत. याने दांत खराब होत नाहीत कारण यात कोको नाहीये. हे बघा काजू, बदाम, अंजीर, जरदाळू वगैरे वगैरे.” – मी.

त्याने चाकोलेट बघितले, कंपनीचं नाव, गाव पत्ता बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. तो पुन्हा पुन्हा सर्व बार चाकोलेट बघत होता. म्हणाला,

“आमच्या कडे माल सप्लाय करायला जी पोरं येतात, त्यातला तू दिसत नाहीस. तू कोण आहेस? तू तर चांगला शिकलेला वाटतो आहेस, इंग्लीश पण बोलतो आहेस. खरंच कोण आहेस तू आणि हे काम का करतो आहेस?” – दुकानदार.

आता मात्र माझी पंचाईत झाली. खरं सांगितलं तो माझा माल घेणारच नाही, आणि खोटं काय बोलायचं याचा विचारच केला नव्हता, तसंही खोटं बोलणं मला जमलच नसतं.

“मी इंजीनियर आहे. नोकरी अजून तरी मिळाली नाहीये, म्हणून हा व्यवसाय करायचं ठरवलं. तुम्हीच पहिले ज्यांना मी भेटतो आहे.” – मी

“काय सांगतोस? अरे माझा भाचा पण इंजीनियर झाला आहे आणि तो MSEB मधे लागला आहे. तू का नाही तिथे गेलास?” – दुकानदार.

“नाही, मला सरकारी नोकरी करायची नाहीये. खाजगी कंपनी मध्येच जायचं आहे. प्रयत्न चालू आहे, पण रिसेशन असल्याने अजून यश आलं नाही.” – मी

दुकानदाराने सिंधी भाषेत कोणाला तरी बोलावलं. दुसऱ्या टोकाला काऊंटर च्या मागे कोणी आराम करत होतं. बहुधा या माणसाचा मोठा भाऊ असावा. त्याने भावाला माझ्या बद्दल सांगितलं. तो काऊंटरच्या बाहेर माझ्या कडे आला, आणि मला मिठीच मारली. मला कळेच ना की हे काय चाललंय ते. मग मला म्हणाला,

“आम्ही लोक पार्टिशनच्या वेळी नागपुरात आलो. इथल्या शरणार्थी कॅम्प मधे राहिलो. आम्हाला तर सवय आहे, पण माझ्या पहाण्यात तरी तू पहिला मराठी आणि शिकलेला माणूस आहेस की जो कुठलंही काम हलक समजत नाही आणि ज्याला काम करायची लाजही वाटत नाही. तू दुसरी पिशवी पण घेऊन ये आणि या काऊंटर वर मोकळी कर. आणि प्रत्येक प्रॉडक्ट आम्हाला समजाऊन सांग.” – मोठा भाऊ.

मी त्याने सांगितल्या प्रमाणे सर्व गोष्टी काऊंटर वर ठेवलयाआ आणि नीट सगळी माहिती दिली.

तेवढ्यात त्यांचा नोकर आला, त्याला त्यांनी सांगितलं की कोपऱ्यावरच्या दुकानातून १०-१२ काचेच्या बरण्या घेऊन ये, ही सगळी चाकोलेट  त्यात भरायची आहेत.

मला म्हणाले की हे सगळं आम्ही घेतलं किती पैसे झाले ते सांग. चुकते ७४० रुपये त्यांनी माझ्या हातावर ठेवले.

“आज सोमवार आहे, तू शुक्रवारी ये आणि ऑर्डर घेऊन जा. तो पर्यन्त हे सगळं संपून जाईल.” – मोठा भाऊ.

“इथून चार दुकानं सोडून एक पुष्पा एंटरप्राइज नावाचं दुकान आहे, त्याला मी सांगतो. तू उद्या त्यांच्या कडे जा तो पण हे सगळं घेईल. तुला मी शुक्रवारी अजून काही दुकांनाची माहिती देईन. ऑल द बेस्ट.” – दोघही भाऊ.

झालं बॉल स्टारटेड रोलिंग. एका कडून दुसऱ्याच आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याचं नाव मिळत गेलं आणि धंदा सेट होत गेला. एक दिवस एका दुकानात मी शिवरंजनी उदबत्तीचं नाव आणि माहिती देत होतो, तर तिथे हुद्दार नावाचे गृहस्थ आले होते. ते सत्य साईबाबांचे भक्त होते. त्यांनी मला त्यांच्या भक्त मेळाव्याला शिवरंजनी घेऊन बोलावलं. तिथे मला डझनानी ऑर्डर मिळाल्या.

गणपतीचे दिवस जवळ आले होते. मला मुंबईच्या कंपनी कडून १० सॅमपल  बॉक्स आले. त्यात काजू मोदक होते. हे काही तरी नवीनच होतं. मी जरा साशंक होतो पण त्याला इतका प्रतिसाद मिळाला की मला ऑर्डर पूर्ण करता करता दम लागला. काजू मोदक ही कल्पनाच त्यावेळी नवीन होती.

सात – आठ महीने झाले, आणि आता गंमत अशी झाली होती की माझे MSEB मधले मित्र अजूनही २५० रूपायांवर होते आणि माझं इन्कम १००० च्या वरती गेलं होतं. पण कुठे तरी मनात खोल, एक सल होती, की माझ्या शिक्षणाचा उपयोग काय? ती बोच दिवसेंदिवस असह्य होत होती.

एक दिवस माझा मावस भाऊ नागपूरला काही कामा साठी आला होता. रात्री बोलता बोलता तो माझी चौकशी करत होता, त्या मी माझी व्यथा सांगितली. तो म्हणाला, तुझा बयोडेटा मला दे. गोव्याचा एक मोठा ग्रुप आहे “गोगटे ग्रुप” त्यांचं आमच्याच बिल्डिंग मधे ऑफिस आहे. त्यांना फ्रेश ट्रेनी इंजीनियर घ्यायचे आहेत. त्यांचा पालघर जवळ स्टील प्लांट येतो आहे. त्यांना मी हा तुझा बायो डेटा देतो, तुला नोकरी मिळून जाईल.

झालं. इंटरव्ह्यु कॉल आला, मग अपॉईंटमेंट लेटर पण आलं. आणि मी धंदा वाइन्ड  अप  करून सरळ नोकरी वर जॉइन झालो.

धन्यवाद

दिलीप भिडे