Login

माझी थायलंड वारी

My travel experience

भारतापासून, विमानाने ६-७  तासांच्या अंतरावर, पूर्व दिशेला, असलेला देश थायलंड! जुलै २०१८ मध्ये सह कुटुंब आम्ही थायलंडला ( बँकॉक आणि फुकेत) जाण्याचे योजिले! जय्यत तयारी केली, ट्रीप साठी भरपूर खरेदी केली.बॅगा भरल्या आणि मुंबई - थायलंड विमान प्रवासासाठी आम्ही सज्ज झालो. पावसाळा असल्याने धावपट्टी वर पाणी साचलं होत खरं, पण विमान वेळेवर उडाले.


दिवस १ - बॅगांची अदलाबदल.
सुवर्ण भूमी एअरपोर्ट थायलंडला पोहोचलो आणि "ऑन अरायव्हाल विसा" साठी हि भलीमोठी रांग! विसा मिळाला, आणि बॅगा घेण्याकरिता बेल्ट वर गेलो. आम्हाला उशीर झाल्याने बॅगा बेल्ट वरून बाजूला काढून ठेवण्यात आल्या होत्या! आम्ही माणसं पाच, पण आमच्याकडे आठ नग बॅग्स.आमचं बिऱ्हाड पाठीवर उचलून (ट्रॉलीवर) टॅक्सी केली आणि थेट बॅंकॉक सिटी गाठली. एअरपोर्ट ते बॅंकॉक सिटीचा दोन तास टॅक्सी प्रवास नकोस झाला होता. आधीच फलाईट,नंतर विसाची वाट पाहत तास दिड तास रांगेत उभ राहून जीव पुरता थकला होता. कधी एकदा हॉटेल रूम वर जाऊन बेड वर आडवे होतोय असं झालं होतं.

हॉटेल रूम वर पोचतात मुलींनी दवंडी पिटली "भूक लागली ". संध्याकाळचे  सात वाजले होते, भूका सगळ्यांनाच लागल्याने बाहेर जेऊन येऊ आणि निवांत आराम करू असं ठरल. पोटोबा शांत होताच डोळे देखील मिटू लागले.

"मुलींनो, चला पटकन फ्रेश व्हा, नाईट ड्रेस घाला आणि झोपा आता."

"बाबा, ही बॅग उघडत नाहीये!बघ ना जरा!"

" लॉकचा कोड नंबर बरोबर सेट कर म्हणजे उघडेल"

" दे, मी बघतो!"

" ओ...नो!!"

"काय रे, कोड नंबर विसरलास का? थांब मी लिहून ठेवला आहे सांगते"

" अगं, कोड नंबर सोड..... ही बॅग आपली नाहीये!!!"

" काय!! असं कसं झालं?? काय करायचं आता?"

" बॅगा उचलताना टाग्ज वर नाव पाहून मगच आपली बॅग उचलावी,ही कोणी अशी बॅग घेतली न पाहता???  काय वाढीव काम झालं हे "

"आता काय.... चला सुवर्ण भूमी एअरपोर्टला परत आणि लॉस्ट बॅग डेस्क वर करूया कंप्लेंट,आणि ही बॅग ज्याची आहे त्याला देतील ते आणि आपली बॅग शोधुया मिळाली तर ठीक!"

आई आणि आमच्या दोन्ही कन्या हॉटेल वर थांबल्या आणि आम्ही दोघे " ती " ( आमची नसलेली) बॅग  घेऊन रात्री नऊचे सुमारास मेट्रो ट्रेन ने पुन्हा एअरपोर्ट वर गेलो.
आमच्या बॅगची तिच्या सारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या बॅग बरोबर अदलाबदली  झाली होती. हिंदी चित्रपट दाखवतात ना जुळे भाऊ/ बहिणींची अदला बदल, अगदी तसचं!पण हा आमचा टॅग वरचे नाव न वाचता बॅग उचलली हा मूर्खपणा चांगलाच महागात पडला!

पहिल्याच दिवशी वेळ,ताकत आणि पैसा सगळंच खर्ची पडले. रात्रीचे दोन वाजता आम्ही आमची बॅग घेऊन परत हॉटेलवर येऊन पोचलो आणि मेल्यासारखे झोपलो!

दिवस २ -हॉटेल रूमची चावी.
सकाळी भरपेट नाष्टा करून आम्ही निघालो. दहा वाजता आमची टूर ठरली होती, सफारी वर्ल्ड आणि ओपन झू बॅंकॉक. दिवस भर निसर्गाच्या सानिध्यात मन आणि डोळे सुखावले. अनेक जंगली प्राणी मुक्तपणे फिरताना पहिल्यांदाच पाहायला मिळाले. प्राण्यांना फिरण्याची मोकळीक आणि माणसं आत बंद गाडीत बसून प्राणी बघत होते.

संध्याकाळी सात वाजता डिनर क्रुझचे बुकिंग असल्याने पाच वाजता हॉटेल रूम वर आलो.चेंज केलं आणि आमची स्वारी निघाली 'चाअाे फ्राया रिव्हर' डिनर क्रुझ करिता. दोन- तीन तासांची टूर होती, त्यात मोठ्या बोटीत बसून हेलकावे घेत, चाअाे फ्राया रिव्हर मधून आपल्याला बॅंकॉक सिटीचे रात्रीचे लखलखते रूप पाहायला मिळते. एका बाजूला संपूर्ण शहर दिसतं आणि दुसऱ्या काठाला "व्हॉट अरुण" बॅंकॉक मधील बुद्धाचे मंदिरचे दर्शन बोटीतून घेता येत.आत मधून मंदिर  पाहायला दिवसा जावं लागतं.

जेऊन खाऊन, दिवस भर मज्जा करून थकलेली पावलं रात्री ११ वाजता हॉटेल वर पोचली.

"आई, मला देना ती रूमची चावी मी उघडते दार"

माझ्या धाकट्या लेकिला त्या ए. टी. एम कार्ड सारख्या दिसणाऱ्या रूमच्या किल्लीची खूप कुतूहल वाटत होत. चावी हातात मिळताच लिफ्ट पासून रूमकडे जणू झेपच घेतली तिने, आणि तोल जाऊन घातला जमिनीवर शाष्टांग. पडल्यामुळे, तिच्या हातातली रुमची चावी ( कार्ड सारखी पात्तळ चावी) आमच्या डोळ्या समोर शेजारच्या रूमच्या, दाराच्या फटीतुन आत जाताना आम्ही शुंभासारखे पाहत राहिलो !! झाली रडारड, आधीच चिमुरडा जीव दिवस भर दमलेला, त्यात लागलं! तिला मी उचलून घेतलं. नवऱ्याने त्या शेजारच्यारूम ची बेल वाजली पण ५-७ मिनीट काही कोणी दार उघडले नाही.

" मी खाली रिसेप्शनला जाऊन बघतो, तुम्ही थांबा इथेच"

आम्ही भिंतीचा टेकू घेऊन कसं बसं स्वतः ला उभ ठेवलं! पायात आता त्राण उरले नव्हते!

" चला मिळाली दुसरी चावी!"

"आलास तू.... नशीब रे ....दिली त्यांनी दुप्लिकेट चावी!"

" नशीब कुठलं.....४०० बाथ घेतले, किल्ली हरवल्याची फाइन म्हणून  " ( १ बाथ = २ ₹)

झालं, काही बोलायला सुद्धा जीव उरला नवता, आत गेलो रूमवर आणि शुद्ध हरुपून झोपी गेलो!

दिवस ३- रे बनचा गॉगल.
आज आम्ही  बॅंकॉक सिटी पासून १.५ तासावर असलेल्या दामनोंइन फ्लोटिंग मार्केट ( पाण्यात बोटीत बसून खरेदी विक्री चे व्यवहार होतात, म्हणून फ्लोटिंग मार्केट ) तिथे जाण्यासाठी निघालो. बसने १ तासाचा प्रवास करून आम्ही त्या छोट्या गावात पोहोचलो. प्रत्यक्ष मार्केटला जायला लहान होडीत बसून जायचं ह्या कल्पनेने भारावून गेलो. आम्ही ५ जाणं एका होडीत बसलो आणि अर्धा एक तास मार्केटचा फेर फटका मारत, फोटो काढले व खरेदी केली. होडी वाल्याने आम्हाला पुन्हा बस स्टँड जवळ सोडले आणि दुसऱ्या सावरी साठी तो निघून गेला.

" माझा गॉगल कुठे ग,तुझ्या पर्स मध्ये ठेवलास का ?"

" नाही रे, मला कुठे दिलास तू??"

" म ...कुठे गेला??? अरे...यार.... मी त्या होडीत गॉगल काढला होता आणि चस्मा घातला, ते गॉगलचे पाकीट होडीत राहिलं"!!

माझी तर वाचा बंद झाली! आज सलग तिसरा दिवस. आम्ही आल्यापासून गोंधळ घालतोय. कसं शोधायचं त्या होडीवाल्याला? भाषा तरी कुठे येते इथली आपल्याला! काय बोलणार अन् काय विचारणार!!

सोनी टीव्ही वरील सि.आय.डी मालिका पाहिल्याचा आज फायदा झाला! कॅमेरा मधून फोटो काढले होते, त्यात एका फोटो मध्ये होडीचा नंबर टिपला गेला होता. ताबडतोप मागे फिरलो, होड्या थांबतात तिथे गेलो, आणि त्या तिकीट खिडकीत बसलेल्या माणसाला,  कळेल अश्या भाषेत ( तोडकी मोडकी इंग्रजी भाषा येते थायलंड मध्ये अनेक लोकांना) घडलेला प्रकार सांगितला.

होडी नंबर वरून, मालक शोधला, आणि ताबडतोप त्याला फोन लावण्यात आला.गॉगल आहे म्हणाल ! त्याने १५-२० मिनिटांनी गॉगल आणून दिला. महागडा रे बन गॉगल मिळताच, नावरोबा खुश! होडीस्वाराला बक्षीस देऊन त्याचे आभार मानले!"खाब खुन खा" म्हणजे थाई भाषेत धन्यवाद आणि "सावादी..." म्हणजे थाई भाषेत हॅलो ! एक दोन शब्दं सहज म्हणून शिकलो होतो!

इजा बिजा तिजा ... झालं आता.... चला टेन्शन नाही! सलग तीन दिवस काहीं ना काहीं गडबड गोंधळ घालतच होतो आम्ही. पण झालं, आता सगळ सुरळीत होईल ह्या आशेवर होतो आम्ही.

दिवस ४ -फ्लाईट बोर्डिंग पास
आज सकाळी ११ वाजत बॅंकॉक ते फुकेत फ्लाईट ने आमचा मोर्चा फुकेत फिरायला रवाना झाला. बॅंकॉक एअरपोर्टला वेळेवरच गेलो.गेल्या तीन दिवसांचा अनुभव बघता आज सगळं शांतपणे, न गोंधळ घालता करायचे ठरवले.बोर्डिंग पास, सेक्युरिटी चेक सगळे सोपस्कार उरकून आम्ही विमानात बसायला निघालो.

" मॅडम, युअर बोर्डिंग पास प्लीज!" गोड आवाजात हवाई सुंदरीने मला विचारले.

मी हातातला पासपोर्ट आणि बोर्डिंग पास दोन्ही तिला दाखवले.

" सॉरी मॅडम, बट युअर पासपोर्ट नेम अँड नेम ऑन बोर्डिंग पास इज नॉट द सेम"

असं कसं....बघू दे ...मी पासपोर्ट आणि बोर्डिंग पास नीट पाहिला तेव्हा लक्षात आलं माझ्या कडे, माझ्या मोठ्या लेकीच बोर्डिंग पास आला होता.

"ओ ह.... सॉरी...धीस इज माय डॉटर्स बोर्डिंग पास"

मोठीच पासपोर्ट आणि बोर्डिंग पास चेक केला तर तिचं नाव तिच्या बोर्डिंग पास वर अगदी बरोबर छापल होतं!

"अरे रामा .... म माझा कुठे गेला बोर्डिंग पास???"

सगळ्यांचे पास पाहिले, अन् माझा ठोकाच चुकला! माझ्या नावाचा बोर्डिंग पास नव्हताच! गुंजन, मोठ्या लेकीचे नावाने दोन पास होते, एक तिच्या कडे, एक माझ्या कडे. " प्रिंटिंग एरर .... नव्हे...माझा पास दिलाच नाही....पण मी मात्र सेक्युरिटी चेक वगैरे करून पास वर शिक्का घेऊन आले होते!! आता बोला....कोणालाच कस लक्षात आलं नाही की पासपोर्ट नेम अँड बोर्डिंग पास नेम हे मॅच होत नाहीत!!

पुढं काय?? विमान उडायला १५ मिनिटे राहिली होती! माझं काय होणार ? उतरवल मला खाली तर?? का आता, बोर्डिंग पास नाही तर बसायला सीट नाही,मी उभ्यानेच लटकत प्रवास करणार की काय???

५-७ मिनटे झाली....विमान जमिनीवर होते, पण आम्ही सगळे हवेत होतो. हसावे की रडावे कळेना!! तेव्हढ्यात आली ती, तिचं स्मित हास्य आणि गोड आवाजात हवाई सुंदरी मला म्हणाली....

" सॉरी मॅडम, ईट वॉज आवर फॉल्ट , प्लीज टेक युअर सीट नंबर  २५ डी "

आहे ...देव आहे....मी सध्या थायलंड मध्ये असले, तरी माझ्या पाठीशी थायलंड पर्यंत देव देखील आलें आहेत !!

दिवस ५- वादळी पाऊस
फुकेत शहर हे एक बेट आहे. थायलंड देशाचे सगळ्यात मोठं बेट म्हणून प्रसिद्ध आहे फुकेत. चहू बाजूंनी अथांग निळा शार समुद्र. जुलै महिन्यात तिथे पाऊस पडतो पण तरी पावसामुळे पर्यटकांची गर्दी कधीच कमी होत नाही. सकाळी ९ वाजता, आज आम्ही फी फी आयलंडला  पूर्ण दिवस फिरायला जाण्यासाठी टूर बुक केली होती. पण सकाळी ७.३० चे सुमारास आमच्या हॉटेल रिसेप्शन वरून फोन आला की भयंकर पाऊस झाल्याने समुद्री वादळ आले आणि त्यात २ बोटी बुडून अनेक लोकांनी, पर्यटकांनी आपला जीव गमावला!!

सकाळच ही बातमी ऐकताच आमच्या पायाखालची जमीन सरकली! मनात धस्सा झालं ! थायलंड मध्ये आल्या पासून आमचे गडबड गोंधळ घालून झाले पण ही बातमी मात्र जिव्हारी लागली! आता बास! चला जाऊया घरी....अजून काय काय वाढून ठेवलं आहे ह्या थायलंड मध्ये !!

दिवस भर त्या बातमीने मन बेचैन होते. कसा तरी दिवस ढकलला......

दिवस ६-फ्लाईट कॅन्सल
दोन दिवस, दोन वेगळ्या बेटांवर फिरण्यासाठी टूर बुक केली होती. कालच्या वादळाचा प्रभाव कमी झाला, त्यामुळे पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आले. ह्या सगळ्याची फुकेत वासियांना सवय होती. समुद्रच त्यांच्या चोहिकडे, अश्या अनेक वादळांना तोंड देत ते नेहमीचं पर्यटकांसाठी तत्पर असतात.

टुर्स आज सुरू केल्या आणि आम्ही निघालो जेम्स बॉण्ड आयलंड वर!जीव मुठीत धरून ४ तासांची टूर करून आलो. जेम्स बॉण्ड चे एका चित्रपटाचे शूटिंग त्या बेटावर झाल्याने खास पर्यटक आकर्षित करण्यासाठी त्या बेटा चे नाव जेम्स बॉण्ड आयलंड म्हणून प्रसिद्ध झाले. त्याचे मूळ नाव "कोह खाव फिंग खा" असे आहे! आपली जीभ अडखळेल बोलताना, त्या पेक्षा जेम्स बॉण्ड आयलंड बरं! सोपं आहे.

हॉटेल वर  सुखरूप पोहोचलो, हाथ जोडून मनोमन परमेश्वराचे आभार मानले! आजची थायलंड मधली शेवटची रात्र! उद्या पहाटे, सहाची आमची फुकेत ते बॅंकॉक फ्लाईट, आणि पाठोपाठ, तीन तासानंतर बॅंकॉक ते मुंबई फ्लाईट, की मग आपल्या देशात,घरी !! घरी परतण्याच्या नुसत्या विचाराने देखील मन हुरळून गेले!

" श्या ... हे काय, ही ईमेल बघ.... अगं उद्याच आपलं विमान रद्द झालं, फुकेट ते बॅंकॉक !!"

"हाहाहाहा....बास बरका चेष्टा, उगाच आता शेवटच्या दिवशी असली मस्करी नकोरे करुस"

" ही मस्करी नाही, ही बघ ईमेल"

" मला ईमेल दिसे ना.... डोळयात अश्रू तरळत होते!"

"असं का सगळ होतंय! हे एखाद वाईट स्वप्नं आहे ही वस्तुस्थिती!" काय रे देव, ह्या थायलंड आणि आमचे काही सुत जमेना!"

दिवस ७- होम स्वीट होम
फ्लाईट कॅन्सलची ईमेल वाचल्यानंतर कित्ती तरी वेळ रात्री फूकेत एअरपोर्टला फोन करून चौकशी करण्याचा आमचा प्रयत्न निष्फळ ठरला! पहाटे चारला आम्ही फूकेत एअरपोर्ट वर जायचे आणि काय ते तिथेच चौकशी करू असे ठरवले. पहाटे टॅक्सी बोलावली आणि आम्ही एअरपोर्ट साठी निघालो. पावसाने आम्हाला फूकेत वरून निघताना निरोप देण्यासाठी हजेरी लावली.टॅक्सी मध्ये बसे पर्यंत आम्ही सगळें भिजलो. कुडकुडत  एअरपोर्ट वर पोचलो आणि सविस्तर चौकशी करता लक्षात आले की सहाच विमान रद्द करून त्यातील प्रवासी ७.३० वाजता  निघणाऱ्या फ्लाईट
मध्ये सामील केले आहेत.

अखेर डोक्यावरची टांगती तलवार उतरली! आणि आमची फ्लाईट बॅंकॉक कडे निघाली. पुन्हा आम्ही सुवर्ण भूमी एअरपोर्ट बँकॉकला आलो आणि  शेवटच्या प्रवासाची तयारी सुरू केली, बॅंकॉक ते मुंबई. खरं तर आता कुठले आव्हान आमच्यासमोर येते ह्याची आम्हीच वाट पाहू लागलो!

मुंबई फ्लाईट चार तास डीले झाली अशी घोषणा एअरपोर्ट ला करण्यात आली. ( डीले म्हणजे फ्लाईट ठरलेल्या वेळे पेक्षा उशिराने उडणार ) जुलै महिना, मुंबई आणि थायलंड दोन्ही कडे मुसळधार पावसामुळे हा उशीर झाला होता! फ्लाईट रद्द करण्यात आली नाही हेच आमचं नशीब! बॅंकॉक एअरपोर्ट वर वेळ घालवायला " रेन रेन गो अवे" ही इंग्रजी कविता म्हणत मुलींनी पावसाला जायला सांगितले!

उशिराने का होईना आमचा मुंबई प्रवास सुखरूप झाला. सात दिवसांची साहसी थायलंड वरी पूर्ण करून,आंबट गोड आठवणी मनात साठवून आम्ही आमच्या घरी पोचलो!

अशी  माझी थायलंड वरी जगात भारी सुफळ संपूर्ण झाली!

© तेजल मनिष ताम्हणे

0